हे धाडस करून दाखवाच!

आपल्याला तर हेच करून दाखवायचे आहे. या लोकांना जोपर्यंत आपण शरम वाटायला भाग पाडणार नाही, तोपर्यंत हे लोक आपल्या चुका सुधारणार नाहीत.

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा मिळून एकूण ८,६९,३५६ मतदार या निवडणुकीसाठी मतदान करण्यास पात्र आहेत. राज्याच्या एकूण टक्केवारीत ७० पेक्षा अधिक टक्के मतदार आपला हक्क बजावणार असल्याने या निवडणुकीतून राज्याचा कल स्पष्ट होणार आहे.
एकीकडे “विकसित भारत, स्वयंपूर्ण गोवा” याचे दाखले देऊन सर्वत्र आनंद असल्याचा सरकारचा दावा, तर दुसरीकडे भाजपच्या राजवटीत गोव्याचा विनाश सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप, यामध्ये जनता नेमकी कुणाच्या बाजूने आहे, हे अधोरेखित होईल.
जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांतून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेच्या मनातील कानोसा स्पष्ट होणार असल्याने २०२७ च्या फेब्रुवारीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या निवडणुकांना मोठे महत्त्व आहे.
सहजिकच सर्व राजकीय पक्ष सक्रीयपणे प्रचारात उतरले आहेत. यापूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीचा प्रचार इतक्या व्यापक प्रमाणात झालेला कधीच पाहिला नव्हता. यावेळी मात्र जणू विधानसभेप्रमाणेच जोरदार प्रचार सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
कुठलीही निवडणूक छोटी किंवा मोठी नसते. लोकशाहीच्या प्रत्येक पायरीवर त्या त्या निवडणुका महत्त्वाच्या असतात.
जिल्हा पंचायतींना कुठलेही ठोस अधिकार देण्यात आलेले नाहीत. केवळ संविधानिक अपरिहार्यता म्हणून त्यांची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या वाट्याचे अधिकार इतरांना देण्यास विधानसभा तयार नसल्याने जिल्हा पंचायत सदस्य हे केवळ नाममात्र ठरले आहेत. प्रत्येक आमदार आपल्या विश्वासातील एखाद्याला जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आणण्यासाठी धडपडतो, कारण विधानसभेच्या निवडणुकीत हाच सदस्य त्या आमदाराला मदतगार ठरतो.
या निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांना आपली राजकीय ताकद आजमावण्याची संधी मिळते. आत्ता पहिल्यांदाच मुख्यमंत्री जिल्हा पंचायतींना अधिकार देण्याची भाषा करत आहेत. विधानसभेचा कार्यकाळ केवळ एक वर्ष बाकी असल्याने ही गोष्ट साध्य होणे कठीण आहे. तरीही पुढील सत्ता आपल्याकडेच येईल, याबाबत ते निशंक असल्याने कदाचित ते धाडसाने बोलत असावेत.
विधानसभेच्या आमदारांसाठी जिल्हा पंचायत निवडणुका जशा राजकीय ताकद आजमावण्याची प्रयोगशाळा ठरतात, तसाच प्रयोग जनतेने करून पाहिला तर त्यातून गोव्याचे भले साध्य होऊ शकते.
राज्यात जे काही चुकीचे चालले आहे जसे की बेकायदेशीर जमिनींचे व्यवहार, भूरूपांतरे, शिक्षण-आरोग्याची फरफट, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोजगाराच्या नावाने चाललेला लिलाव त्याबाबतचा रोष व्यक्त करण्याची ही नामी संधी आहे.
प्रत्येक नागरिक हा ठरावीक पक्षाचा कार्यकर्ता, हितचिंतक किंवा सहानुभूतीधारक असू शकतो. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपला वास्तवाची जाणीव करून देण्याची, त्यांच्या चुकांची ओळख करून देण्याची आणि त्यांना सुधारण्याची अक्कल प्राप्त करून देण्याची ही सुवर्णसंधी आहे.
ज्यांनी भाजपच्या कमळाशिवाय कुठेच मतदान केले नाही, किंवा भाजपचे हितचिंतक त्यांनी काळजावर दगड ठेवून पक्षाच्या विरोधात मत देण्याचे धाडस या निवडणुकीत गोव्यासाठी आणि तुमच्या भवितव्यासाठी करावे लागेल.
आता हे मत अन्य कुणाला देणार, याचा साधक-बाधक विचार करूनच निर्णय घ्या. भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्याची कुवत असलेला दुसरा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, हे ओळखूनच मतदान करा, जेणेकरून जिल्हा पंचायत मतदारसंघात तुल्यबळ आणि योग्य प्रतिनिधी मिळू शकेल.
जिल्हा पंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला म्हणून कुठेही आभाळ कोसळणार नाही. फक्त सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसाठी ती शरमेची गोष्ट ठरेल.
आपल्याला तर हेच करून दाखवायचे आहे. या लोकांना जोपर्यंत आपण शरम वाटायला भाग पाडणार नाही, तोपर्यंत ते आपल्या चुका सुधारणार नाहीत.
या चुका सुधारण्यासाठी अजूनही एक वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. या एका वर्षांत बदल दिसला आणि चुका सुधारल्या गेल्या तर तुम्ही तुमच्या जवळच्या पक्षाला बिनधास्तपणे मतदान करू शकता.
हे करून दाखवण्यासाठी यावेळी हे धाडस करून दाखवाच!
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जनभावनांची धग सत्ताधारी पक्ष आणि सरकारला दाखवून देण्याची ही संधी आहे. भाजपच्या विरोधकांना तर ही संधी आहेच, परंतु भाजपचे हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनाही आपल्या पक्षाला सुधारण्याची ही संधी मिळणार आहे.
लोकशाहीने आपल्याला सर्वांत मोठे शस्त्र दिले आहे ते म्हणजे मतदानाचा अधिकार. हा अधिकार म्हणजेच आम्ही जनतेने आमच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घेण्याची संधी.
ह्यात आमच्या सुख-दुःखाचा दोष अन्य कुणालाच देता येणार नाही. तो दोष आम्हालाच स्वीकारावा लागणार आहे.
केवळ चिन्हावर शिक्का मारण्याचा हा काही सेकंदांचा क्षण, पण तो आपल्या संपूर्ण आयुष्यावर, राज्य, देश, समाज आणि रोजच्या जगण्यावर गंभीर परिणाम करू शकतो हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.

  • Related Posts

    भाजप महिला जागी हो !

    भाजपमधील महिला संघटनात्मक पातळीवर सक्रिय असूनही समाजातील महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच महिलांशी संबंधित विषयांवर गप्प का राहतात, हा खरा चर्चेचा विषय आहे. महिला हीच खरी भाजपची ताकद आहे. भाजपाच्या यशात…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    पोलिस खाते असे वागू लागले तर ती धोक्याची सूचना आहे. पोलिसांवरचा लोकांचा विश्वास गेला तर प्रत्येकजण न्यायासाठी स्वतःचा मार्ग पत्करू लागेल. प्रत्येकाने स्वतःच न्यायनिवाडा सुरू केला तर राज्यात अराजकता माजण्यास…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 14 views
    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 15 views
    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 26 views
    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 19 views
    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 28 views
    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 29 views
    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…