वेदांताने मुळगांवकरांची थट्टा थांबवावी

फळदेसाईनंतर आमदार शेटयेंचा रूद्रावतार

गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)

डिचोली तालुक्यातील मुळगांव येथे वेदांता कंपनीचा खाण व्यवसाय सुरू आहे. गेली अनेक वर्षे मुळगांववासियांच्या विविध प्रश्नांवर तत्काळ निर्णय न घेता लोकांना झुलवत ठेवले जात आहे. वेदांताने मुळगांवकरांची ही थट्टा तात्काळ थांबवावी, असा इशारा देत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी रूद्रावतार धारण केला.
डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी मुळगावातील शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या वेदांता खाणीविरोधातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बुधवार, दि. २६ रोजी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला वेदांता कंपनीचे अधिकारी, मुळगांव पंचायतीचे पदाधिकारी तसेच सरकारी अधिकारी उपस्थित होते. आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांच्या पुढाकारातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याने ते देखील उपस्थित होते.
मुळगांवकरांना वेदांता गृहीत धरते
वेदांता कंपनी मुळगांवकरांना कायम गृहीत धरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. लीज क्षेत्राबाहेरील कोमुनिदादच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले असून त्याबाबत कोणताही कायदेशीर करार करण्यात आलेला नाही. या जागेच्या वापरासंबंधीची भरपाई अद्याप कंपनीकडून देण्यात आलेली नाही. ही रक्कम आता सुमारे ३० लाख रुपयांवर पोहोचली आहे.
मुळगांवात वेदांता कंपनी खाण व्यवसाय करते आणि त्याचे परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागतात; परंतु सामाजिक उत्तरदायित्वाच्या नावाखाली साखळीतील एका संस्थेला मात्र कंपनीकडून ६० लाख रुपयांची मदत केली जाते, असा आरोपही यावेळी करण्यात आला. ग्रामस्थांच्या संयमाचा बांध आता फुटला असून वेदांता कंपनीने ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर कंपनीचे काम पुन्हा बंद पाडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ व पंचायत सदस्यांनी दिला.
डॉ. चंद्रकांत शेटये गरजले
व्याघ्र क्षेत्राच्या विषयावरून सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी लोकांसाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी दर्शवली असतानाच, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनीही बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत रूद्रावतार धारण केला.
“खाण व्यवसायाला कुणाचाही विरोध नाही; परंतु स्थानिकांना वेठीस धरून आणि खोटी आश्वासने देत हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा डाव यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असे डॉ. शेटये म्हणाले. “गेली अनेक वर्षे वेदांता कंपनी येथे खाण व्यवसाय करत आहे. या कंपनीमुळे डिचोलीवासियांना फक्त धूळ खावी लागली आहे. डिचोलीसाठी वेदांताने विशेष असे काय दिले आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“आपण कायम स्थानिकांसोबत राहणार आहोत आणि स्थानिकांनी जो निर्णय घेतला, त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल,” असेही डॉ. शेटये यांनी स्पष्ट केले.
कुठे गेली आश्वासने? – शेर्लेकर
खाण लीज क्षेत्रातून घरे आणि मंदिरे वगळण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. याशिवाय कंपनी आणि सरकारकडून मुळगांववासीयांना अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या; परंतु त्यापैकी कुठल्याच गोष्टींची पूर्तता झालेली नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते व मुळगांवचे ग्रामस्थ स्वप्नेश शेर्लेकर यांनी व्यक्त केली.
“मुळगांववासियांना यापुढे मूर्ख बनवता येणार नाही. ते आता जागरूक झाले आहेत आणि याची जाणीव कंपनीने ठेवावी,” असा इशाराही त्यांनी दिला.

  • Related Posts

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    आता न्याय मागणार कुणाकडे; पीडीतांचा सवाल गांवकारी,दि.२७ (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लेखी परीक्षेत उच्च गुण मिळवूनही…

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली – श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे १११ व्या पिंडीकोत्सवा निमीत्त बुधवार २५ मार्च २०२६ रोजी आयोजित कुशावती नदी आरती सोहळ्यास गोवा तसेच कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या भक्तांची भव्य उपस्थिती लाभली.…

    You Missed

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 13 views
    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 19 views
    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 20 views
    27/03/2026 e-paper

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 17 views
    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 22 views
    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 23 views
    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण