
ही खूण समकालीन संतानी तर ओळखलीच पण शिवाजी महाराजांच्या आजोबांनी मालोजीराजे यांनीदेखील ओळखली. आणि श्रीगोंदे येथे संत शेख महंमदांना जागा दिली.
(आजच्या ईदच्या निमीत्ताने संत शेख महंमद या विठ्ठलभक्ताचे चिंतन)
इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता हा गेल्या तीस-पस्तीस वर्षात पुढे आलेला विषय. डॅनियल गोलमन यांनी त्यावर पुस्तके लिहून तो जगभर पोचवला. या इमोशनल इंटेलिजन्सचे पाच घटक आहेत. एक स्वतःला कोणती भावना जाणवत आहे हे ओळखता येणे, दोन आपल्याला जाणवणारी भावना योग्य तर्हेने हाताळता येणे, तीन समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखता येणे, चार त्याच्या भावनेला योग्य प्रतिसाद देता येणे. आणि पाचवा घटक आहे एंपथाईज करता येणे. एंपथाईज करता येणे म्हणजे दुसर्याच्या जागी स्वतःला कल्पून दुसर्याला काय वाटत असेल याचा अंदाज करण्याची क्षमता!
एंपथीच्या अर्थाचे मी हे लांबलचक वर्णन केले खरे, पण त्याचे ठोस उदाहरण देता येईल का? असा विचार करताना मला साने गुरुजींच्या ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथातील एक ओवी आठवली. ती ओवी मूळात रामदास स्वामींची. पण गुरूजींनी ती अद्वैत वेदांताचा व्यवहार कसा असावा याचे विवेचन करताना सांगितली आहे.
‘आपणास चिमोटा घेतला।
त्याने जीव कासावीस झाला।
आपणावरूनि दुसर्याला।
ओळखित जावे।।
ही ओवी मी जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर संत ज्ञानेश्वर उभे राहीले! ज्ञानू रेड्याच्या पाठीवर बसणाऱ्या आसूडाच्या वेदना स्वतःच्या पाठीवर अनुभवणारे कुमारवयीन संत ज्ञानेश्वर! सर्वत्र ब्रम्ह भरले आहे, याचा साक्षात्कार अनुभवणारे ज्ञानोबा!
ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्वव्यापी ब्रम्हतत्वाचा साक्षात्कार झालेल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते करुणेने ओतप्रोत भरून गेले होते. जणू ब्रम्ह साक्षात्कारासाठी साधना म्हणजे करुणामय होण्याची साधना!
ज्ञानोबा तुकोबांच्या या वारकरी संप्रदायात होऊन गेलेल्या संत शेख महंमद यांच्या कुमारवयातील अशीच एक गोष्ट सांगितली जाते. ते पंधरा वर्षांचे असतानाची ही गोष्ट. धान्य पिकल्यावर सुगीच्या दिवसात खळ्यावर बकरा कापायची होती. बकरा कापण्याच्या कामाला मुलाण्याचे काम म्हणत. हे काम शेख महंमदांच्या कुटुंबाकडे होते. घरातल्या मोठ्यांनी त्या दिवशी शेख महंमदना या कामासाठी पाठवले. तो त्यांच्यासाठी पहीलाच प्रसंग होता. बकऱ्याला कापायच्या ठिकाणी ओढून आणले जात होते. बकरा केविलवाणा ओरडत होता. शेख महंमदांची बकऱ्याशी नजरानजर झाली. बकऱ्याच्या डोळ्यातील भय त्यांनी पाहीले. सुऱ्याला धार काढत असताना त्यांच्या मनात करुणेचा विचार दाटून आला. बकऱ्याची मान कापताना किती वेदना त्याला होतील याचा विचार करत त्यांनी स्वतःच्या करंगळीवरून सूरा फिरवला. असह्य वेदना झाल्या, रक्ताची धार लागली. त्यांनी बकऱ्याला कापण्यास नकार दिला. मुलाण्याच्या मुलाने मुलाण्याच्या कामाला नकार दिला!
हाच मुलगा पुढे ‘चांद बोधले’ या सूफी संताचा शिष्य झाला. चांद बोधले हे सूफी संप्रदायातील कादरी परंपरेचे अनुयायी. या सूफी गुरूने आपल्या मुस्लिम शिष्याला कोणता ग्रंथ द्यावा? त्यांनी त्यांना गोदावरीच्या तीरावर ज्ञानेश्वरीची दीक्षा दिली.
