”डॉक्टर, तुमचा ॲप्रोच रिडक्शनिस्ट वाटतो !”

(आज १० सप्टेंबर- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. त्या निमित्ताने चिंतन.)
मनोविकारतज्ज्ञ झाल्यापासून अनेक ठिकाणी मत मांडण्यासाठी बोलावले जाण्याचे प्रसंग माझ्यावर अनेकदा आले आहेत. कधी एखादा पत्रकार एखाद्या बातमीवर तज्ज्ञाचे मत म्हणून कोट मागतो, तर कधी एखाद्या घटनेमागील मानसिकता जाणून घेण्यासाठी चर्चासत्रात बोलावले जाते. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला याचे टेन्शन येते. कधी आपण सांगितलेल्या एखाद्या मुद्द्याचा भलताच अर्थ काढला गेला आणि त्यावर वादंग झाला तर काय? किंवा एखादा मुलाखत घेणारा जरा जास्तच हुशार निघाला आणि त्याने अडचणीत आणणारा प्रश्न विचारला तर…? आपल्याला मुत्सद्दीपणे (डिप्लोमॅटिक) बोलण्याचे ट्रेनिंग थोडेच आहे! आपली सवय कशी, तर ओपीडीत येणाऱ्या पेशंटकडून हिस्ट्री घ्यावी, त्याला तपासावे, त्या आधारावर निदान करावे आणि उपचार करावेत. नशीब की आतापर्यंत एखाद्या विषयावर तज्ज्ञ म्हणून जाहीर मत देताना मला क्वचितच अडचणी आल्या आहेत.
एक किस्सा आठवतो. मी प्रॅक्टिस सुरू करून पाच-सहा वर्षे झाली होती. त्या काळात अनेक पेपरांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. या आत्महत्यांवर एक चर्चासत्र आयोजित केले होते. मलाही त्यात मनोविकारतज्ज्ञ म्हणून बोलावले होते. माझ्याशिवाय त्यात सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, शेतीतज्ज्ञ वगैरे मंडळी होती. मला वाटले होते की सगळ्यात शेवटी मला समारोपाची मांडणी करायची असेल. पण सूत्रसंचालकाने सत्राची सुरुवात माझ्याच मांडणीतून करायचे ठरवले. अर्थात, मला त्यामुळे फारसा फरक पडणार नव्हता कारण मी काही इतरांचे ऐकून माझे मत देणार नव्हतो. त्यामुळे इतर काहीही बोलले तरी माझ्या मांडणीत फारसा बदल होणार नव्हता.
मी आत्महत्येची कारणे, निराशेचे आजार, व्यसनांचे आजार, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय, मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची कमतरता, त्याला पर्याय म्हणून थोड्याशा प्रशिक्षणाने स्थानिक मंडळीतून भावनिक प्रथमोपचार देणारी मंडळी तयार करणे, हे मुद्दे मांडले.
माझ्यानंतर शेतीतज्ज्ञांनी किफायतशीर शेती कशी करावी यावर मांडणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या समस्या मांडल्या. खते, बियाणे यांचे वाढते दर, त्या तुलनेत शेती उत्पन्नाचे बेभरवशी दर, नैसर्गिक संकटे, पतपुरवठा वगैरे.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते उभे राहिले. मला वाटले ते सरकारच्या धोरणांवर टीका करतील, आपण केलेल्या धरणे-मोर्च्यांविषयी सांगतील, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या व्यथांवर बोलतील, शेती विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या समस्या डोळ्यांसमोर ठेवून संशोधन करायला हवे असे सांगतील. पण त्यांनी काहीही न सांगता थेट माझ्याशीच संवाद सुरू केला.
ते म्हणाले, “डॉक्टर, तुम्ही जे मुद्दे मांडले, त्यांचे कौतुक करतो.” मला जरा बरे वाटले. कारण अनेक वक्त्यांची भाषणे असतात तेव्हा शेवटचे भाषण सुरू होईपर्यंत पहिले भाषण सगळ्यांच्या डोक्यातून गेलेले असते. या माणसाने माझे भाषण बारकाईने ऐकले, त्यातील मुद्दे आपल्या भाषणात महत्त्वाचे म्हणून मांडले, म्हणून मला बरे वाटले. मीदेखील आता त्यांचे भाषण लक्ष देऊन ऐकू लागलो.
पण पुढच्याच क्षणी त्यांनी म्हटले, “डॉक्टर, तुम्ही रिडक्शनिस्ट तर नाही ना झाला?” हे ऐकून मी एकदम सावध झालो. आता ते माझ्यावर काय टीका करतात याकडे माझे लक्ष लागून राहिले.
ते म्हणाले, “डॉक्टर, पेशंट, औषधे आणि समुपदेशन हे एक मॉडेल झाले. पण यापलीकडे देखील एक मॉडेल आहे.” समोरील श्रोते देखील आता कान देऊन ऐकू लागले.
ते पुढे म्हणाले, “मी एक उदाहरण देतो. मलेरिया तुम्हाला माहित आहे. समजा तुम्हाला मलेरिया झालाय. पण हे तुम्हाला डॉक्टरने निदान करेपर्यंत कळणार नाही. तुम्हाला फक्त थंडी वाजून हुडहुडी भरलीय आणि ताप आलाय इतकेच कळेल. मग तुम्ही डॉक्टरकडे जाल, डॉक्टर तुम्हाला तपासेल, रक्त तपासायला सांगेल. रिपोर्ट पाहून निदान करेल आणि औषधे देईल. तुम्ही बरे व्हाल. पण प्रश्न असा येतो की तुम्हाला मलेरिया कसा झाला? मलेरियाग्रस्त डास चावला म्हणून. तो डास का चावला? कारण तुमच्या घराच्या आजूबाजूला पाणी साचले म्हणून. आणखी एक प्रश्न. दोन माणसे आहेत. एक झोपडपट्टीत राहतो आणि दुसरा बंगल्यात. कोणाला मलेरिया होण्याची जास्त शक्यता? अर्थातच झोपडपट्टीत राहणाऱ्याला. समजा डॉक्टरने गोळ्या लिहून दिल्या, पण झोपडपट्टीत राहणाऱ्या पेशंटकडे पैसेच नसतील तर?”
