गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) : गोव्याची जमीन, पर्यावरण, रोजगार आणि लोकशाही अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी गोमंतकीय जनतेने काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात परिवर्तन घडविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाला बळ द्यावे, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.
‘गोंय राखोंण यात्रे’च्या १७व्या दिवशी कुठ्ठाळी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. गोव्याशी आपले विशेष नाते असल्याचे सांगून काँग्रेस हा सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकास साधणारा पक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी राज्याबाहेर जावे लागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. गोव्याच्या जमिनी, मालमत्ता आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांचा संदर्भ देत शिवकुमार यांनी पक्षांतराच्या राजकारणावर टीका केली. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गोमंतकीय जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तेलंगणा आणि कर्नाटकनंतर आता गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल
असा विश्वास प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला. गोव्यातील सत्तांतरानंतर २०२९ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस देशाचे नेतृत्व करेल, असे भाकीत त्यांनी केले. ‘गोंय राखोंण यात्रा’ ही केवळ सत्तांतरासाठी नसून गोव्याची जमीन, रोजगार, पर्यावरण आणि लोकशाही अधिकारांच्या रक्षणासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २७ जागा मिळतील, असा दावा केला. काँग्रेस सत्तेवर आल्यास पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या कोळशाशी संबंधित हालचालींना परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. स्थानिक गोमंतकीयांना ८० टक्के रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, बांधकाम व्यावसायिकांना हस्तांतरित केलेल्या जमिनींच्या व्यवहारांची चौकशी करणे आणि दाबोळी विमानतळ नागरी विमानतळ म्हणून सुरू ठेवणे यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मतदार याद्यांमधील कथित फेरफारावरून भाजपवर गंभीर आरोप केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे केवळ बाहुले असून या कथित कटामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनीही लोकशाही आणि संविधानात्मक संस्थांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
यात्रेची सुरुवात वेलसाव येथील क्विनी जंक्शनवर ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर कुएलीशी, थन्नार बाजार, अरवळे आणि सांकवाळ परिसरात नागरिकांशी संवाद साधण्यात आला. बिर्ला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कांसावळी जंक्शनपर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार अल्टोन डिकोस्टा, अॅड. कार्लोस फरेरा, सुनील कवठणकर, एम. के. शेख, फ्रान्सिस सार्दिन्हा, अमरनाथ पणजीकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