शेख महंमद हे संत एकनाथांचे समकालीन. नाथांचं आणि महंमदांचं एक नातं आहे. नाथांचे गुरू जनार्दनपंत जे देवगिरीचे किल्लेदार होते, ते आणि शेख महंमद गुरुबंधू. पण त्यांच्यात आणखी एक नातं आहे. नाथांनी चारशे वर्षांपूर्वीच्या काळात गोदाकाठच्या वाळवंटात एकटं रडणारं महाराचं मूल उचलून घेतलं होतं, स्वतःच्या घरात महारांना जेवू घातलं होतं आणि स्वतः त्यांच्या घरी जाऊन जेवले होते. ‘विठू सर्वत्र घनदाट’ भरून राहिलेला आहे, याचाच तो व्यवहार होता. पण भेदाभेदात धर्म शोधणाऱ्यांना ते कसं रुचेल? त्यांनी नाथांना बहिष्कृत करण्याचा प्रयत्न तर केलाच, पण त्यांनी पैठणमधल्या महारांना जगणं मुश्किल केलं. जीवाच्या भितीने अनेक महार कुटुंबं पैठण सोडून गेली. भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी सतत भ्रमंतीवर असणाऱ्या शेख महंमदांना त्यातील काही कुटुंबं भेटली. त्यांनी त्यांना आपल्या गावी नेलं आणि आपल्या स्वतःच्या बागेतील जागा दिली. शेख महमंदांनी नाथांचं कार्य पुढं नेलं.
भागवत धर्माचा प्रचार करणारा हा संत म्हणे, ‘शेख महंमद अविंध्य, त्याच्या हृदयी गोविंद।’ करुणा हीच हृदयी गोविंद असल्याची खूण. मुक्या प्राण्यांविषयी करुणा, रंजल्या गांजल्याविषयी करुणा!
ही खूण समकालीन संतानी तर ओळखलीच पण शिवाजी महाराजांच्या आजोबांनी मालोजीराजे यांनीदेखील ओळखली. आणि श्रीगोंदे येथे संत शेख महंमदांना जागा दिली.
शेख महंमदांचे विचार इतके क्रांतिकारी होते की त्यांना लोक कबीराचे अवतार म्हणू लागले. ते हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मातील पाखंडावर कडाडून टीका करीत. त्यांनी मुस्लिम राजांच्या मूर्तीभंजनाविरूद्ध लिहीले. तसेच हिंदूतील देवाला मुरळी वाहण्याविरूद्धदेखील लिहीले. त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांनी त्यांना त्रास दिला.
पण संत कधी वैयक्तीक त्रासाची पर्वा करत नाहीत, कारण मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे निर्गुण निराकार चैतन्य आहे, हे त्यांच्या रोमारोमात भिनलेले असते. मग अशा व्यक्तींना शरीराला दिलेल्या त्रासाचे, मनाला दिलेल्या त्रासाचे काय वाटणार?
संत शेख महंमद लिहीतात,
ब्रम्हपुरीचे तुरूक।
द्वैत गिळोनि जालो एक।
अहं रोडगा भक्षिला।
निजप्रेमाचा प्यालो प्याला।।
सांडवलो आचाराविचारा।
कोणी भला म्हणा बुरा।।
अर्थात हे संताना सहजसाध्य होत नाही. त्यांना त्यासाठी तपस्या करावी लागते. त्यांचे जीवन जेव्हा ध्यासपर्व बनून जाते तेव्हाच हे शक्य होते. देवाचा ध्यास, मुक्तीचा ध्यास, या लौकिक बाजारू जगापलिकडील सत्याच्या शोधनाचा ध्यास! त्याची परिणती सर्वत्र व्याप्त ब्रम्हतत्वाचा साक्षात्कार होण्यात होते. असा साक्षात्कार झाल्यावर संत शेख महंमद सारख्यांच्या मुखातून शब्द निघतात,
ज्यासी रूप नाही रेखा। तो अव्यक्त माझा सखा।
भावभक्तीचिया सुखा। साकारला।।
साकारला हरी। गोकुळांभीतरी।
गवळणी सुंदरी। मोहीयेल्या।।
बारा सोळा गवळणी। त्यात सत्रावी शहाणी।
रखूमाई मुखरणी। अर्धमातृका।।
चौदा भूवन हे गोकुळ। आणि पन्नास गोवाळ।
मांडीयेला खेळ। चराचरी।।
तेथे उन्मनी आखर। निळारंभ तरूवर।
मांडीयेला सूर। स्वानुभवाचा।।
तेथे विराली वासना। आणि निमाली कल्पना।
तेथे सेख महंमदपणा। ठावचि नाही।।
…..
– डाॅ. रुपेश पाटकर