काँग्रेस पक्षाची सरकारकडे आग्रही मागणी
पणजी,दि.१४(प्रतिनिधी)
गोवा कर्मचारी भरती आयोग स्थापन करून लोकांच्या डोळ्यात धुळफेक केलेल्या भाजप सरकारने खात्यांमार्फत नोकर भरतीला प्रोत्साहन देऊन पैशांचा बाजार मांडल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. सोमवारपर्यंत या नोकर भरतीची न्यायालयीन चौकशी मागीतली नाही तर हा घोटाळा घरोघरी नेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेस समितीतर्फे काँग्रेस भवनात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत पाटकर यांनी सरकारला लक्ष्य केले. आसगांव प्रकरणी पिडित कुटुंबाला नव्याने घर बांधून देणार असे जाहीर केलेले मुख्यमंत्री आता नोकर भरतीच्या विषयावरून पिडितांना वसूली करून देणार असे सांगून लोकांची थेट फसवणूक करत आहेत. ज्या तऱ्हेने भाजपचे नेते आज आपल्या संपत्तीची जाहीरातबाजी करत आहेत आणि देणग्या देत आहेत, त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसा खर्च करून या लोकांचे पैसे परत करावेत,असा टोलाही त्यांनी हाणला.
युरी आलेमांव अवतरले
गेले काही दिवस कुठेच दिसत नसलेले विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आज पत्रकार परिषदेत अवतरले. बेरोजगारीत गोवा हे अव्वल राज्य बनले आहे. ही आकडेवारी नीती आयोगानेच जाहीर केली आहे. पैशांच्या बदल्यात सरकारी नोकऱ्या विकणाऱ्या या टोळीचा तपास करण्याचे काम निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावा,अशी मागणी आलेमाव यांनी केली. हे सरकार सर्कस बनले आहे. इथे प्रत्येक खात्याचा स्वतंत्र मुख्यमंत्री बनला आहे. इथे पदे लाखो रूपयांना विकले जात आहेत. सरकारचे प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. नोकर भरतीचा विषय ताजा असतानाच आता बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या देण्याच्या टोळीचाही पर्दाफाश झाला आहे. या सर्व घटनांवरून इथे पद्धतशीरपणे एक टोळीच कार्यरत असल्याचे स्पष्ट होते,असेही ते म्हणाले. कर्मचारी भरती आयोग स्थापन करून त्याची कार्यवाही पुढे ढकलून नोकरी विक्रीला हे सरकार प्रोत्साहन देत आहे,असा आरोपही त्यांनी केला.
मंत्री, आमदारांकडूनच घोटाळ्यांचा पोलखोल
राज्यातील भाजप सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहे. यापूर्वी सरकारातील मंत्र्यांकडूनच भ्रष्टाचार सुरू असल्याची विधाने केली आहेत. एका आमदाराकडून नोकरीसाठी लाच दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. सरकारला आणखी वेगळे पुरावे हवे आहेत काय,असा सवालही या पत्रकार परिषदेत करण्यात आला.