
भ्रष्टाचाराच्या अड्ड्यांकडे सरकारचे दुर्लक्ष
गांवकारी,दि.२८(प्रतिनिधी)
राज्यातील तीन प्रमुख तथा अन्य दोन असे मिळून पाच आरटीओ चेकपोस्टच्या पोस्टींगसाठी दर सहा महिन्यांनी अप्रत्यक्ष लिलाव होतो. मुख्य चेकपोस्टसाठी दहा लाख तर इतर चेकपोस्टसाठी ५ लाखांची बोली लागते. त्यातून सहा महिन्यांसाठी सुमारे दीड कोटी रूपयांचे कलेक्शन होते, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था केली गेली असताना सीमेवरील चेकपोस्टांवर अजूनही रोख व्यवहाराला मोकळीक का ठेवण्यात आली आहे,असा सवाल अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केला. राज्यातील खाजगी बस व्यवसायिकांना त्यांचे हक्काचे अनुदानाचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण भ्रष्टाचारातून चेकपोस्टावरून कोट्यवधी रूपयांचे कलेक्शन करण्यासाठी मात्र सरकारकडे सगळी यंत्रणा चालते,असा टोलाही त्यांनी हाणला.
पाच तासांत ६३ हजार जमा
वाहतुक खात्याकडून खाजगी बस मालकांच्या मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी संघटनेने वाहतुक खात्याच्या भ्रष्टाचाराच्या अड्ड्यांचा पोलखोल करण्याची मोहीम सुरू केली आहे. गेले दोन दिवस संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर आणि सुदेश कळंगुटकर यांनी दोडामार्ग आणि पत्रादेवी चेकपोस्टांवर धडक दिली. तिथे केवळ पाच तासांत सुमारे ६३ हजार रूपयांची रोकड जमा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. चेकपोस्टसमोर उभे राहील्यानंतर ट्रक तथा अन्य चालक आपणच येऊन हातात नोट देऊन जातात,असेही ते म्हणाले. एकीकडे ऑनलाईन सेवेचा बढेजाव मारताना चेकपोस्टवर रोख व्यवहारांना मोकळीक ठेवून नेमकी कुणाची भर केली जात आहे,असा सवाल ताम्हणकर यांनी केला.
चेकपोस्ट पोस्टींगसाठी बोली
राज्यात पत्रादेवी, पोळे आणि मोले हे तीन प्रमुख आरटीओ चेकपोस्ट आहेत. या व्यतिरीक्त दोडामार्ग आणि केरी- सत्तरी येथे चेकपोस्ट आहेत. या चेकपोस्ट पोस्टींगसाठी दर सहा महिन्यांनी बोली लावल्या जातात. प्राप्त माहितीनुसार पत्रादेवी. पोळे आणि मोले चेकपोस्टसाठी सहा महिन्यांसाठी १० लाखांची बोली लावली जाते. या तीन्ही चेकपोस्टवर चार आरटीओ निरीक्षकांची नेमणूक केली जाते. प्रत्येकी दहा लाखांच्या बोलीतून तीन चेकपोस्टवरील १२ निरीक्षकांचे १ कोटी २० लाख रूपये जमा होतात. या व्यतिरीक्त अन्य दोन चेकपोस्टसाठी ही बोली ५ लाखांची लागते आणि त्यातून प्रत्येक चेकपोस्टावरील दोन निरीक्षकांचे मिळून २० लाख रूपये होतात. तर अशा तऱ्हेने सहा महिन्यांचे पोस्टींगचे कलेक्शन १ कोटी ४० लाख रूपये होते. प्रत्येक निरीक्षकाला चोविस तासांची ड्यूटी असते. या व्यतिरीक्त ड्यूटीवरील निरीक्षकाला दर दिवशी ५० ते ६० हजारांचे कलेक्शन वेगळे करावे लागते. ही सगळी रक्कम कलेक्शन करूनही त्याबाहेर पोस्टींग घेणाऱ्या निरीक्षकांची कमाई होत असल्याने चेकपोस्टांवरील पोस्टींगसाठी आरटीओ निरीक्षकांत जबरदस्त स्पर्धा लागते,अशीही माहिती सुत्रांनी दिली.
हा कलेक्शन बाबा कोण?
आरटीओ चेकपोस्टवरील पोस्टींग आणि दररोजच्या कलेक्शनची जबाबदारी साखळीतील एका व्यक्तीकडे आहे. या व्यक्कीची ओळख बाबा अशी केली जाते. ही व्यक्ती वेळोवेळी हे कलेक्शन करून धारगळ येथील एका भाऊकडे देते आणि ही भाऊ एका मंत्र्यांची खास व्यक्ती असल्याने ती रक्कम त्या मंत्र्यांपर्यत पोहचती करतो. या भाऊच्या वाढदिवसानिमित्त तथा त्याच्या दुकानाच्या उदघाटन सोहळ्याला त्या मंत्र्याची उपस्थिती ही गावात चर्चेचा विषय ठरला होता. या भाऊची या मंत्र्यासोबतची मैत्री अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारी ठरली आहे.
कॅशलेस चेकपोस्ट संकल्पना राबवा
सरकार सगळीकडेच कॅशलेस सेवेचे ढोल पिटत असताना आरटीओ चेकपोस्टवरील व्यवहार रोख का,असा सवाल करत हे सगळे व्यवहार रोख विरहीत होण्याची गरज आहे. आरटीए कार्यालयांत फक्त ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था केली आहे, मग चेकपोस्टांना ही मोकळीक का,असा सवाल करून हे चेकपोस्ट म्हणजे काहीजणांची एटीएम मशीन्स बनली आहे आणि चेकपोस्टचे कलेक्शन वरपर्यंत जात असल्याची माहितीही यावेळी सुत्रांनी दिली.