सरकार आणि आयोजकांनी दिलेल्या हमींचे उल्लंघन झाल्यास त्याची दखल कोर्ट घेणार आहे का, की लोकांना तीन दिवस वेठीस धरून सगळे काही ठिक झाले असे सरकार म्हणणार आणि कोर्ट त्याच्यावर विश्वास ठेवणार ?
सरत्या वर्षांनिमित्त गोव्याच्या पर्यटनाचे खास आकर्षण ठरलेला सनबर्न महोत्सव उद्या २८ रोजीपासून सुरू होणार आहे. २८, २९ आणि ३० असे तीन दिवस या महोत्सवाच्या निमित्ताने लाखभर लोकांचा वावर पेडणेतील धारगळ या गावांत सुरू राहणार आहे. विरोधाच्या सगळ्या कसोट्या ओलांडून आयोजकांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठामार्फत महोत्सवाला मंजूरीचा हिरवा कंदील मिळवला असला तरी आयोजक आणि सरकारने खंडपीठासमोर दिलेल्या हमीच्या पूर्ततेची आता कसोटीच लागणार आहे.
दक्षिणेतून उत्तरेत बार्देशात आणि त्यानंतर पेडणेत शिरकाव केलेला हा महोत्सव अखेर पेडणेतील धारगळीत स्थिरावला. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने डेल्टीन कॅसिनो कंपनीला मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी खाजगी जमिनीत हा महोत्सव आयोजित होणार आहे. कॅसिनो टाऊनशीप प्रकल्प जिथे उभारण्यात येणार आहे, त्या जागेत सनबर्न महोत्सवाचे आयोजन म्हणून उचित पायाच ठरणार आहे. हा महोत्सव वर्षातून एकदा आयोजित होतो परंतु डेल्टीन कॅसिनो टाऊनशीप प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तिथे वर्षभर असल्या कार्यक्रमांची आणि महोत्सवांची रेलचेल सुरूच राहणार आहे. सनबर्न महोत्सवाचे समर्थन करणाऱ्यांना ही संगीत मेजवानी दारू आणि जुगारासह प्राप्त होणार आहे हे विशेष.
राज्याचे एडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी या याचिकेवेळी आपली सगळी वकीली पणाला लावून केलेल्या युक्तीवादातून अखेर या महोत्सवाला मान्यता मिळाली. या युक्तीवादातून त्यांनी कोर्टाला दिलेल्या हमींची त्यांना आठवण राहावी, एवढीच अपेक्षा सर्वसामान्य धारगळकर आणि पेडणेकर करू शकतो. या महोत्सवातील संगीताचा आजूबाजूच्या लोकांना,इस्पितळांना काहीही त्रास होणार नाही, धारगळीतील स्थानिकांना या महोत्सवामुळे अजिबात अडचण येणार नाही. महोत्सवाचे ठिकाण हे राष्ट्रीय महामार्गाला जरी टेकून सर्विस रोडच्या जवळ असले तरी वाहतुकीची कोंडी होणार नाही, हा महोत्सव ड्रग्स फ्री असेल आणि पोलिस, खाजगी सुरक्षा यंत्रणांमार्फत ड्रग्सच्या वावरावर कडक नजर ठेवली जाणार आहे. पार्किंगची व्यवस्था योग्य पद्धतीने केली जाणार आहे जेणेकरून वाहने रस्त्यावर किंवा महामार्गावर पार्क करून ठेवण्याची वेळ येणार नाही. अशा अनेक हमींची यादीच कोर्टासमोर आयोजक आणि सरकारने सादर केल्यामुळे आता या हमी पूर्ण करण्याचे आव्हान सरकार आणि आयोजकांना पेलावे लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या जवळच सर्विस रोडला टेकून महोत्सवाची जागा आहे. सहजिकच त्याचा परिणाम महामार्गावरील वाहतूकीवर होणार आहे. मालपेतील दरड हटविण्यात सरकार आणि महामार्ग प्राधीकरणाला अपयश आल्याने तिथे पर्यायी मार्गाची जी सोय केली आहे ती अडचणीची ठरत असल्याने कायम वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यात आता या महोत्सवामुळे दक्षिणेतून आणि उत्तरेतून सगळीच वाहने याठिकाणी येणार असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला लोकांना सामोरे जावे लागणार आहे हे नक्की. सर्विस रोडची रूंदी आणि इतर अडचणींचा विचार केल्यास वाहतूकीचे व्यवस्थापन कोलमडण्याचीच अधिक शक्यता आहे. सरकार आणि आयोजकांनी दिलेल्या हमींचे उल्लंघन झाल्यास त्याची दखल कोर्ट घेणार आहे का, की लोकांना तीन दिवस वेठीस धरून सगळे काही ठिक झाले असे सरकार म्हणणार आणि कोर्ट त्याच्यावर विश्वास ठेवणार ?