
पुरुषांची मते वेगवेगळ्या बाबतीत विभागली जात असली तरी महिलांची मते एकगठ्ठा प्राप्त करता येतात, हे राजकीय पक्षांनी आपल्या अनुभवातून शिकले आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांत प्रथम माझ्या समस्त गोमंतकीय महिलांना शुभेच्छा. आपल्या गोव्यात महिलांना एक मोठे स्थान प्राप्त आहे. आपली दैवते ही महिलाप्रधान आहेत आणि त्यामुळे महिलांबाबत एक वेगळा आदर आणि सन्मानाची परंपरा, संस्कृती गोव्यात आहे. अर्थात, काळानुरूप ह्यात बदल घडून आत्ताच्या काळात काही अपप्रवृत्तींनी आपल्या समाजात शिरकाव केला आहे खरा, परंतु इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे महिलांना चांगली वागणूक मिळते, हा दावा निश्चितच खोटा ठरणारा नाही.
आपल्या गोव्याचे नेतृत्व कधीकाळी शशिकला काकोडकर या महिला मुख्यमंत्र्यांनी केले होते. ह्यानंतर मात्र महिला या पदापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. कदाचित पुरुषप्रधान संस्कृतीने महिलांत तशी दहशत निर्माण करून त्यांना राजकारणात मागे ठेवले असावे. राजकारणात येऊ पाहणाऱ्या महिलांना बदनाम करण्याची वृत्ती आपल्याकडे बळावली आहे. राजकारणातील महिलांबाबत आपल्याकडे अमर्याद बोलण्याची सवय जडली आहे. त्यामुळे राजकीय वारसा प्राप्त नसलेल्या महिलांना राजकारणात पुढे येणे बरेच कठीण बनते. आत्ताच्या घडीला महिलांसाठीची राजकीय जागा आमदार, मंत्र्यांच्या सौभाग्यवतींनी अडवून ठेवली आहे. या व्यतिरिक्त अन्य कुणी महिला पुढे येत असतील तर त्यांच्या मार्गात काटे पसरवण्याची वृत्ती फोफावत चालली आहे.
गोव्यात मतदारसंख्येच्याबाबतीत महिलांचा आकडा पुरुष मतदारांच्या तुलनेत समान आहे. सगळेच राजकीय पक्ष निवडणूक काळात महिला मतदारांवरच अधिक भर देत असतात. पुरुषांची मते वेगवेगळ्या बाबतीत विभागली जात असली तरी महिलांची मते एकगठ्ठा प्राप्त करता येतात, हे राजकीय पक्षांनी आपल्या अनुभवातून शिकले आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरात सत्ताधारी भाजप पक्षाच्या नेत्यांनी महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महिला स्वयंसहाय्य गटांवर राजकारण्यांची बारीक नजर असते. महिलांना आपल्या कब्ज्यात ठेवल्यानंतर बिनधास्त राहता येते, हे त्यांनी आता ओळखले आहे.
हे सगळे घडत असतानाच ह्याच महिला या राजकारण्यांना उघडपणे जाब विचारण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. एक युवती, पत्नी, माता अशा वेगवेगळ्या रूपात महिला वावरत असते. सरकारच्या प्रत्येक धोरणाचे चांगले वाईट परिणाम हे समाजावर पडत असतात. अशावेळी त्याचे अधिकाधिक परिणाम हे महिलांना या वेगवेगळ्या रूपात वावरताना भोगावे लागतात. कुटुंबातील बेरोजगारी, व्यसनाधिनता, आरोग्याबाबतच्या तक्रारी, कायदा सुव्यवस्था आदींबाबत महिला या पीडित ठरत आहेत. पर्यटनाच्या नावाखाली आज आपल्या अवतीभोवती सुरू असलेला नंगानाच या महिला सहन करून घेणार असतील तर मग त्यांची सुरक्षितता धोक्यात येणे स्वाभाविक आहे. वाढती कॅसिनो संस्कृती, मद्यसंस्कृतीला मिळत असलेले प्रोत्साहन आणि इतर गोष्टींमुळे महिला असुरक्षित बनू लागल्या आहेत. अशावेळी या गोष्टी सुधारण्यासाठी सरकारवर आपला वचक असण्याची गरज आहे. राजकीय नेत्यांच्या आमिषांना आणि भूलथापांना बळी पडून महिलांनी आपली राजकीय शक्ती जर कुणाकडे गहाण ठेवण्याचा प्रकार घडला तर ते त्यांच्यासाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांसाठी आणि राज्य, देशासाठीही धोक्याचे ठरू शकते, हे त्यांनी जाणून घेण्याची गरज आहे. राज्याला एक सक्षम महिला शक्ती ब्रिगेडची गरज आहे. आगामी काळात महिला आरक्षण लागू झाल्यानंतर महिलांना विधानसभेतही संधी मिळणार आहे, परंतु तिथे केवळ आमदार, मंत्र्यांच्या बायका पोहोचणार आहेत की सर्वसामान्य महिलांच्या प्रतिनिधी यावरूनच महिलांचे भवितव्य ठरणार आहे. महिलांनी आत्तापासूनच त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.