काँग्रेसचा गृहकलह कधी संपणार ?

जखम ताजी असतानाच उपचार झाले असते तर बरे झाले असते; मात्र जखमेचा नायटा झाल्यानंतर उपचार करणे कठीण ठरते. आतापर्यंतच्या घटनांवरून असे दिसते की काँग्रेसला जखमेचा नायटा होण्यातच रस आहे.

राज्यात गेली १४ वर्षे भाजप सत्तेवर आहे. विरोधकांचे नैतिक बळ भाजपने पूर्णपणे कोलमडून टाकले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला फक्त १० महिने बाकी असताना विरोधक खरोखरच भाजपला टक्कर देऊ शकतील का, याबाबत लोकांमध्ये साशंकता आहे. हीच साशंकता भाजपला फायद्याची ठरत आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे आव्हान प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससमोर आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत हेवेदावे आणि कलहामुळे हा विश्वास निर्माण होण्याऐवजी पुन्हा एकदा पक्ष गोंधळात सापडला आहे.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासाठी ही परिस्थिती नवी नाही. २०२२ च्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी पक्षाने तरुण, तडफदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम अमित पाटकर यांची निवड केली. त्यांच्या कुटुंबाचे काँग्रेसशी जुने संबंध असून ते पारंपरिक खाण उद्योजक आहेत. पहिल्यांदाच तरुण चेहरा देण्याच्या हेतूने त्यांची निवड झाली.
यानंतर विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली दोन तृतीयांश आमदार भाजपात गेले. या धक्क्यामुळे काँग्रेसचे नैतिक आणि मानसिक खच्चीकरण झाले. पक्षाचे केवळ तीनच आमदार उरले आणि त्यांच्यातही एकवाक्यता नव्हती. अशा वेळी अमित पाटकर यांनी स्वतःच्या खर्चातून पक्षाला सांभाळण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या उमेदवार निवडीवरून पुन्हा पक्षात मतभेद झाले. तरीही पाटकर यांनी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना विजय मिळवून दिला. भाजपच्या पल्लवी धेंपे यांचा पराभव करून हा विजय मिळवला.
हा विजय पाटकर यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मान्य झाला नाही. त्यांच्या विरोधात प्रचार सुरू झाला. ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी छुपे संबंध ठेवतात, अशी कथा पसरवली गेली. पक्ष संघटनेत त्यांना स्थैर्य मिळू नये म्हणून अडथळे निर्माण करण्यात आले. अखेर निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेतल्याने पक्षात नाराजी पसरली आहे. पाटकर समर्थकांकडून राजीनामे दिले जात आहेत. ही नाराजी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
वास्तविक, गोव्यात प्रारंभी मगो राजवटीनंतर सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेवर होती. गोव्याला मुक्ती मिळवून देणे, घटक राज्याचा दर्जा, कोकणीला राज्यभाषेचा दर्जा या सर्व गोष्टींमध्ये काँग्रेसचे योगदान मोठे आहे. तरीही भाजपने काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फायदा घेत सत्ता काबीज केली.
आजच्या घडीला राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांनी गोव्यात येऊन सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचे शिवधनुष्य उचलले तर काँग्रेसला उभारी मिळू शकते. पण ते शक्य आहे का, हा प्रश्न कायम आहे. पक्ष संघटनेच्या महत्त्वाच्या क्षणी निर्णय घेण्यात होणारा विलंब हा काँग्रेससाठी सर्वात मोठा घात ठरला आहे. जखम ताजी असतानाच उपचार झाले असते तर बरे झाले असते; मात्र जखमेचा नायटा झाल्यानंतर उपचार करणे कठीण ठरते. आतापर्यंतच्या घटनांवरून असे दिसते की काँग्रेसला जखमेचा नायटा होण्यातच रस आहे.
पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी गोव्यासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून थोडा तरी वेळ काढणे गरजेचे आहे. गोव्यातील नेत्यांवर त्यांचा विश्वास नाही, हे त्यांनी ओळखले आहे. तरीही पक्षाला उभारी द्यायची असेल आणि भाजपला सत्तेवरून खाली खेचायचे असेल तर काही प्रमाणात स्थानिक नेत्यांवर विश्वास ठेवावा लागेल. गिरीश चोडणकर यांनीही नाराज घटकांची समजूत काढून त्यांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. पक्षाचे नेतेच एकमेकांना धडा शिकवू लागले तर भाजपला धडा कोण शिकवणार, हा प्रश्न अनुत्तरीत राहण्याचा धोका आहे.

  • Related Posts

    शांत गोव्याला बंदुकीची सलामी ?

    विशेषतः मोठ्या आर्थिक उलाढालीच्या व्यवसायात पैशांच्या वादातून हिंसक मार्गाचा अवलंब होऊ लागला, तर त्याचा परिणाम गोव्याच्या गुंतवणूक आणि पर्यटन प्रतिमेवरही होऊ शकतो. गोवा म्हणजे शांतता, पर्यटन आणि सुरक्षिततेची ओळख. मात्र,…

    धर्मांतरविरोधी विधेयक; राजकीय डाव ओळखा !

    चर्चसंस्थेने विरोधकांना हाताशी धरून या विधेयकाला तीव्र विरोध केला, तर भाजपकडून चर्चसंस्थेवर केले जाणारे धर्मांतराचे आरोप अधिक आक्रमकपणे पुढे केले जातील. राज्य विधानसभेच्या निवडणुकीला अवघे पाच-सहा महिने शिल्लक असताना धर्मांतर…

    You Missed

    At 26, Shavina Shirodkar Takes RGP Helm: Can Gen Z Leadership Reshape Goa’s 2027 Electoral Math?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 30, 2026
    • 9 views
    At 26, Shavina Shirodkar Takes RGP Helm: Can Gen Z Leadership Reshape Goa’s 2027 Electoral Math?

    Enough Is Enough to Intensify Legal Offensive; Karapur, Casinos on Radar

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 30, 2026
    • 13 views
    Enough Is Enough to Intensify Legal Offensive; Karapur, Casinos on Radar

    AAP Questions Mumbai Police Action Against Karapur Protesters; Valmiki Naik Accuses Goa Govt of Failing to Protect Due Process

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 30, 2026
    • 15 views
    AAP Questions Mumbai Police Action Against Karapur Protesters; Valmiki Naik Accuses Goa Govt of Failing to Protect Due Process

    आरजीपीची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर; शविना नाईक शिरोडकर अध्यक्षपदी

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 30, 2026
    • 16 views
    आरजीपीची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर; शविना नाईक शिरोडकर अध्यक्षपदी

    Mumbai Police register FIR over alleged ₹6-crore extortion linked to ‘One Goa’ project in Bicholim

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 30, 2026
    • 16 views
    Mumbai Police register FIR over alleged ₹6-crore extortion linked to ‘One Goa’ project in Bicholim

    Kadamba Withdraws 2007 Penalty-Waiver Policy Amid Rise in Financial Irregularities

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 30, 2026
    • 16 views
    Kadamba Withdraws 2007 Penalty-Waiver Policy Amid Rise in Financial Irregularities