दीक्षेची खूण !

अद्वैत वेदांताचे अध्ययन हे सध्याच्या काळातील माझ्या जीवनातील सर्वात आवडती गोष्ट आहे. त्यामुळे या दर्शनाशी संबंधित ज्या गोष्टींचा संदर्भ मिळतो, त्या मिळवणे हा माझा सहजभाव झाला आहे. मित्र विचारतात, “तुलाच हे सगळं कसं सापडतं?” त्यावर मी उत्तर देतो, “प्रेमात पडलेल्याचे चित्त प्रत्येक ठिकाणी आपले प्रेय शोधण्यापलिकडे दुसरे काय करणार!”
मला केवळ वेगवेगळ्या आचार्यांनी केलेल्या वेदांत विवेचनांचे अध्ययन करण्यात रस आहे असे नाही; मला अधिक रस आहे या चिंतनाचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर काय परिणाम झाला, हे जाणून घेण्यात.
काही महिन्यांपूर्वी मला ‘अद्वयानंद’ या छोट्याशा ग्रंथाचा संदर्भ मिळाला. हा ग्रंथ संत सोहिरोबानाथांनी लिहिलेला आहे. सोहिरोबानाथांचा काळ जरी अठराव्या शतकातील असला, तरी त्यांचा वावर आमच्याच बांदा गावात झाला होता. त्यामुळे त्यांचे नाव लहानपणापासूनच ऐकलेले. बसने बांद्यातून सावंतवाडीला जाताना नाथांना जिथे साक्षात्कार झाला, ते स्थान अनेकदा पाहिलेले. नाथांचे एक वंशज आमचे कलाशिक्षक होते, त्यामुळे त्यांच्या घरी विद्यार्थी म्हणून अनेकदा गेलो होतो.
लहानपणी नाथांची एक गोष्ट ऐकली होती—ध्यानस्थ अवस्थेत असताना काही दुष्टांनी त्यांना विहिरीत ढकलले. ते रात्रभर विहिरीत राहिले, पण ना बुडाले, ना त्यांना इजा झाली. सकाळी लोकांना विहिरीतून भजनाचे स्वर ऐकू आले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांनी त्या दुष्टांविरुद्ध ना तक्रार केली, ना शाप दिला. पण त्यांचा शांत प्रतिकारच त्या व्यक्तींना पश्चात्ताप करायला भाग पाडणारा ठरला.
सोहिरोबानाथांना दीक्षा मिळाल्याचा प्रसंग मला सतत चिंतन करावा असा वाटतो. नाथ सावंतवाडी संस्थानच्या सेवेत होते. गोव्यातील पेडणे आणि डिचोली भागांचे ते कुलकर्णी होते. एकदा त्यांना तातडीने दप्तर घेऊन दरबारात येण्याचा हुकूम आला. नाथ नित्यपूजेला बसलेले होते. “राजाची नोकरी देवाची पूजा शांतपणे करू देत नाही,” या विचाराने ते अस्वस्थ झाले. त्यांनी बांद्याहून सावंतवाडीला जायला सुरुवात केली. ही गोष्ट अठराव्या शतकातील. आज हे अंतर बाईकने वीस मिनिटांत पार होते, पण त्या काळात आठ मैलांचे अंतर पायी कापावे लागे. जंगल, घाट, उन्हाळा—सर्व अडचणींना तोंड देत ते निघाले. वाटेत त्यांनी पिकलेला फणस न्याहारीसाठी घेतला होता.
अर्ध्या वाटेवर घाट लागतो. त्याच्या पायथ्याशी एका शिळेवर बसून नाथ फणस कापत होते, इतक्यात एक बैरागी तेथे आला. नाथांनी फणसाच्या गर्यांचा नैवेद्य त्याच्यासमोर ठेवला. तो बैरागी म्हणजे गहिनीनाथ. त्यांनी नैवेद्य ग्रहण करत नाथांना दीक्षेचा प्रसाद दिला. याच दीक्षेमुळे अच्युत हे सोहिरोबानाथ झाले.
नाथ दरबारात गेले आणि आपले काम पूर्ण केले. पण त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली—आपले कुलकर्णीपद कायमचे सोडले! राजेशाही व्यवस्थेत कुलकर्णीपद म्हणजे आजच्या कलेक्टरच्या पदासारखे. सत्ता आणि प्रतिष्ठेचे प्रतीक. ते सहजपणे सोडण्याइतके निर्मळ मन असणे ही किती मोठी गोष्ट! नाथांचा राजीनामा ही गहिनीनाथांच्या दीक्षेची खूण होती. त्यांच्या निर्मोही प्रवासाची ती सुरुवात होती.
नाथांनी काही वर्षे संसार केला आणि नंतर त्याचा त्याग करून उत्तरेकडे तीर्थयात्रेसाठी गेले. ग्वाल्हेर संस्थानात त्यांचे बालमित्र जीवबादादा बक्षी मोठ्या पदावर होते. त्यांनी नाथांना महादजी शिंद्यांच्या दरबारात नेले. महादजी शूर लढवय्ये होते, पण रसिक साहित्यिकही. त्यांनी स्वतःची काव्यरचना नाथांना दाखवली. नाथांनी ती पाहिली, पण त्यात देवाचे नाव कुठेच नव्हते. शेवटी त्यांनी अभिप्राय दिला—“ही कसली भिकारडी कविता!” असा अभिप्राय केवळ साक्षात्कारी संतच देऊ शकतो. निर्भय आणि मोहशून्य मनच असे बोलू शकते.
नाथ पुढे म्हणाले,

