प्रादेशिक अस्मितेला धोका

गोव्यातील गांवकारी पद्धतीत तसेच विविध गावांतील देवस्थानांच्या कुळदैवत किंवा ग्रामदैवत रचनेत समाविष्ट नसलेल्या घटकाला भाजपने हाताशी धरले आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा अभ्यास केला असता प्रादेशिक अस्मितेचा बावटा घेऊन वावरणाऱ्या प्रादेशिक पक्षांना धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येते. या प्रादेशिक अस्मितेची ताकद ओळखून भाजपने विकास, प्रगती आणि आकांक्षांच्या नावाखाली नव्या पिढीला आपल्या राजकारणाकडे ओढण्यास सुरुवात केली आहे.
प्रादेशिक अस्मिता, संस्कृती, भाषा आदींबाबत नवी युवा पिढी फारशी संवेदनशील नसल्याने त्यांच्या आशा, आकांक्षा आणि जीवनपद्धतीला अनुसरून भाजपने आपले राजकीय डावपेच आखायला सुरुवात केली आहे. पक्षाकडे सर्वाधिक संपत्ती असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या पीडितांना थेट पैशांच्या आमिषाने आपल्याकडे वळवणे सोपे झाले आहे. या एकूणच रणनितीत मतांची बेगमी करून जागा जिंकण्याचे धोरण भाजप यशस्वीपणे राबवत आहे.
पाच राज्यांच्या निकालांचा गोव्यावर नेमका काय परिणाम होईल, याचा विचार केला असता गोवा ही भाजपच्या ह्याच रणनितीची एक वेगळी प्रयोगशाळा ठरू शकते. आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांनी हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले, तो फॉर्म्युला गोव्यात अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजाबाबत वापरता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. अलीकडेच गौतम खट्टरच्या निमित्ताने भाजपने एक चाचणी केली होती. या चाचणीचा निकाल भाजपसाठी आशेचा किरण ठरला आहे.
येथील ख्रिस्ती समाजाचा राजकीय प्रभाव कमी करून केवळ ख्रिस्तीबहुल मतदारसंघापुरता मर्यादित ठेवण्याची व्युहरचना भाजप आखण्याची शक्यता आहे. गोव्यात अनेक हिंदूबहुल मतदारसंघांत ख्रिस्ती आमदार निवडून आले आहेत. म्हापसा, कुडचडे, कळंगुट, शिवोली, हळदोणा, केपे, दाबोळी हे मतदारसंघ हिंदूबहुल असूनही तिथे ख्रिस्ती आमदार निवडून आले आहेत. या मतदारसंघांचे हिंदूत्वात रूपांतर घडवून आणण्याची छुपी रणनिती भाजप खेळणार यात शंका नाही.
ख्रिस्ती आमदारांचे अस्तित्व केवळ सासष्टी तालुक्यापुरते मर्यादित ठेवून त्यांना गोव्याच्या राजकारणात प्रभावहीन करण्याचा डाव भाजप खेळण्याची शक्यता आहे. गोव्यात स्थलांतरित होऊन बरीच वर्षे झालेला आणि आता पक्के कोकणी बोलणारा नवगोंयकार हा भाजपचा सर्वांत मोठा लक्ष्यसमूह आहे.
गोव्यातील गांवकारी पद्धतीत तसेच विविध गावांतील देवस्थानांच्या कुळदैवत किंवा ग्रामदैवत रचनेत समाविष्ट नसलेल्या घटकाला भाजपने हाताशी धरले आहे. या समाजामार्फत हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी विविध संघटनांमार्फत त्यांना जवळ केले जात आहे.
याशिवाय गांवकारी आणि देवस्थान महाजन रचनेत दुर्लक्षित, पीडित किंवा अन्यायग्रस्त घटक या संघटनांच्या अजेंडावर आहेत. बहुजन समाजातील मुळ पीडित घटकांना पुढारपण देऊन स्वतंत्र मंदिरे, धार्मिक स्थळे निर्माण करून पारंपारिक गांवकारी आणि देवस्थान रचना कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नवी पिढी आणि गरजवंत बहुजन समाज यांना कवेत घेऊन त्यांच्या आशा-आकांक्षांना फुंकर घालणे आणि गरजा पूर्ण करण्याची रचना भाजपने विविध संघटनांमार्फत तयार केली आहे. या घटकांमार्फत पारंपारिक देवस्थान रचनेला फाटा देण्याचे काम सुरू आहे.
त्यांना त्यांच्या कुळदैवतांपासून दूर नेऊन पर्यायी देवांच्या भावना जागृत केल्या जात आहेत. पारंपारिक अन्याय, असमानता आणि आत्मसन्मान जागृत करून त्यांना हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या नावाने राजकीय चौकटीत बसवले जात आहे. ही प्रक्रिया सामान्यतः कुणाच्याही लक्षात येणे कठीण आहे.
भाजपचे राजकीय काम तर सुरू आहेच, पण समांतर संघटनांमार्फत छुपे कामही सातत्याने चालू आहे. या कामाकडे राजकीय विरोधक आणि सामाजिक संघटनांचे दुर्लक्ष आहे. या संघटनांनी राज्यातील सामाजिक व धार्मिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे.
या विस्ताराद्वारे प्रादेशिक अस्मितेला कमकुवत करून सर्व घटकांना राष्ट्रीय अस्मितेच्या जाळ्यात अडकवण्याची पद्धतशीर खेळी सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आपल्या विविध चाचण्या आणि प्रयोगांच्या निकालांच्या आधारावर नवा राजकीय प्रयोग राबवणार यात शंका नाही.

  • Related Posts

    १६१ दिवसांच्या लढ्याला विसावा

    पण कारापूरने गोव्याला एक संदेश दिला आहे, सत्ता मोठी असू शकते, पैसा मोठा असू शकतो; मात्र आपल्या मातीसाठी उभा राहिलेला सामान्य माणूस त्याहून मोठा असतो. १६१ दिवसांनंतर कारापूर-सर्वण येथील हाऊस…

    संयमाची परीक्षा घेऊ नका !

    आता राजकीय पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. गोव्याच्या बाजूने उभे राहायचे की गोव्याच्या लुटीच्या बाजूने ? गोवा आज निर्णायक वळणावर उभा आहे. एका बाजूला विकासाच्या नावाखाली जमिनींचे व्यवहार, मोठमोठे प्रकल्प, काँक्रीटची…

    You Missed

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 13 views
    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 11 views
    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    1526–2026: 500 Years of the Foral

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 16, 2026
    • 20 views
    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 31 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 27 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 12, 2026
    • 35 views
    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM