नवीन तुये हॉस्पिटल प्रकरणी जनतेची फसवणूक
तुये हॉस्पिटल कृती समितीची तीव्र नाराजी

तुये हॉस्पिटल कृती समिती, पेडणे महालातील जागृत पत्रकार आणि त्यांना साथ देणारी पेडण्याची जनता यांनी आरोग्याशी संबंधित गोमेकोशी संलग्न तुये हॉस्पिटल हा विषय राजकारणासाठी पाठपुरावा केलेला नाही. त्यांचा उद्देश फक्त सुयोग्य आरोग्य सेवा शाश्वत पद्धतीने पेडण्याच्या जनतेला मिळाव्यात हा आहे. म्हणूनच ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून या नवीन हॉस्पिटलाशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर आणि कार्यपद्धतीवर बारीक लक्ष ठेवत आहेत.


नवीन हॉस्पिटलच्या नित्य कार्यात कुठेही ढवळाढवळ न करता सरकार, आरोग्य यंत्रणा आणि गोमेको लिंक हॉस्पिटलाशी संबंधित डॉक्टर व अधिकाऱ्यांना व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी मदत करणे, तसेच वर्तमानपत्रातून जाहीर झालेल्या विविध आरोग्य सेवांच्या निविदांचा दिलेल्या मुदतीत पाठपुरावा करून त्या सेवा जनतेसाठी उपलब्ध करून देणे, याच कारणासाठी कृती समिती आजपर्यंत निरीक्षण करत आली आहे.
कित्येक कोटी खर्च करून आणि महत्त्वाच्या आरोग्य सेवांच्या मशिनरीचे इन्स्टॉलेशनसाठी निविदा प्रक्रियेत असताना, अपुरे हॉस्पिटल २ फेब्रुवारीला घाईगडबडीत दुसऱ्यांदा उद्घाटन करण्यात आले. हा फक्त देखावा होता. हॉस्पिटलच्या भिंतीवर आपली नावे कोरून सवंग प्रसिद्धी आणि श्रेय मिळविण्याच्या अभिलाषेने राजकारण्यांनी घडवून आणलेले हे राजकीय कारस्थान होते, हे शेंबडे पोरसुद्धा सांगू शकेल.
राजकारण्यांचे हे घाणेरडे डावपेच पेडणेकर जनता आणि तुये हॉस्पिटल कृती समितीला लक्षात न येण्यासारखे नाहीत. मात्र सरकारकडून असा प्रचार केला जातो की कृती समिती राजकारण करून सरकार आणि स्थानिक आमदाराला काम करू देत नाही. त्यामुळे आमदारभक्त आणि अंधभक्त पेडणेकरांकडून कृती समितीवरच दोषारोप होण्याची शक्यता अधिक आहे.
अर्धवट आरोग्य सेवांच्या सोयींसह घाईगडबडीत उद्घाटन करून जे रुग्ण तपासणीसाठी येतात त्यांना अपुऱ्या सेवांचा अनुभव मिळावा, यासाठीच हा प्रकार घडवून आणला गेला. निविदांचा कालावधी मे महिन्यापर्यंत म्हणजे चार महिन्यांचा असल्याने कृती समितीने चार महिने शांत राहून घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवणे आणि पाठपुरावा करणे सुरू ठेवले आहे. दोन महिन्यानंतर २० एप्रिलला समितीने पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला आणि दाखवून दिले की तुये हॉस्पिटल कृती समिती जागृत आहे. आता दीड महिना शिल्लक आहे.
ज्याअर्थी नवीन गोमेको लिंक तुये हॉस्पिटलचे उद्घाटन होऊन जेमतेम अडीच महिने झाले आहेत आणि ज्या मतदारसंघात हे भव्य आधुनिक हॉस्पिटल सुरू करून सरकारने भाषणे ठोकून जनतेच्या टाळ्या घेतल्या, त्याच हॉस्पिटलच्या हाकेच्या अंतरावर स्थानिक राजकारणी आरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. यावरून सिद्ध होते की नवीन हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात अपयशी ठरत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
सरकारने पेडणेकरांच्या तोंडाला पाने फुसू नयेत आणि खोटे सांगून जनतेची दिशाभूल करू नये. जनता खुळी नाही, हे राजकारण्यांनी जाणून घ्यावे. दररोज फक्त पन्नास रुग्णांचीच तपासणी होत असेल आणि इतरांना सेवा देण्यात हॉस्पिटल सक्षम नसेल, तर अर्धवट हॉस्पिटलचे उद्घाटन घाईगडबडीत का केले, हा प्रश्न जनता सरकारला आणि स्थानिक आमदारांना विचारत आहे.
गोमेको लिंक तुये हॉस्पिटलात दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे. त्याची तजवीज सरकारने करावी. अन्यथा तुये हॉस्पिटल कृती समितीने तात्पुरते स्थगित ठेवलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यावाचून पर्याय नाही.
पेडणेकरांची जनहितरक्षक तुये हॉस्पिटल कृती समिती आणि तिला साथ देणाऱ्या विविध सामाजिक-सांस्कृतिक संघटना सरकारला जाहीर इशारा देत आहेत की दीड महिना अजून शिल्लक आहे. मात्र ज्या कासवगतीने निविदा काढल्या आहेत, त्याचा वेग अजून दिसत नाही. सरकारला आणखी वेळ हवा असल्यास जाहीररीत्या पेडणेकरांना सांगा.
जर अपुऱ्या सेवांमुळे रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून छुप्या मार्गाने षडयंत्र रचले जात असेल, तर हे लक्षात ठेवावे की तीन भगवतींच्या अधिपत्याखाली हे भव्य हॉस्पिटल उभारलेले आहे. दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी ओठावर एक आणि मनात दुसरा स्वार्थ ठेवणाऱ्यांना तीनही भगवती मिळून पेडणेकरांना फसविणाऱ्यांचा महीषासुर करणार, हे सत्य आहे.


— व्यंकटेश विश्वनाथ नाईक
निमंत्रक, पेडणे तालुका विकास समिती
सदस्य- तुये हॉस्पिटल कृती समितीचे

  • Related Posts

    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    भरपाई, रोजगार आणि जमीन हक्कांबाबत जमीन मालकांचा जाब गांवकारी,दि.१(प्रतिनिधी) इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारण्यासाठी जमिनी घेताना स्थानिकांना दाखवलेली विकास आणि रोजगाराची स्वप्ने नेमकी कुठे गेली, असा सवाल उपस्थित करत तुयेतील…

    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    AICC General Secretary and Punjab in-charge Sachin Pilot will join the Congress party’s ongoing Goy Rakhonn Yatra in the Sakhlim (Sanquelim) constituency on October 2 as part of a special Gandhi Jayanti programme. Pilot will walk with the Yatris to highlight issues concerning Goa’s land, environment, employment, heritage, governance and identity.

    You Missed

    01/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 1, 2026
    • 12 views
    01/10/2026 e-paper

    कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 1, 2026
    • 17 views
    कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या

    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 1, 2026
    • 20 views
    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 1, 2026
    • 24 views
    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 15 views
    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 29 views
    30/09/2026 e-paper