आमदार जेनिफर मोन्सेरात यांना अखेरचा निरोप
ताळगांव, दि. २० (प्रतिनिधी)
ताळगांवच्या आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या अंतिम दर्शनासाठी आज सकाळपासून काझा मोन्सेरात बंगल्यावर जनसागर उसळला होता. सर्वसामान्यांपासून विशेषजनांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणावलेले कडे दिसत होते. त्यांच्या सुस्वभावी, नम्र आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वाचे हेच खरे दर्शन होते.
सकाळी ताळगांव येथील काझा मोन्सेरात बंगल्यावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, विरोधकांसह असंख्य लोकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांना काही क्षण अश्रू अनावर झाले. ताळगाव येथून पार्थिव बाहेर काढून सांतइनेज हिंदू स्मशानभूमीकडे नेण्यात आले. त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
कर्करोगाशी झुंज निष्फळ
जेनिफर मोन्सेरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. वयाच्या ५६व्या वर्षी, रविवारी १९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या पत्नी तर पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात यांच्या मातोश्री होत. गोवा विधानसभेत निवडून आलेले पहिले दांपत्य म्हणून बाबुश आणि जेनिफर मोन्सेरात यांची ओळख होती. तसेच भाजप सरकारमधील एकमेव महिला मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले होते.
राजकीय प्रवास
जेनिफर मोन्सेरात यांनी आपल्या पतीसोबत राजकारणात प्रवेश केला असला तरी स्वतःच्या मेहनतीने आणि लोकाभिमुख कार्यशैलीने वेगळा ठसा उमटवला.
• २००४ मध्ये ताळगांव पंचायतीवर पंचसदस्य म्हणून निवड.
• २००५–२००७ दरम्यान उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद.
• २००७ मध्ये सांताक्रुझ मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पराभव.
• २००९–२०१२ या काळात ताळगांवच्या सरपंचपदी कार्यरत.
• २०१२ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार म्हणून विधानसभेत प्रवेश.
• २०१७ मध्ये पुन्हा काँग्रेसच्या आमदार.
• २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून प्रमोद सावंत सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री (२०१९–२०२२).
• २०२२ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर विजय मिळवून पुन्हा आमदार.
पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार आणि मंत्री अशी सर्व पदे भूषवून त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधित्व केले.
सुस्वभावाची देणगी
जेनिफर मोन्सेरात यांची ओळख एक सुस्वभावी, नम्र आणि आदराने वागणारी नेत्या म्हणून होती. बाबुश मोन्सेरात यांच्या पत्नी म्हणून त्यांची ओळख मर्यादित राहिली असली तरी त्यांच्यात कधीही गर्विष्टपणा नव्हता. सर्वांशी आदराने बोलण्याची त्यांची सवय लोकांच्या मनात घर करून गेली होती.
गेल्या दोन वर्षांत आजारामुळे त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिल्या होत्या. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकारणात एक सुस्वभावी, लोकाभिमुख आणि आदरणीय नेत्या गमावली गेली आहे.






