गांवकारी,दि. ३ (प्रतिनिधी)
गोवा डेअरीच्या १८८ कर्मचाऱ्यांचा जुलै २०२३ पासूनचा महागाई भत्ता (डीए) आणि थकबाकी अद्याप मिळालेली नसल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवार, ४ नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
गोवा डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी पाटकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. वारंवार निवेदने देऊन आणि आश्वासने मिळूनही थकीत रक्कम अदा करण्यात आलेली नाही. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून तो देण्यात होणारी दिरंगाई अन्यायकारक असल्याचे पाटकर यांनी सांगितले.
कर्मचारी दररोज सकाळी ९.३० आणि सायंकाळी ५.३० वाजता निदर्शने करणार आहेत. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचा संयम न पाहता जुलै २०२३ पासूनचा संपूर्ण महागाई भत्ता आणि थकबाकी तातडीने अदा करावी, अशी मागणी पाटकर यांनी केली. कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






