३२ विरुद्ध ७ मतांनी निवड
गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी)
सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गांवकर यांची गोवा विधानसभेच्या सभापतीपदी निवड झाली. विरोधकांतर्फे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. निवडणुकीत ३२ विरुद्ध ७ मतांनी डॉ. गांवकर यांचा एकतर्फी विजय झाला. काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. भाजपने हे पद पुन्हा एकदा आदिवासी समाजाला बहाल करून त्या समाजाची सहानुभूती मिळवण्यात यश मिळवले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातून गोविंद गावडे यांना डच्चू दिल्यानंतर त्यांच्या जागी काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांची वर्णी लागली. रमेश तवडकर यांच्याकडील सभापतीपद डॉ. गणेश गांवकर यांना देण्यात आले. गुरुवारी सभापती निवडीसाठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनासाठी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात वगळता इतर सर्व आमदार उपस्थित होते.
उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी सभापती निवड प्रक्रिया पार पाडली. सत्ताधारी आमदारांनी उभे राहून डॉ. गणेश गांवकर यांच्या निवडीला सहमती दर्शवल्यानंतर उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी डॉ. गांवकर यांच्या निवडीची घोषणा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी डॉ. गांवकर यांना सभापतीपदाच्या खुर्चीवर विराजमान केले.
सभापतीपदाची शान आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी डॉ. गणेश गांवकर आपले योगदान देतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. तर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभापतींनी निपक्षपणे कामकाज हाताळण्याची गरज व्यक्त केली. सभापतीपदाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने पक्षीय दबाव झुगारून निपक्षपातीपणे वागण्याची अपेक्षा आहे. डॉ. गणेश गांवकर यांनी विधानसभेच्या विविध समित्यांवर काम केले आहे. सभापतीपदाची जबाबदारी पार पाडताना हा अनुभव त्यांच्या उपयोगी येईल, असे युरी आलेमाव म्हणाले.
जीटीडीसीकडे सर्वांच्या नजरा
सभापतीपदी निवड झाल्यानंतर डॉ. गणेश गांवकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. हे चेअरमनपद नेमके कुणाला मिळेल, याकडे सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या पदावर साळगावचे आमदार केदार नाईक किंवा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नेमकी ही माळ कुणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता सत्ताधारी गटाला लागली आहे.





