गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) : गोव्यात राजकीय परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव होईल, असा विश्वास तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी व्यक्त केला. तेलंगणात २०२३ मध्ये घडलेल्या सत्तापरिवर्तनाची पुनरावृत्ती गोव्यातही होईल, असे सांगत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. रविवारी केपे आणि कुंकळ्ळी मतदारसंघांतून काढण्यात आलेल्या गोय राखण यात्रेत हजारो नागरिक सहभागी झाल्याचा दावा काँग्रेसने केला.
केपे मतदारसंघातील फातोर्डा येथून सुरू झालेली यात्रा कुंकळ्ळी बसस्थानकावर समाप्त झाली. गोव्याची जमीन, पर्यावरण, अस्मिता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नोकरभरतीतील कथित गैरव्यवहार आणि अमली पदार्थांचा वाढता प्रभाव या प्रश्नांवर यात्रेतून सरकारला लक्ष्य करण्यात आले.
यावेळी बोलताना रेवंत रेड्डी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. गोव्यातील जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा उल्लेख त्यांनी ‘प्रॉपर्टी सावंत’ असा केला. गोव्यात जमीन आणि मालमत्ता माफियांचा प्रभाव वाढत असून सरकार धनदांडग्यांचे हित जपत असल्याची टीकाही त्यांनी केली.
अमली पदार्थांच्या वाढत्या व्यापारामुळे गोव्याची प्रतिमा आणि तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत रेड्डी यांनी तेलंगणा सरकारच्या ‘ईगल’ पथकाचा दाखला दिला. गोव्यात अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्यांमधून नावे वगळली जात असल्याच्या कथित प्रकारांवरून त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.
विरोधकांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला होऊ शकतो, असा इशारा देत रेड्डी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले. देशातील तरुणांच्या प्रश्नांसाठी राहुल गांधी संघर्ष करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी गोय राखण यात्रा ही जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि कथित ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावरून त्यांनी सरकारवर टीका केली. जनतेच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस आता केवळ भाजपशी लढण्याच्या नव्हे, तर भाजपचा पराभव करण्याच्या स्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला.
बाळ्ळीतील पोलिसी कारवाईचा युरींकडून निषेध
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बाळ्ळी येथे यात्रेदरम्यान झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध केला. रस्ते अडवून यात्रेत सहभागी नागरिकांना त्रास देण्यात आल्याचा तसेच आंदोलन करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत असल्याचे सांगत त्यांनी वाढते गुन्हे, महिलांची सुरक्षा आणि जमिनींच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित केला.
गोव्याला राज्याचा दर्जा मिळवून देणे, जनमत कौल आणि कोकणी भाषा चळवळीत काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे आलेमाव यांनी सांगितले. गोय राखण यात्रा ही भाजप सरकारच्या अखेरची सुरुवात असून २०२७ मध्ये काँग्रेस सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केपेचे आमदार एल्टोन डिकोस्टा यांनी ही यात्रा आता जनतेची चळवळ बनल्याचे सांगितले. गोमंतकीय आपल्या जमिनीचे, संस्कृतीचे आणि भविष्याचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरत असल्याचे त्यांनी नमूद केले. यात्रेदरम्यान रस्ते अडविल्यामुळे नागरिकांना लांबचा मार्ग स्वीकारावा लागल्याचा आरोपही त्यांनी केला.
या यात्रेत काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी खासदार फ्रान्सिस्को सार्दिन, सुनील कवठणकर, एम. के. शेख, डॉ. प्रतीक्षा खलप, अर्चित नाईक, अमरनाथ पणजीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गोव्याची जमीन, पर्यावरण आणि अस्मिता वाचविण्यासाठी तसेच बेरोजगारी व भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले, तर असीझ नोरोंहा यांनी स्वागत केले.





