
पक्ष मेळावे, आरोग्य शिबिरांतून जनतेशी संवाद
गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सध्या राज्यात झंझावात लावला आहे. एकीकडे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. सावंत तर मतदारसंघनिहाय आरोग्य शिबिरांच्या निमित्ताने आरोग्यमंत्री जनतेशी संवाद साधत आहेत.
सरकारात डॉ. सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यात नेतृत्वावरून शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच आता या दोन्ही प्रमुख नेत्यांनी आपापल्यापरीने जोरदार घोषणाबाजी आणि आश्वासनांची सरबत्ती चालवल्याने राजकीय वर्तुळात तो विशेष चर्चेचा मुद्दा ठरला आहे. आरोग्यमंत्र्यांकडून स्थानिक आमदारांची तोंडभरून स्तुती केली जात आहे, तर मुख्यमंत्री स्थानिक आमदारांना मंत्रीपदाची स्वप्ने दाखवत आहेत. मायकल लोबो यांच्या कळंगुटमध्ये तसेच साळगावांत केदार नाईक यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांची विधाने बरीच व्हायरल झाली आहेत. विश्वजीत राणे यांच्याकडूनही आमदार केदार नाईक, संकल्प आमोणकर, दाजी साळकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले गेल्यामुळे या आमदारांसह त्यांचे कार्यकर्तेही बरेच सुखावले आहेत.
नेतृत्वाच्या विषयावरून पक्ष गोंधळात
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्लीतून पूर्ण पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची खास मर्जी त्यांच्यावर आहे. आत्तापर्यंत त्यांच्या नेतृत्वाबाबत शंका निर्माण करण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्याने त्यांच्या नेतृत्वाची ताकद पक्षाच्या लक्षात आलेली आहे. दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही आपली वेगळी ताकद दिल्लीत तयार केली आहे. पक्षाचे दिल्लीतील अनेक नेते विश्वजीत राणे यांना जवळ आले आहेत. ते थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय नेत्यांना भेटतात आणि त्यांचे वलय निर्माण झाले आहे. या परिस्थितीची माहिती मिळालेल्या अनेक स्थानिक नेत्यांना त्याचे अचंब वाटत आहे. विश्वजीत राणे हे महत्वाकांक्षी नेते असल्यामुळे ते कायम डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकतील का, आणि जर नाही तर मग त्यांची रणनिती काय असेल, या प्रश्नाची उत्तरे शोधण्यावर काही पदाधिकाऱ्यांनी भर दिला आहे.