‘तिसऱ्या शक्ती’च्या नियंत्रणाचा गंभीर आरोप; आमदारांचे ‘प्रगतिपुस्तक’ सार्वजनिक करण्याची मागणी
मडगाव,दि.१६: गोवा काँग्रेसमधील उत्तरदायित्व, अंतर्गत लोकशाही आणि जनतेचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वैयक्तिक हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसच्या विचारसरणीचे १९७९ पासून कट्टर समर्थक आणि हितचिंतक असलेले विशाल पै काकोडे यांनी केली आहे. खर्गे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी गोवा काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गोवा काँग्रेसवर आरएसएस-भाजपशी जवळीक असलेली एक ‘तिसरी शक्ती’ नियंत्रण ठेवत असल्याचा गंभीर आरोप पै काकोडे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या कामकाजाचा तातडीने आढावा घेण्याची मागणी त्यांनी केली.
एआयसीसीने गोव्यासाठी नियुक्त केलेले प्रभारी आणि सहप्रभारी प्रत्यक्षात तळागाळापर्यंत किती पोहोचले, याचेही मूल्यमापन व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनी किती बूथना भेटी दिल्या, किती बूथस्तरीय व तळागाळातील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि पक्ष मुख्यालयातील बैठकांपलीकडे संघटना मजबूत करण्यासाठी कोणते प्रयत्न केले, याचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
चुकीच्या क्रमांकावर संदेश; संघटनात्मक गोंधळावर बोट
निवडणूकपूर्व आघाडीतील एकमेव आमदार तथा मित्रपक्षाच्या अध्यक्षांना पाठवायचा संदेश विरोधी पक्षनेत्यांकडून चुकीच्या क्रमांकावर पाठविला गेल्याच्या घटनेचाही पै काकोडे यांनी पत्रात उल्लेख केला आहे. अशा घटना वारंवार होणाऱ्या संघटनात्मक गोंधळाचे निदर्शक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याच पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी आयोजित बीएलए आणि बूथ कार्यकर्ता मेळाव्याच्या नियोजनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मी बीएलए किंवा बूथस्तरीय कार्यकर्ता नसतानाही मला या मेळाव्याचे निमंत्रण का देण्यात आले?” असा सवाल त्यांनी केला. अशा प्रकारच्या निमंत्रणातून संघटनेतील समन्वयाचा अभाव दिसून येतो आणि कार्यकर्त्यांचा मेळावा हा केवळ गर्दी जमविण्याचा उपक्रम ठरू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
काँग्रेसच्या तिन्ही आमदारांचे ‘प्रगतिपुस्तक’ जाहीर करा
गोवा विधानसभेतील काँग्रेसच्या कामगिरीचेही पक्षश्रेष्ठींनी मूल्यमापन करावे, अशी मागणी पै काकोडे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेसच्या तिन्ही आमदारांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेऊन त्यांचे ‘प्रगतिपुस्तक’ जनतेसमोर सार्वजनिक करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर गेल्या चार वर्षांत लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून काँग्रेस आमदारांनी नेमके कोणते काम केले, कोणते महत्त्वाचे विषय हाताळले आणि त्यातून जनहिताच्या दृष्टीने काय निष्पन्न झाले, याचा तपशीलही सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली.
दोन मतदार ओळखपत्रांच्या आरोपाची चौकशी करा
पै काकोडे यांनी पत्रातून आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातील एका संपर्क अधिकाऱ्याकडे वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या मतदारसंघांत नोंद असलेली दोन मतदार ओळखपत्रे असल्याचा आरोप असून त्याची पक्षपातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या आरोपातील तथ्य स्वतंत्रपणे पडताळले जाणे आवश्यक असले, तरी अशा गंभीर आरोपावर पक्षाने मौन बाळगणे योग्य नसल्याचे पै काकोडे यांचे म्हणणे आहे. विशेषतः राहुल गांधी यांनी देशपातळीवर उपस्थित केलेल्या ‘व्होट चोरी’च्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर गोवा काँग्रेसने अशा आरोपाबाबत स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोव्यात काँग्रेसला पुन्हा जनविश्वास मिळवायचा असेल तर केवळ बैठका आणि मेळावे पुरेसे नसून उत्तरदायित्व, पारदर्शकता, अंतर्गत लोकशाही आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद या बाबींना प्राधान्य द्यावे लागेल, अशी भूमिका पै काकोडे यांनी मांडली आहे. त्यामुळे खर्गे यांनी गोवा काँग्रेसच्या सद्यस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सुधारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.