हे ऐकून मी विचार करू लागलो. हे सामाजिक प्रश्न आहेत, त्यांच्याशी डॉक्टरचा काय संबंध? माझ्या मनात असा विचार येत असतानाच ते पुन्हा माझ्याकडे बघत म्हणाले, “डॉक्टर, तुम्हाला एमिल डरखिम माहीत असेलच. तो म्हणतो, आत्महत्या ही वैयक्तिक कृती दिसत असली तरी तिच्यामागे सामाजिक कारणे देखील असतात.”
ते पुढे म्हणाले, “डॉक्टर, तुम्ही जे मांडलेत ते सगळे मला मान्य आहे. कोणी तात्कालिक रागाने आत्महत्येकडे वळतो, कोणी उदासीच्या आजारामुळे, कोणी मानसिक आजाराच्या सणकेमुळे. त्यावर उपचार झालेच पाहिजेत, हे मान्य आहे. पण डरखिम म्हणतो, जेव्हा आर्थिक मंदी येते तेव्हा आत्महत्यांचे प्रमाण वाढते. एखाद्या देशावर युद्धासारखे आक्रमण होते तेव्हा आत्महत्यांचे प्रमाण कमी होते. ख्रिश्चन धर्मातील कॅथॉलिक संप्रदायापेक्षा प्रोटेस्टंट संप्रदायात आत्महत्यांचे प्रमाण जास्त असल्याचे शंभर वर्षांपूर्वी डरखिमने दाखवून दिले आहे. तेव्हा जर शेतकरी आत्महत्या साथीच्या रोगासारख्या होत असतील, तर त्याचा धोरणात्मक विचार करायलाच हवा.”
ते जे बोलले ते बरोबर होते. एमिल डरखिम नावाच्या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने १८९६ साली ‘आत्महत्या’ या विषयावर संशोधन करून पुस्तक लिहिले होते. त्याचा उल्लेख आमच्या मनोविकारशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात होता. पण परीक्षा झाल्यानंतर मी त्याला पूर्णपणे विसरून गेलो होतो. नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये त्याची गरज लागत नव्हती, त्यामुळे डरखिमच्या सिद्धांतांचे माझ्याकडून पुन्हा वाचन किंवा चिंतन झाले नव्हते.
त्या चर्चासत्रातील महाशयांच्या खोचक भाषणामुळे मी आमच्या मनोविकारशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील डरखिमचे विश्लेषण पुन्हा एकदा वाचून काढले. पुन्हा वाचताना मला खूप मजा आली. कारण यापूर्वी जेव्हा मी त्याचे सिद्धांत वाचले होते, तेव्हा ते फक्त परीक्षेसाठी होते. त्यामुळे त्यावेळी त्यातील रोचक मुद्दे मला जाणवले नव्हते. किती गंमत आहे ना, वाचणं ही एकच क्रिया, पण ती का करतोय यानुसार तिची गोडी बदलते.
डरखिमची मला वाटलेली पहिली रोचक गोष्ट म्हणजे ‘आत्महत्या’ या शब्दाची व्याख्या. त्यासाठी डरखिमने एक पूर्ण प्रकरण खर्ची घातले आहे. मला वाटले, ‘आत्महत्या’ या शब्दात न समजण्यासारखे काय आहे? कोणाही सामान्य माणसाला आत्महत्या म्हणजे काय हे ठाऊक असतेच. पण डरखिम प्रश्न विचारतो, समजा एखाद्या मानसिकदृष्ट्या आजारी माणसाने चौथ्या मजल्यावरील खिडकीतून या भ्रमात उडी मारली की खिडकीपासून तीन फुटांवर जमीन आहे, तर त्याला आत्महत्या म्हणावे का? इथे मृत्यूचे कारण त्याची स्वतःची कृती आहे, पण त्यामागची भावना मृत्यू व्हावा अशी नाही.
डरखिम पुढचा प्रश्न विचारतो, आत्महत्या म्हटले की स्वतःला फास लावणे, हाताची शीर कापणे, स्वतःला पेटवणे किंवा बुडण्यासाठी खोल पाण्यात उडी मारणे अशी काही सक्रीय कृती अपेक्षित असते. पण एखाद्याने अशी कृती केली नाही, उलट जेवण्यासारखी कृती थांबवली, तर त्या प्रायोपवेशनला आत्महत्या म्हणायचे का?
तुम्ही म्हणाल, जर त्याच्या मनात मरण्याची इच्छा आहे, म्हणून ती आत्महत्या. पण डरखिम पुढचा प्रश्न विचारतो, जर एखादा माणूस जीवावर उदार होऊन काही कृती करतो ज्यात मरण्याची शक्यता आहे हे त्याला माहीत असते, पण तो मरण्यासाठी ती कृती करत नसेल आणि तो ती कृती करताना मेला, तर त्याला आत्महत्या म्हणता येईल का? उदाहरणार्थ, सैनिक.
डरखिम विचारतो, समजा सैनिकाने युद्धाच्या आवश्यकतेमुळे ‘हाराकीरी’ केली, तर त्याला आत्महत्या म्हणावे का? एखादा सुईसाईड बॉम्बर असेल, तर त्याला माहीत असते की तो नक्की मरणार, पण त्याचे ध्येय स्वतःला मारणे नसते, तर आपल्या गटाला विजय मिळवून देणे असते. तर त्याला ‘आत्महत्या’ म्हणायचे का?
आणखी एक उदाहरण, जर एखादी व्यक्ती अब्रू वाचवण्यासाठी किंवा ठराविक मूल्यांवरील विश्वास टिकवण्यासाठी स्वतःला ठार मारत असेल, तर? इथे उद्देश स्वतःला संपवणे नसतो, तर अब्रू वाचवणे असतो. उदाहरणार्थ, कर्ज फेडू न शकलेला माणूस दिवाळखोरीमुळे जाणारी लाज टाळण्यासाठी आत्महत्या करतो. इथे हेतू मरण नसतो, तर लाज वाचवणे असते.
हे सगळे वाचल्यानंतर मला जाणवले की यापूर्वी आत्महत्येच्या केसेस पाहताना मी असा विचारच केला नव्हता. ‘आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या’ पेशंटला पाहताना माझे मन तीन गोष्टींचा विचार करत असे:

