विरोधक बोध घेतील ?

आता निकाल भाजप आघाडीच्या बाजूने लागलाच आहे आणि त्यामुळे जिल्हा पंचायतींना अधिकार देण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेला शब्द खरा ठरेल, अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही.

राज्यातील ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने अपेक्षित यश मिळवले आहे. मात्र, जिल्हा पंचायती पूर्णपणे काबीज करण्याचा भाजपचा दावा काही प्रमाणात फोल ठरला. विरोधकांनी आपापले मतदारसंघ राखण्यात यश मिळवले. विरोधकांच्या मतांची विभागणी ही भाजपच्या काही ठिकाणी पथ्यावर पडली, हे स्पष्ट झाल्याने जिल्हा पंचायतीच्या निकालांचा काहीतरी बोध विरोधक घेणार आहेत काय, हा खरा प्रश्न आहे.
सत्ताधारी भाजप–मगो युतीच्या विरोधातील मतांची टक्केवारी पाहिल्यानंतर लोकांना लाचार किंवा गुलामीचा दोष देण्यापूर्वी विरोधकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणून त्यागाची भावना ठेवली, तरच भाजपला टक्कर देणे शक्य आहे.
गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने ‘डबल इंजिन’च्या नावाखाली सर्वत्र आपल्या संघटनेचा विस्तार केला आहे. सासष्टी वगळता, सत्तरी, ताळगांव, कळंगुट आदी काही मोजकेच व्यक्तीकेंद्रीत भाग वगळता इतरत्र भाजपने आपली उपस्थिती मजबूत केली आहे. भाजप–मगो युतीने ही निवडणूक एकत्र लढवली खरी, परंतु युतीच्या उमेदवारांचे निकाल पाहिल्यानंतर तिथे काही प्रमाणात आंतरिक दुरावा असल्याचे अधोरेखित झाले आहे. हे विषय भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्षांना निकालात काढावे लागतील; अन्यथा त्याचा फटका विधानसभेत बसू शकतो, हे या निकालांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुका केवळ भावनिक मुद्द्यांवर लढविण्याचे दिवस संपले आहेत. संघटना मजबूत करून लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे हेच निवडणुकीच्या यशाचे गमक आहे. केवळ कार्यालयांत बसून पत्रकार परिषदा घेणे आणि सोशल मीडियावरून बरळणे हे मनोरंजन मते मिळवून देऊ शकत नाही. सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर तसेच राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टींवर आक्रमकपणे व्यक्त होणे हे विरोधकांचे काम आहेच; परंतु ही आक्रमकता कायम उपयोगी पडत नाही. लोकांप्रती मवाळ आणि आत्मीयता दाखवून काही विषय मवाळ पद्धतीने हाताळणे तेवढेच गरजेचे आहे.
महाभारतात सगळेच योद्धे लढले, परंतु त्यात श्रीकृष्णाच्या कूटनीतीचा मोठा वाटा होता. या कूटनीतीचा वापर जोपर्यंत विरोधक करत नाहीत, तोपर्यंत केवळ बळाच्या आधारावर युद्ध जिंकता येणार नाही, याचे भान विरोधकांना ठेवावे लागेल.
महाराष्ट्रात विरोधकांची एकजूट असूनही तिथे भाजप महायुतीला पराभूत करणे त्यांना शक्य झाले नाही. युती किंवा आघाडी केवळ शारीरिक असून चालत नाही, तर ती आत्मिक हवी. ध्येय स्पष्ट हवे आणि विचार शुद्ध हवेत. कुणाच्या मनात कपट असेल, तर या युती किंवा आघाडीचा काहीच उपयोग नाही. विरोधातील सर्व पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना काळजातून आणि मनातून भाजपचा पराभव व्हावा असे वाटते काय, याची त्यांनी पहिल्यांदा खात्री करून घेणे गरजेचे आहे.
भाजपसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही चुका सुधारण्याची संधी या निकालाने दिली आहे. पक्षाकडे ३३ आमदारांचे पाठबळ असताना पूर्ण जिल्हा पंचायती काबीज करण्यात पक्ष कुठे कमी पडला, याचा अभ्यास भाजपला करावा लागेल. अनेक ठिकाणी विरोधकांच्या मतांची विभागणी त्यांना फायदेशीर ठरली. तिथे नेमके काय चुकले, याचाही आढावा घेणे अपेक्षित आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांनाही या निकालांतून बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आता नेमका यातून बोध घेतला जाईल की लोकांना गृहीत धरले जाईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल. निकाल भाजप आघाडीच्या बाजूने लागलाच आहे आणि त्यामुळे जिल्हा पंचायतींना अधिकार देण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेला शब्द खरा ठरेल, अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President