सत्तेच्या रडारवरील कार्यकर्ता; स्वप्नेश शेर्लेकर


राज्यातील भाजप सरकार आणि विशेषतः भाजप पक्षाच्या रडारवर जर एखादी व्यक्ती सातत्याने राहिली असेल, तर ती म्हणजे युवा सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर. अभ्यास, संशोधन, विश्लेषण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हाती घेतलेल्या कामाप्रती असलेले निस्सीम समर्पण ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

सध्याच्या काळात पर्यावरण, जमीन रूपांतरे, प्रादेशिक आराखडा, धारणक्षमता यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रभावी लोकजागृती करणारे आणि सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत वस्तुस्थिती पटवून देणारे ते गोव्यातील मोजक्या सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. याच कारणामुळे भाजप सरकार आणि पक्ष त्यांच्या मागे हात धुऊन लागल्याचे चित्र दिसून येते. लोकांना जागृत करणारे आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे व्यक्तिमत्त्व प्रस्थापितांना कधीच परवडत नाही.

धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप, लोकांना चिथावणी दिल्याच्या तक्रारी, तसेच कारापूर प्रकरणात महिला सरपंचाचा अवमान केल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या. पोलिस चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावण्याचे प्रयत्नही झाले. एवढेच नव्हे, तर कारापूर प्रकरणात हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात त्यांच्याविरोधात १५ कोटींचा बदनामीचा दावाही दाखल केला. मात्र या सर्व दबावांनंतरही स्वप्नेश शेर्लेकर यांचा आत्मविश्वास, जिद्द आणि लढवय्येपणा किंचितही कमी झालेला नाही.

डिचोली तालुक्यातील मुळगावचा रहिवासी असलेल्या स्वप्नेश शेर्लेकर यांनी वास्को येथे शिक्षण घेतले. बोगदा वास्को येथील शिप बिल्डिंग तंत्रज्ञान संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मटेरियल हँडलिंग तंत्रज्ञान या विषयांमध्ये डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर त्यांना वेर्णा औद्योगिक वसाहतीत चांगली नोकरी मिळाली. सामाजिक चळवळींविषयी आस्था आणि आपल्या मुळ गावाप्रतीची ओढ असल्यामुळे ते आपल्या डिचोलीतील मुळगांव या गावी स्थायिक झाले. गोव्यातील राजकीय, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांचा अभ्यास, संशोधन आणि शोध घेण्यास त्यांनी स्वतःला वाहून घेतले.

प्रारंभी ‘गोंयचो आवाज’ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सभा, बैठका आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सुरू केले. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून तो सोप्या, प्रभावी आणि तर्कशुद्ध पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचे कौशल्य त्यांनी विकसित केले. त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे विषय सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकले.

राजकीय व्यवस्थेचा भाग होणे आवश्यक आहे, या जाणिवेतून त्यांनी आपल्या विचारधारेशी सुसंगत असा गोव्याचे स्वाभिमान पक्ष स्थापन केला आणि २०२२ ची विधानसभा निवडणूक थिवी मतदारसंघातून लढवली. निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यांनी आपल्या ध्येयापासून माघार घेतली नाही.

गोव्यासमोरील वाढत्या पर्यावरणीय, सामाजिक आणि राजकीय संकटांचा अभ्यास करताना परिस्थितीची गंभीरता त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून दिले. आज ते विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि ग्रामस्तरावरील संस्थांना मार्गदर्शन करतात, सहकार्य करतात आणि स्थानिकांना गोवा वाचवण्याच्या चळवळीत सक्रिय सहभागासाठी प्रेरित करतात. इनफ इज इनफ या चळवळीतील कोअर समितीचे एक ते एक महत्वाचे भाग आहेत.

प्रादेशिक आराखडा, धारणक्षमता अभ्यास, हेरिटेज टुरिझम, मोरजी भूरूपांतरण, मोपा विमानतळ, ओलित क्षेत्र विकास तसेच मुळगावातील वेदांता खाण प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरणीय मंजुरीविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. काही प्रकरणांमध्ये त्यांनी सरकारला निर्णय बदलण्यासही भाग पाडले आहे. नगर नियोजन खात्याकडून वादग्रस्त कलम १७(२) प्रकरणात कमी शुल्क आकारण्यात आल्याचे प्रकरण त्यांनी उच्च न्यायालयात नेले. या प्रकरणामुळे तत्कालीन मुख्य नगर नियोजकांचे निलंबन झाले आणि सरकारला सुमारे २२ कोटी रुपयांची अतिरिक्त महसूल वसुली करण्यात यश आले.

पर्वरी येथील श्री खाप्रेश्वर देवस्थान प्रकरणात स्वप्नेश शेर्लेकर यांचा रुद्रावतार गोमंतकीयांनी पाहिला. जेसीबीच्या साहाय्याने मंदिर आणि मूर्ती हटविण्याचा प्रयत्न सुरू असताना ते तेथे धावून गेले आणि मंदिर वाचवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या घटनेनंतरच गोव्याच्या प्रश्नांसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची ऊर्जा त्यांना मिळाली. मुळगावचे ग्रामदैवत श्री देवी केळबाय महामाया आणि श्री खाप्रेश्वर यांचे आशीर्वाद हेच आपले सुरक्षा कवच असल्याची त्यांची श्रद्धा आहे.

भाजप युवा मोर्चाच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची केलेली तक्रार ही वस्तुतः मोठी विसंगती म्हणावी लागेल. संकष्टी, एकादशी, विविध व्रत-वैकल्ये, नियमित देवपूजा यांचे पालन करणाऱ्या आणि देव, देश व धर्म यांवर श्रद्धा असलेल्या व्यक्तीला धर्मविरोधी ठरविण्याचा प्रयत्न हा भाजपच्या वैचारिक आणि नैतिक अधःपतनाचाच पुरावा आहे. स्वप्नेश शेर्लेकर यांना जवळून ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी ही तक्रार आश्चर्यकारक आणि हास्यास्पद वाटते. स्वतःचे राजकीय अपयश झाकण्यासाठी धर्माचा वापर करण्याच्या भाजपच्या डावाचा यातून पर्दाफाश झाला आहे.

कारापूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामागे स्वप्नेश शेर्लेकर यांची प्रेरणा आणि नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. हा विषय त्यांनी सातत्याने लावून धरला. न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर विविध तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करून त्यांनी सरकारची कोंडी केली. सरकारचे चुकीचे निर्णय आणि गैरकारभार उघडकीस आणले. त्यामुळेच आज त्यांच्यावर पोलिस आणि न्यायालयीन दबाव टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र दबावाला झुकणे हा त्यांच्या स्वभावात नाही. त्यांनी आपल्या कृतीतून हे वारंवार सिद्ध केले आहे.

गोव्याच्या जनतेच्या हक्कांसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी झटणाऱ्या या लढवय्या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आहे.

या निमित्ताने त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम!

  • Related Posts

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    Porvorim, August 5: RTI activist Sudip Narayan Tamankar has submitted a representation to the Director of Transport, Government of Goa, urging the State Transport Authority (STA) to reconsider and withdraw…

    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    Panaji, August 5: The Aam Aadmi Party (AAP) on Tuesday accused the BJP-led Goa Government of using police deployment to intimidate villagers protesting against the proposed Karapur mega project and…

    You Missed

    तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 13 views
    तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

    06/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 15 views
    06/08/2026 e-paper

    सरकारचा यू-टर्न आणि धोक्याची घंटा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 21 views
    सरकारचा यू-टर्न आणि धोक्याची घंटा

    गोवा मराठी चित्रपट महोत्सवात झळकणार पुरस्कारप्राप्त ‘आंसेसांव’

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 5 views
    गोवा मराठी चित्रपट महोत्सवात झळकणार पुरस्कारप्राप्त ‘आंसेसांव’

    Rent-a-Bike permit renewals stuck since 2024: Tamankar seeks manual processing amid NIC software issues

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 9 views
    Rent-a-Bike permit renewals stuck since 2024: Tamankar seeks manual processing amid NIC software issues

    Supreme Court Verdict a Wake-Up Call for BJP Government: Amit Patkar

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 11 views
    Supreme Court Verdict a Wake-Up Call for BJP Government: Amit Patkar