वेळ्ळीत गोय राखण यात्रेला प्रतिसाद; जमीन, पर्यावरण आणि गोव्याच्या अस्मितेच्या रक्षणाचा निर्धार
गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) : गोव्यात २०२७ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सागरमाला प्रकल्प आणि प्रस्तावित उपग्रह बंदर प्रकल्प रद्द करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार एल्टोन डिकास्टा यांनी केली. गोव्याची जमीन, पर्यावरण, मच्छीमारांची उपजीविका आणि स्थानिकांचे हित धोक्यात घालणारे प्रकल्प खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
गोय राखण यात्रेच्या १९व्या दिवशी वेळ्ळी मतदारसंघातील आसोळणा, चिंचिणी आणि आंबेली परिसरातून यात्रा काढण्यात आली. आसोळणा बाजारात यात्रेची सांगता झाली. यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कुणबी समाजाच्या पारंपरिक नृत्याने यात्रेत सांस्कृतिक रंग भरला.
सागरमाला प्रकल्प रद्द केल्याचे सरकार सांगत असताना मालवाहतुकीसाठी सर्वेक्षण सुरू असल्याच्या वृत्तांवर एल्टोन डिकास्टा यांनी प्रश्न उपस्थित केला. बंदरविकासाच्या नावाखाली स्थानिक मच्छीमार आणि किनारपट्टीवरील गावांचे भवितव्य धोक्यात आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दांडेआवाडो येथील प्रलंबित बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्याची स्वतंत्र अस्मिता, संस्कृती आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी गोमंतकीयांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. डॉ. राम मनोहर लोहिया, डॉ. ज्युलिआओ मेनेझिस आणि १९६७ च्या जनमत कौलाच्या ऐतिहासिक संघर्षाचे स्मरण करून त्यांनी गोव्याच्या रक्षणासाठी पुन्हा एकजूट आवश्यक असल्याचे सांगितले. प्रस्तावित धर्मांतरविरोधी विधेयकामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. आम आदमी पक्षावर टीका करताना विरोधी मतांच्या विभाजनामुळे भाजपला फायदा झाल्याचा दावाही त्यांनी केला.
खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी अनिर्बंध जमीन रूपांतरण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि वाढत्या बेरोजगारीबद्दल चिंता व्यक्त केली. राज्याचा आर्थिक विकास होत असल्याचे दावे केले जात असताना गोमंतकीय तरुणांना रोजगारासाठी परदेशात का जावे लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकासाच्या नावाखाली गोव्याची जमीन आणि नैसर्गिक संपत्ती नष्ट झाल्यास भावी पिढ्यांसाठी काय शिल्लक राहणार, असा प्रश्नही त्यांनी केला.
काँग्रेस नेते सावियो डिसोझा यांनी साळ नदीचे प्रदूषण, डोंगरांची नासधूस आणि शेतीच्या जमिनींच्या ऱ्हासाचा मुद्दा उपस्थित केला. जोएल आंद्रादे यांनी वेळ्ळीतील अपुऱ्या आरोग्यसुविधा, मूलभूत सुविधांचा अभाव आणि कुटबण मच्छीमार धक्क्यावरील अस्वच्छतेकडे लक्ष वेधले.
गोव्याची जमीन, पर्यावरण, पारंपरिक व्यवसाय आणि सांस्कृतिक अस्मिता वाचवण्यासाठी जनतेने संघटित होण्याची गरज असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.





