गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

पेडणे/थिवी, दि. ३० (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा वर्षांत उत्तर गोव्यात सर्वसामान्यांचा अपेक्षित विकास झाला नाही; मात्र सत्ताधारी नेत्यांचा विकास झाला. गोव्याच्या जमिनी बिल्डर लॉबी आणि खासगी विद्यापीठांच्या घशात घालण्याचे काम सत्तेतील नेत्यांनी केले असून त्याला भाजप सरकारची साथ मिळाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. गोव्याची जमीन, पर्यावरण आणि भावी पिढीचे हित जपण्यासाठी अशा प्रवृत्तींना सत्तेतून दूर करा, अशी साद ‘गोंय राखण यात्रे’च्या पेडणे-थिवी टप्प्यातून देण्यात आली.

काँग्रेसने बुधवारची यात्रा ‘नारी शक्ती’ला समर्पित केली होती. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार अल्टन डिकॉस्टा, माजी मुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यासह प्रदेश व स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले.

समारोप सभेत बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या प्रश्नावर टीका केली. खासगी विद्यापीठांसाठी जमिनी, बेसुमार खाणकाम आणि नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास याबाबत सत्ताधाऱ्यांनी लोकहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी काळात जनतेने या कारभाराला राजकीय उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर निशाणा साधत राज्यात जमिनींची लूट सुरू असल्याचा आरोप केला. “केस टू केस नव्हे, तर सुटकेस टू सुटकेस योजना सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली. आमदारांची पक्षांतरेही याच राजकारणाचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणनेला प्राधान्य देऊन ओबीसी, एसटी, एससी तसेच लहान समुदायांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी भाजप आणि मगोवर टीका करताना, पूर्वी विकासकामांभोवती राजकारण होत असे; मात्र आता राजकारण आणि रिअल इस्टेट यांचे नाते वाढल्याचा आरोप केला. बहुजन समाजाला रोजगार आणि घरे देण्याऐवजी जमिनी विकणे व खासगी विद्यापीठांना प्रोत्साहन देणे हा विकास होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

खासदार विरियातो फर्नांडिस यांनी ‘गोंय राखण यात्रा’ ही केवळ काँग्रेसची नसून गोव्याच्या जमीन, ओळख आणि भवितव्याची चिंता असलेल्या सर्व गोमंतकीयांची यात्रा असल्याचे सांगितले. खासगी विद्यापीठांमुळे स्थानिक आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत त्यांनी या धोरणांना पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारांनी जाब विचारावा, असे आवाहन केले.

तत्पूर्वी पेडणेत काँग्रेसचे स्थानिक समन्वयक अॅड. जितेंद्र गावकर आणि निलेश कांबळी यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क अभियान राबविण्यात आले. पेडणे बाजारपेठेत झेंडा फडकावून यात्रेच्या नवव्या दिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. कमलेश्वर मंदिर-देऊळवाडा, कोरगाव, पेडणे बाजारपेठ, हुतात्मा स्मारक, पत्रादेवी तसेच दोन खांब-धारगळ परिसरात कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस कनेक्ट’ची पत्रके वाटून नागरिकांशी संवाद साधला.

दुपारी अस्नोडा कदंब बसस्थानक परिसरातून हुतात्मा बाळा राया मापारी यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. थिवी मतदारसंघात सायंकाळी यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी कोंकणी लोकनृत्ये आणि लोकगीतांच्या माध्यमातून गोव्याची संस्कृती, परंपरा आणि लोककला जपण्याचा संदेश देण्यात आला. सिरसई येथील नृत्यलक्ष्मी डान्स ग्रुपच्या देशभक्तिपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

  • Related Posts

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    रमेश तवडकर यांना पूर्ण विश्वास गांवकारी,दि.३०(प्रतिनिधी) राज्यातील अनुसुचित जमातीला राजकीय आरक्षणाच्या विषयावर आपण केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी उपेंद्र जोशी यांच्यामार्फत या गोष्टीकडे आपण जातीने लक्ष ठेवून…

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    अनधिकृत बांधकामप्रकरणी पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर रोजीगांवकारी,दि. ३० (प्रतिनिधी) क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या कथित अनधिकृत बांधकामाच्या नियमितीकरणाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेतली आहे. याचिकाकर्ते…

    You Missed

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 11 views
    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 20 views
    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 16 views
    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 23 views
    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 27 views
    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 15 views
    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain