विरोधकांमागे लोक का नाहीत ?

विरोधकांनी या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार करून आपली रणनिती बदलली नाही तर त्यांच्या विरोधाला कुणीच भीक घालणार नाही हे मात्र खरे.

राज्यात सर्वंत्र खळबळ उडवलेल्या कॅश फॉर जॉब प्रकरणाची धार हळूहळू आता बोथट होऊ लागली आहे. एका पाठोपाठ एक संशयीतांना जामीन मिळाल्याने त्या घरी पोहचल्या आहेत. पोलिसांनी तर तपासाच्या मध्यंतरीच या प्रकरणी राजकीय संबंध नसल्याचे प्रमाणपत्र देऊन सत्ताधाऱ्यांना क्लीनचीट दिली आहे. अर्थात हा शब्द पोलिसांनी वापरला नाही, याचे भांडवल करून सरकारने विरोधकांनाच सुनावण्याचा अजब प्रकारही आम्ही पाहीला. पब्लीक मेमरी इज शॉर्ट म्हणतात, त्याप्रमाणे हळूहळू हे प्रकरण गडप होईल, पण तोच आम आदमी पार्टीने या प्रकरणी दिल्लीत नव्याने गर्जना केल्याचे पाहायला मिळाले.
दिल्ली विधानसभेच्या निवडणूका फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहेत. दिल्ली विधानसभेसाठी आप पक्षाने स्वबळावर रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊन इंडि आघाडीतून काडीमोड घेतला आहे. राजकारणात एकहाती बहुमतापेक्षा कितीतरी पटीने आमदार निवडून आणून आप पक्षाने एक वेगळाच विक्रम नोंदवला होता. भ्रष्टाचारमुक्त भारत या चळवळीतून या पक्षाची निर्मिती झाली आणि कालांतराने ह्याच पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यातील काही नेते अजूनही तुरूंगात आहेत.मुख्यमंत्रीपदावर असताना अरविंद केजरीवाल यांना तुरूंगाची हवा खावी लागली. अर्थात हे सगळे राजकीय प्रेरीत असल्याचा आरोप आप पक्ष करत असला तरी देशाची न्यायव्यवस्था जर खरोखरच जिवंत असेल तर त्यांच्यावरील आरोपांत काहीतरी तथ्य असल्याविना त्यांना विनाकारण तुरूंगात डांबण्या इतपत आपल्या न्यायव्यवस्थेची पत निश्चितच घसरलेली नाही, हे मान्य करावेच लागेल.
दिल्ली भेटीवर असलेल्या गोव्याच्या आप नेत्यांनी पक्षाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन कॅश फॉर जॉब प्रकरणावरून भाजपला लक्ष्य केले आहे. यापूर्वी काँग्रेसने दिल्लीत अशीच पत्रकार परिषद घेतली होती. पक्षाचे नेते गिरीश चोडणकर यांनी दिल्लीतील या पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा थेट संबंध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नीशी लावण्याचा प्रयत्न केला होता. दिल्लीतील पत्रकार परिषदेत आप नेत्यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपांतून अपेक्षीत सनसनाटी निर्माण करण्यात मात्र दोन्ही पक्षांना अपयश आले आहे. ही सनसनाटी का निर्माण होत नाही याचा अभ्यास काँग्रेस आणि आपने करण्याची गरज आहे.विरोधात असलेल्या पक्षांच्यामागे लोकांचा पाठींबा असणे गरजेचे आहे. लोक सत्तेला घाबरतात आणि त्यामुळे उघडपणे बाहेर येत नाहीत,असे कारण दिले जाते. भाजप विरोधात असताना दरवेळेला लोकांना घेऊन रस्त्यावर उतरत होता त्यावेळी लोकांत धाडस कसे काय होते. हे धाडस विश्वासातून निर्माण करावे लागते. मोजकेच कार्यकर्ते घेऊन रस्त्यावर उतरून लोकांत विश्वास तयार करता येणार नाही. या नोकरीकांडावरून संपूर्ण राज्य ढवळून निघायला हवे होते. अन्याय झालेल्या युवकांचे ताफे रस्त्यावर उतरायला हवे होते परंतु तसे काहीच झाले नाही. विरोधकांनी या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार करून आपली रणनिती बदलली नाही तर त्यांच्या विरोधाला कुणीच भीक घालणार नाही हे मात्र खरे.

  • Related Posts

    ऑर्डर.. ऑर्डर…

    केवळ भावना किंवा आपल्याला काय वाटते याला अर्थ नाही तर ते सिद्ध करण्याची किंवा त्याबाबतचे पुरावे हाती असण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सनबर्न महोत्सवाला सशर्त मान्यता दिली…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    हायकोर्टाने शर्ती आणि अटींची बंधने जी सरकार आणि आयोजकांना घातली आहेत त्यांचे खरोखरच पालन होते काय हे न्यायदेवता आता डोळ्यांवरील पट्टी हटविल्यामुळे पाहु शकेल, एवढीच काय ती अपेक्षा सर्वसामान्य नागरिक…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    21/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 8 views
    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 5 views
    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 6 views
    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 8 views
    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!