हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कनेक्शनमुळे प्रश्न
गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)
कारापूर-सर्वण येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओची थेट अयोध्येत भाजपच्या जिल्हा युनिटने पोलिसांत तक्रार केल्याने नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण याच अयोध्येत हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचा मोठा रिअल इस्टेट प्रकल्प उभा राहत आहे.
शेर्लेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कारापूर आंदोलनातील हस्तक्षेपावर टीका करताना “ ब्रोकर सीएम ऑफ ब्रोकर जनता पार्टी “ असा उल्लेख केला होता. आंदोलनकर्त्यांचा आरोप होता की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी आंदोलन मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर शेर्लेकर यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.
मात्र गोव्यातील या वादावर शेकडो किलोमीटर दूर असलेल्या अयोध्या भाजप जिल्हा युनिटने पोलिसांत तक्रार का केली? हा प्रश्न आता आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. १८ सप्टेंबरच्या या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता कलम १७९ अंतर्गत शेर्लेकर यांना २४ सप्टेंबर रोजी अयोध्येत हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली.
विशेष म्हणजे हाऊस ऑफ अभिनंदन लोढा अयोध्येत ‘द शरयू ’ हा मोठा प्रकल्प विकसित करत आहे. त्यामुळे कारापूरमधील या कंपनीविरोधातील आंदोलनाची दखल अयोध्येतील भाजपाने घेतल्यावरून हा विषय चर्चेचा ठरला आहे.
कारापूर आंदोलनाशी संबंधित प्रकरणे यापूर्वी गोवा आणि मुंबईपर्यंत पोहोचली आहेत. मुंबईत हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून काही आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला, तर ह्याच कंपनीने शेर्लेकर व इतरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १५ कोटींचा मानहानी दावाही दाखल केला आहे.





