मडगाव,दि.२२: मडगांवचो आवाजचे युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात कर्तव्यातील कथित हलगर्जीपणाबद्दल एफआयआर नोंदविण्याची मागणी करत दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. नगरपालिकेच्या ताब्यातील सार्वजनिक मालमत्तांवर वारंवार घडणाऱ्या सुरक्षा त्रुटी या प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रभव नायक यांनी सांगितले की, गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार मडगाव नगरपालिकेसाठी सुमारे २६ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, हे सुरक्षा रक्षक प्रत्यक्षात कुठे कार्यरत आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी त्यांच्या नियुक्तीचा संपूर्ण तपशील जाहीर करण्याची मागणी केली. हे रक्षक नगरपालिकेच्या सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण करत आहेत की त्यांचा वापर इतरत्र केला जात आहे, याची चौकशी व्हावी, असेही त्यांनी म्हटले.
अलीकडेच मडगाव नगरपालिका बागेत झालेल्या फ्री-स्टाईल हाणामारीच्या घटनेचा उल्लेख करत नायक म्हणाले की, त्या वेळी घटनास्थळी एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. त्यामुळे बागेत आलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला. या घटनेनंतरच मुख्याधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, ऐतिहासिक लोहिया मैदानावर घोषणाबाजी करून करण्यात आलेल्या विद्रूपीकरणाच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. ही घटना नगरपालिकेच्या ताब्यातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव अधोरेखित करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पात माजी नगराध्यक्षांनी प्रवेश केल्याच्या घटनेवरही प्रभव नायक यांनी प्रश्न उपस्थित केले. मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केल्याचा दावा केला असला, तरी सुरक्षा रक्षक तैनात असताना हा प्रवेश कसा झाला, असा सवाल त्यांनी केला. जर सुरक्षा रक्षक असूनही प्रवेश रोखता आला नाही, तर ती सुरक्षा यंत्रणेची गंभीर चूक आहे आणि जर तेथे सुरक्षा कर्मचारीच नव्हते, तर नगरपालिकेच्या मालमत्तांच्या सुरक्षेबाबत हे आणखी एक मोठे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले.
या सर्व घटनांचा उल्लेख करत प्रभव नायक यांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदविण्याचे निर्देश द्यावेत, तसेच नगरपालिकेसाठी उपलब्ध करून दिलेल्या २६ सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीची आणि कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.
पक्षांतर केलेले मडगावचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी या घटनांबाबत केलेली विधानेही नगरपालिकेच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज अधोरेखित करतात, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.
“मडगावच्या नागरिकांना सुरक्षित सार्वजनिक ठिकाणे आणि उत्तरदायी प्रशासन मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. सार्वजनिक मालमत्तांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांवर आहे, त्यांनी वारंवार होणाऱ्या सुरक्षा त्रुटींसाठी जबाबदारी टाळू नये,” असे प्रभव नायक यांनी ठामपणे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारी निश्चित करावी आणि नागरिकांचा नगरपालिकेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.