“अवधूत नही गरज तेरी, हम बेपर्वा फकिरी।
सोना चांदी हमको नही चाहिए, अलख भुवन के वासी।”

महादजींसारख्या व्यक्तीला अशा निर्भयतेने उत्तर देणे हे नाथांच्या निर्मोही वृत्तीचे प्रतीक होते. त्याचा परिणाम महादजींवर झाला. नाथांच्या निर्भयतेने त्यांना अंतर्मुख केले.
नाथांच्या जीवनाचे चिंतन करत असताना माझे डॉ. एरिक फ्रॉम यांच्या To Have or To Be? या पुस्तकाचे वाचन सुरू होते. फ्रॉम म्हणतात की आजच्या जगाची खरी समस्या आहे—मालकीची अभिलाषा. औद्योगिकरणानंतर माणसाचे जीवनतत्त्वज्ञान Having mode of existence झाले आहे. हे फक्त वस्तू साठवण्यापुरते मर्यादित नाही, तर ज्ञानार्जनासारख्या पवित्र क्षेत्रातही शिरले आहे. एखादी गोष्ट ऐकून किंवा वाचून स्मृतीत साठवणे म्हणजे ती गोष्ट आपल्या विचारसरणीचा भाग बनवणे नव्हे. ती केवळ साठवून प्रौढी मिरवणे म्हणजे having mode. याच्या विरुद्धची जीवनशैली म्हणजे Being mode of existence जी महान आचार्यांनी आपल्या जीवनात सिद्ध केली आहे.
नाथांनी मिळवलेली जीवनदृष्टी आमच्या जीवनाचा भाग कशी बनेल, हाच खरा मुद्दा आहे. त्यासाठी त्यांच्या जीवनलीलांचे चिंतन आणि स्वतःची सतत तपासणी आवश्यक आहे, यात शंका नाही.
– डॉ.रूपेश पाटकर

  • You Missed

    Tuem Gram Sabha Unanimously Demands Scrapping of Section 39A; Seeks Halt on Projects Pending Carrying Capacity Study

    • By Gaonkaari
    • जुलै 26, 2026
    • 11 views
    Tuem Gram Sabha Unanimously Demands Scrapping of Section 39A; Seeks Halt on Projects Pending Carrying Capacity Study

    Raju Parulekar Questions CJP’s Role, Alleges Political Links Despite Youth-Led Protest Momentum

    • By Gaonkaari
    • जुलै 26, 2026
    • 24 views
    Raju Parulekar Questions CJP’s Role, Alleges Political Links Despite Youth-Led Protest Momentum

    Priority Goa Pushes Opposition Unity, Sets Five-Point Charter Ahead of Goa Elections

    • By Gaonkaari
    • जुलै 25, 2026
    • 18 views
    Priority Goa Pushes Opposition Unity, Sets Five-Point Charter Ahead of Goa Elections

    25/07/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • जुलै 25, 2026
    • 34 views
    25/07/2026 e-paper

    दोतोर, तुमच्याकडूनही उत्तरदायित्व हवे!

    • By Gaonkaari
    • जुलै 25, 2026
    • 21 views
    दोतोर, तुमच्याकडूनही उत्तरदायित्व हवे!

    साक्षीदार फिरले, सीसीटीव्ही निकामी…

    • By Gaonkaari
    • जुलै 25, 2026
    • 24 views
    साक्षीदार फिरले, सीसीटीव्ही निकामी…