राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

कॅसिनो, मद्य, ड्रग्ज आणि वेश्याव्यवसाय यांच्या भोवती फिरणाऱ्या पर्यटनामुळे समाजावर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

कुडचडे येथील लैंगिक शोषण प्रकरणात फक्त नगरसेवकाचा मुलगा आणि तो नगरसेवक सत्ताधारी भाजपशी संबंधित असल्यामुळेच या विषयाला विशेष जोर दिला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मात्र, एखाद्या नगरसेवकाची किंवा सत्ताधारी पक्षाची बदनामी करण्यापेक्षा या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहणे आणि भविष्यात अशा घटना कशा टाळता येतील, यावर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे.

सत्ता, पैसा आणि अमर्याद स्वातंत्र्य यांमुळे अशा घटना घडतात, हे जरी खरे असले तरी आरोपी आणि पीडित या दोन्ही बाजूंच्या कारणांची सखोल चिकित्सा करणे तितकेच आवश्यक आहे. कोणत्याही कुटुंबात अशा प्रकारचे आरोप निर्माण होऊ नयेत आणि कोणतीही व्यक्ती अशा विकृतीची बळी ठरू नये, यासाठी आवश्यक असलेली जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. या विषयावर अधिक चर्चा, संवाद आणि जनजागृती होणे अत्यावश्यक आहे.

सध्या कुडचडे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून, तपासात एकापेक्षा एक धक्कादायक आणि अकल्पित बाबी समोर येत आहेत. या गोष्टी समोर येणे आवश्यक असले तरी त्या समाजासाठी धोक्याची घंटा आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा प्रसार, सोशल मीडियावरील रिल्स, व्हिडिओ आणि विविध प्लॅटफॉर्म्स यांचा तरुणांवर होणारा प्रभाव लक्षात घेणे आवश्यक आहे. मोबाईलच्या वापरावर कोणतेही नियंत्रण नसणे आणि घरून मिळणारे अमर्याद स्वातंत्र्य यामुळे मुलांच्या मनावर काय परिणाम होतो, हे सांगणे कठीण झाले आहे. कोणत्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील आणि त्यातून कोणते विचार तयार होतील, याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

या घटनेनंतर शिक्षण खात्याने विशेष दखल घेणे आवश्यक आहे. या आरोपीकडून अनेक मुलींचे शोषण झाल्याचे समोर येत असताना, हे प्रकार इतक्या काळ उघड कसे झाले नाहीत, हा गंभीर प्रश्न आहे. शाळांमध्ये समुपदेशक नेमले असताना अशा घटनांची माहिती त्यांच्यापर्यंत का पोहोचली नाही? समुपदेशन ही केवळ औपचारिकता बनली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. जोपर्यंत समुपदेशक विद्यार्थ्यांना मोकळेपणाने बोलण्यास प्रवृत्त करणार नाहीत आणि त्यांच्या मनातील गोष्टी व्यक्त करण्यास प्रोत्साहित करणार नाहीत, तोपर्यंत समुपदेशनाचा काहीही उपयोग होणार नाही.

या संपूर्ण प्रकरणामुळे पालकांची चिंता वाढली आहे. आपल्या मुलांना योग्य प्रकारे कसे वाढवावे, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण कसे ठेवावे, मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून कसे रोखावे आणि मुलींना अशा विकृतींपासून कसे सुरक्षित ठेवावे, याबाबत त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

पोलिस, समुपदेशक, पालकत्व तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारनेही यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. राजकीय जाहिरातींवर कोट्यवधींची उधळण करणारे सरकार अशा गंभीर विषयांवर तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती मोहिमा का राबवत नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.

संपूर्ण जबाबदारी केवळ पालकांवर ढकलून चालणार नाही. पालक आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतात; मात्र समाज आणि सामाजिक वातावरणच जर प्रदूषित झाले असेल, तर मुलांना सुरक्षित ठेवणे अधिक कठीण होते. कॅसिनो, मद्य, ड्रग्ज आणि वेश्याव्यवसाय यांच्या भोवती फिरणाऱ्या पर्यटनामुळे समाजावर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा परिस्थितीत समाज या विकृतींपासून अलिप्त राहील, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे.

या सगळ्या प्रश्नांवर गंभीर चिंतन होणे अत्यावश्यक आहे. अशा घटनांतून आपण काहीही बोध घेतला नाही, तर भविष्यात या घटना सामान्य बनतील. जसे रस्ते अपघात आणि मद्यपानाबाबत समाज हळूहळू असंवेदनशील झाला, तसेच या बाबतीतही होण्याची भीती आहे. मग प्रत्येक जण आपल्या नशिबाला दोष देत बसेल आणि आपला गोवा अधोगतीकडे वाटचाल करेल.

  • Related Posts

    ही नेमकी काय भानगड ?

    या हितसंबंधातूनच जर सरकारने लोकांना अगदीच वाऱ्यावर सोडले असेल, तर हा असंवेदनशीलतेचा आणि अमानवतावादाचा कहरच म्हणावा लागेल. दाबोळी मतदारसंघातील चिखली ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभू व्हायोलेटा रहिवासी संकुलात दूषित पाण्यामुळे तब्बल १६६…

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    मात्र आंदोलन मागे घेण्याच्या महत्त्वाच्या विषयावर मतदारसंघाचे प्रतिनिधीच गैरहजर असतील तर पक्षात गोंधळ असल्याचे दिसते. हा गोंधळ दूर होऊन मिराबागवासीयांचे शंकानिरसन व्हावे आणि हा विषय यशस्वीरित्या सुटावा, हीच अपेक्षा आहे.…

    You Missed

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 19 views
    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 14 views
    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    28/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 39 views
    28/03/2026 e-paper

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 14 views
    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 21 views
    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 21 views
    27/03/2026 e-paper