  1. यामागे तात्कालिक निमित्त आहे का? ती समस्या सुटण्याचा काही मार्ग न दिसल्यामुळे आणि त्या समस्येचे त्या पेशंटच्या दृष्टीने प्रचंड महत्त्व असल्यामुळे त्याने असे केले का?
  2. ही व्यक्ती निराशेच्या आजाराने ग्रस्त आहे का?
  3. या पेशंटला भास, भ्रम वगैरे आजार तर नाही ना?
    या तिसऱ्या प्रकाराचे उदाहरण सांगतो. सुमारे पाच वर्षांपूर्वी मला मेडिसिन वार्डमधून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सत्तावीस वर्षांच्या तरुणासाठी बोलावण्यात आले. मी जेव्हा त्याच्याशी बोललो, तेव्हा तो म्हणाला, “मी प्रेषित आहे. प्रेषिताला जगाच्या कल्याणासाठी बळी जावेच लागते. मी जर बळी गेलो नाही, तर जगात महाप्रलय येईल.” त्याला भ्रम विकृती होती.
    दुसऱ्या एका वीस वर्षांच्या मुलीसाठी मला सर्जरी वार्डातून बोलावण्यात आले होते. तिने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. ती म्हणाली, “दुर्गामाता माझ्याशी बोलते. तिने मला उडी मारण्याची आज्ञा केली.” तिला आवाजाचे भास होत होते. या दोन्ही केसेसमध्ये त्या व्यक्तींना सायकोसिस होता. त्यांना औषधे देऊन त्यांचे भास आणि भ्रम कमी करावे लागले. त्यांना नुसते समजावून काही फरक पडणार नव्हता.
    डरखिमने आपल्या संशोधनासाठी वेगवेगळ्या देशांतून आत्महत्यांच्या संख्येचा डेटा मागवून घेतला. त्याला आढळले की त्याच्या फ्रान्स देशात, शेजारच्या जर्मनीपेक्षा आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याने वेगवेगळ्या धार्मिक संप्रदायांतील आत्महत्यांचे प्रमाण तपासले, तेव्हादेखील त्याला धक्कादायक फरक आढळले. उदाहरणार्थ, कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट हे ख्रिश्चन धर्माचेच उपप्रकार. पण प्रोटेस्टंट संप्रदायात आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते.
    सामान्य नागरिकांपेक्षा सैन्यातील लोकांत अधिक प्रमाण होते, आणि त्यातही साध्या सैनिकांच्या तुलनेत अधिकाऱ्यांमध्ये जास्त. अविवाहित, घटस्फोटित किंवा कुटुंब गमावलेले, एकटे राहणारे लोक विवाहित लोकांपेक्षा अधिक आत्महत्या करतात. मुले नसणाऱ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते.
    याशिवाय डरखिमने एकाच देशातील वेगवेगळ्या काळातील आत्महत्यांचे प्रमाण तपासले. रोमन साम्राज्य कोसळण्याच्या आधी, ऑटोमन साम्राज्य कोसळताना, आर्थिक संकटांच्या वेळी आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. पण १८४८ मध्ये युरोपभर क्रांतीचे लोण पसरले तेव्हा आत्महत्यांचे प्रमाण चक्क कमी झाले होते.
    या अभ्यासातून डरखिमने आत्महत्यांचे तीन गट केले:
  4. इगोइस्टिक आत्महत्या – जे लोक इतरांशी भावनिक दृष्ट्या जोडलेले नसतात. जसे अविवाहित, घटस्फोटित व्यक्ती. मुले असलेल्या लोकांमध्ये आत्महत्या कमी आढळतात. खेड्यातील लोकांपेक्षा शहरातील लोकांमध्ये आत्महत्या जास्त होतात.
  5. ऑल्ट्रीस्टीक आत्महत्या – ज्या व्यक्ती गटाच्या भल्यासाठी स्वतःला संपवतात. उदाहरणार्थ, हाराकीरी करणारे सैनिक, सुईसाईड बॉम्बर्स.
