
ज्या राखणदाराच्या भरवशावर आम्ही गोंयकार बिनधास्तपणे जगत असतो, तोच राखणदार जिथे सुरक्षित नाही, तिथे गोंयकारांचे भवितव्य सुरक्षित राहू शकणार काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
पर्वरी वडाकडेन, आत्तापर्यंतच्या इतिहासात नोंद झालेल्या या स्थळाची ओळख सरकारने एका क्षणात पुसून टाकली. वडाकडेन हे कधीकाळचे पोर्तुगीजकालीन विसव घेण्याचे स्थान. तिथे पूर्वी दवरणी होती. बार्देशातील वाटसरू पर्वरीमार्गे राजधानीच्या वाटेने जाताना दुपार, रात्रीच्या वेळी विश्रांती घेण्याचे हे स्थान. वाटसरूंना अभय देणारे हे वडाचे झाड म्हणजेच राखणदाराची जागा. हा राखणदार या वाटसरूंची राखण करतो, अशी येथील लोकांची भावना. ह्याच ठिकाणी कुडणेकर नामक एक व्यक्तीचा एक लहानसा गाडा होता. सहाजिकच तोच या राखणदाराचा कारभारी बनला. तिथले वाटसरू याठिकाणी विसावा घेत असता आपल्या जगण्यातील सुखदुःख एकमेकांशी व्यक्त करत होते. अशावेळी ही व्यक्ती ह्या राखणदाराकडे सांगणे करून त्यांना अभय देण्याची आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी, क्लेश, संकटे दूर करण्याची प्रार्थना करत असे. मग अनेकांना राखणदाराच्या जागृतपणाची प्रचिती येऊ लागली आणि त्यातूनच हे लोक खास राखणदाराच्या दर्शनासाठी येऊ लागले. याठिकाणी या राखणदाराला माडाची सूर देण्याची प्रथा होती. ती सूर ओतली जाणारा खडक तिथे अजूनही आहे, जो अलिकडेच माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांनी दाखवला होता. आपल्या वडिलांची ती परंपरा पुढे नेताना कार्तिक कुडणेकर यांनी या स्थळाचा विकास केला. तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि या जागेला एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांच्या या कार्यात अनेक स्थानिकांनी त्यांना सहकार्य केले.
गेले चार-पाच महिने कार्तिक कुडणेकर हे स्थळ वाचवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना पक्षाने सोडून दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांची साथ मिळाली. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मदतीने ते दिल्लीत गेले आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना भेटून त्यांनी हे स्थळ वाचवण्याची विनंती केली. तिथून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आणि तिथे खंडपीठाने वडाच्या झाडाच्या पुनःरोपणाला मान्यता दिली. हा विषय वटवृक्षापुरती मर्यादित होता पण ह्यात तेथील श्री खाप्रेश्वराच्या मूर्तीचा समावेश नव्हता. अर्थात सरकारने ही मूर्ती सरकारी जागेत असल्याचे कारण पुढे करून ती हटविली. रोहन खंवटे हे विरोधात असताना ही भाजप मंडळी त्यांच्या विरोधातच वावरली होती. रोहन खंवटे भाजपात दाखल झाले तरीही ही मंडळी मात्र अजूनही विरोधातच आहे. रोहन खंवटे म्हणतात त्याप्रमाणे कार्तिक कुडणेकर यांनीच हे झाड आणि मूर्ती हटविण्याची मान्यता सरकारला दिलेली होती आणि आता ते विरोध करत आहेत. याबाबत कार्तिक कुडणेकरांचे काय म्हणणे आहे, हे समजू शकले नाही. आता तसे पाहील्यास मूळ भाजप आणि नव्या भाजपवाल्यांचाच हा प्रकार म्हणावा लागेल. कार्तिक कुडणेकर हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या विश्वासातील होते तर मग त्यांनी या प्रकरणावर योग्य पद्धतीने तोडगा काढणे शक्य होते. अखेर शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या राखणदाराची इतकी विटंबना करण्याचे कारण नेमके काय ठरले, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे.
ज्या राखणदाराच्या भरवशावर आम्ही गोंयकार बिनधास्तपणे जगत असतो, तोच राखणदार जिथे सुरक्षित नाही, तिथे गोंयकारांचे भवितव्य सुरक्षित राहू शकणार काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळणे शक्य होते तर मग ते देखील याबाबतीत अपयशी का ठरले. खरोखरच या राजकारण्यांमागे कुणीतरी तिसरी शक्ती यामागे वावरते आहे का. जर ते खरे असेल तर मग ही राखणदारालाच आपला महिमा दाखवून त्याचा पोलखोल करावा लागेल.