सनबर्नचे संस्थापक हरिंद्र सिंगने उलगडली अनेक गुपीते
पणजी,दि. ७ (प्रतिनिधी)
सनबर्न महोत्सवाच्या आयोजनासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यातच अर्ज सादर केला जातो परंतु सरकारचा प्रतिसाद मात्र नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच मिळतो. दरवर्षी या महोत्सवाला अगदी शेवटच्या क्षणी परवाने देण्यामागचे कोडे मात्र आपल्याला अजूनही सुटलेले नाही,असे सांगत सनबर्नचे संस्थापक हरिंद्र सिंग यांनी महोत्सव आयोजनातील अनेक गुपीते उलगडली.
प्रृडंट मीडियाचे एडीटर इन चीफ प्रमोद आचार्य यांच्या हेड ऑन कार्यक्रमात हरिंद्र सिंग यांनी सनबर्न महोत्सवासंबंधी अनेक गुपीतांचा पोलखोल केला. सनबर्न महोत्सवातून ड्रग्सची विक्री, प्रोमोशन किंवा पुरवठा होतो हा निव्वळ भ्रम आणि गैरसमज असल्याचा दावा त्यांनी केला. सनबर्न महोत्सवाच्या ठिकाणी सुमारे अडीजशें सीसीटीव्ही कॅमेरा, आयोजकांची कडेकोड सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची करडी नजर महोत्सवावर असते. महोत्सव ठिकाणाच्या बाहेर काय चालते यावर आयोजकांचे नियंत्रण असण्याची गरज नाही. याठिकाणी प्रवेश करणाऱ्यांना सिगरेट, पाण्याची बाटली, बॅग आदी काहीत नेण्याची परवानगी नसते.
पासधारकांचांच अधिक भरणा…
आयोजकांकडून फक्त २० ते २५ हजार तिकिटांची विक्री केली जाते परंतु प्रत्यक्षात ७० ते ८० हजार प्रेक्षकांची गर्दी महोत्सवाला उसळते, यावरून महोत्सवाला पासधारक बिनबुलाए मेहमानांचाच अधिक भरणा असतो, असा टोला सिंग यांनी हाणला.
धारगळ योग्य ठिकाण…
वाहतुक कोंडीच्या जाचापासून दूर, उत्कृष्ट आणि निसर्गसंपन्न वातावरण, प्रेक्षकांना प्रवेश आणि महोत्सव संपल्यावर बाहेर पडण्यासाठी अतिरीक्त मार्ग आणि महामार्गाला टेकूनच जागा असल्यामुळे धारगळ हे सनबर्नसाठी सर्वंच अंगानी योग्य ठिकाण असल्याचा निर्वाळा सनबर्नचे संस्थापक आणि प्रोमोटर हरिंद्र सिंग यांनी दिला.