  6. अ‍ॅनोमिक आत्महत्या – ज्या व्यक्तींचे समाजातील स्थान अस्थिर झालेले असते. उदाहरणार्थ, आर्थिक संकटामुळे घडणाऱ्या आत्महत्या.
    समाजातील वंचित घटकांबाबत एक प्रश्न मला इथे आठवतोय, तो म्हणजे “इतकी भयानक वंचितता असताना लोक बंड का करत नाहीत? अशा लोकांत काही करण्याचा उत्साह का दिसत नाही?”
    त्याचे मार्टीन सेलिग्मनने दिलेले उत्तर आहे, ‘लर्नड् हेल्पलेसनेस’ (learned helplessness)! सेलिग्मनने एक गंमतीशीर प्रयोग केला होता. त्याने कुत्र्यांना शॉक द्यायला सुरवात केली. काहीही केले तरी त्यांना शॉक बसणारच. सुरवातीला कुत्रे शॉक बसू लागला की सुटकेसाठी प्रयत्न करत. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे ‘शॉक बसू नये’ म्हणून केली जाणारी कुत्र्यांची धडपड कमी होत गेली. शेवटी तर ते काहीच करेनासे झाले. काहीही केले तरी शॉक थांबवणे आपल्या हातात नाही, आपण असहाय्य आहोत, हे ते शिकले. वंचित समाज घटकांना सातत्याने अपयश सहन करावे लागले तर सेलिग्मनच्या प्रयोगाप्रमाणे ते ‘हेल्पलेसनेस’ शिकतात. त्यावर मात करायची असेल तर त्यांना छोटेसे का होईना यश मिळू शकते असा अनुभव द्यावा लागेल.
    एकदा माझ्याकडे मोटीवेशनसाठी आणण्यात आलेल्या एका मुलाने मला अनपेक्षित उत्तर देत गप्प केले. तो म्हणाला, “सर, माझे आईवडील मला मेडिकलला जाण्यासाठी सतत सांगत असतात. मी अनेक मोटीवेशनल स्पीकर्सचे व्हिडिओ ऐकलेत. तुम्ही देखील मला तेच सांगताय. पण मी कितीही अभ्यास केला तरी मला मेडिकलला ॲडमिशन मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती? मेडिकलच्या जागा काही हजार असतील पण मेडिकलला जाण्यासाठी प्रयत्न करणारे लाखात असतील. मग जिथे शक्यताच कमी आहे, तिथे जाण्यासाठी रॅटरेसमध्ये भाग घेऊन मी माझी मनःशांती का विचलित करू?”
    अशाच प्रकारचे मत माझ्या एका मित्राने मांडले होते. कुमारवयिन मुलांशी बोलताना, त्यांनी मेडिकलच्या किंवा आयआयटीच्या प्रवेश परीक्षांत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी मी मोटीवेट करत असल्याचे एका मित्राला अभिमानाने सांगितले. त्यावर तो म्हणाला, “तू जर याला तुझे सामाजिक योगदान म्हणत असशील तर तो तुझा गोड गैरसमज आहे. तुझ्या या कामाला मी पत्ते पिसण्यापलिकडे दुसरे काही समजत नाही.”
    “कसे काय?”
    “मेडिकल किंवा आयआयटी च्या देशभरातील जागा ठरलेल्या असणार. त्या काही रिकाम्या राहत नाहीत. त्यामुळे तू कोणाला मोटीवेट करण्याआधी आणि मोटीवेट केल्यानंतर डॉक्टरांची किंवा आयआयटीयन ची संख्या वाढेल का? नाही. जास्तीत जास्त असे होईल की तू मोटीवेट केलेला एखादा विद्यार्थी तिकडे प्रवेश मिळावेल. पण त्यामुळे सामाजिक बदल काय होईल? म्हणून म्हणालो तुझे काम पत्ते पिसून पाने बदलण्यासारखेच आहे.” त्याच्या मुद्द्यावर मी आणखी काही बोलू शकलो.
    अशी मला गप्प करणारी माणसे अधून मधून भेटतंच असतात. ती जेव्हा मला पराजित करतात, तेव्हा मला वाईट वाटते हे खरे, पण त्यामुळे ती विचार करण्याचा दुसरा मार्ग दाखवून मला समृद्ध करतात, हे देखील खरे!
    …….
    -डॉ. रुपेश पाटकर
  • Related Posts

    Will Social Service Translate into Votes? Neha Gawas Emerges as Strong Contender for Cumbharjua

    Panaji, 17 August:With the next Goa Assembly election approaching, political activity is gradually gaining momentum across constituencies. In Cumbharjua, one name beginning to attract attention is Neha Shailesh Gawas, Chairperson…

    BJP Government Has Failed Goa on Governance, Law and Protection: Johnson D’Silva

    PANAJI, August 17: Raising serious concerns over law and order, women and child safety, narcotics, unemployment, senior citizens’ welfare and the growing pressure on Goa’s land and environment, senior citizen…

    You Missed

    गोष्ट विकासाच्या सांडपाण्याची…

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 17, 2026
    • 12 views
    गोष्ट विकासाच्या सांडपाण्याची…

    Will Social Service Translate into Votes? Neha Gawas Emerges as Strong Contender for Cumbharjua

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 17, 2026
    • 12 views
    Will Social Service Translate into Votes? Neha Gawas Emerges as Strong Contender for Cumbharjua

    BJP Government Has Failed Goa on Governance, Law and Protection: Johnson D’Silva

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 17, 2026
    • 27 views
    BJP Government Has Failed Goa on Governance, Law and Protection: Johnson D’Silva

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 21 views
    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 17 views
    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 23 views
    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