पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

२ ऑक्टोबर म्हटले की आपल्याला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री आठवतात.

पण मला या दिवशी आणखी एक नाव आठवते — राजाराम रंगाजी पैंगिणकर. आज त्यांची जयंती नाही किंवा पुण्यतिथीही नाही. आज त्यांच्या संघर्षाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी, ११६ वर्षांपूर्वी म्हणजे २ ऑक्टोबर १९१० रोजी, त्यांनी गोव्यातील देवदासी प्रथेविरुद्ध पहिली सभा घेतली होती.

राजाराम हे काणकोण तालुक्यातील पैंगिण या एका खेडेगावातील तरुण. त्यांनी लोकमान्य टिळकांचा ‘केसरी’ पोस्टाने मागवला. ‘केसरी’चा अंक राजारामांना पोहोचला; पण त्यावरील पत्त्यात नाव लिहिताना त्यांनी वडिलांचे नाव लावले होते. त्यामुळे त्यांचे वडील त्यांच्या आईशी भांडायला आले. राजाराम बापाचे नाव म्हणून आपले नाव का लावतोय, असा त्यांचा आक्षेप होता. कारण राजाराम हे ‘ठेवलेल्या बाईचा मुलगा’ म्हणून ओळखले जात होते.

राजारामजी म्हणतात, ‘हे माझे वडील आहेत, हे अख्ख्या गावाला माहीत आहे. राजरोसपणे ते माझ्या आईकडे येतात. पण बाप म्हणून नाव लावायला मात्र ते आक्षेप घेतात. मग मी कोण?’

काय वेदना झाल्या असतील वीस वर्षांच्या राजारामजींना! किती घुसमट झाली असेल त्यांची! त्यांच्या जागी स्वतःची कल्पना करून एकदा विचार तर करून बघा — औपचारिकरीत्या बापाचे नाव नसणे किती भयानक असते.

त्यानंतर एकदा ते कामानिमित्त काणकोणच्या मामलेदाराच्या कचेरीत गेले होते. काम व्हायला उशीर लागणार असल्याने बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर ते बसले. त्यांना बाकड्यावर बसलेले पाहून आतला कारकून बाहेर आला आणि म्हणाला, ‘बाकड्यावर बसू नकोस. खाली बस. औकातीत रहा.’

किती भयानक अपमान वाटला असेल राजारामजींना!

राजारामजी संतापाने तेथून निघून गेले; पण जाताना म्हणाले, ‘एक दिवस असा येईल की आम्ही तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसू.’

अपमान झाल्यानंतर अनेकजण असे बोलून जातात. पण पैंगिणकर नुसते बोलले नाहीत. त्यांनी त्यांचा संताप वाया जाऊ दिला नाही. त्यांनी देवदासी प्रथेविरुद्ध लढा उभा केला. त्या लढ्याचा पहिला एल्गार, पहिली सभा आजच्याच दिवशी, ११६ वर्षांपूर्वी झाली.

आणि पैंगिणकरांनी सुरू केलेल्या लढ्याची परिणती कशात झाली, माहीत आहे?

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे अशाच पीडित समाजातून पुढे आले. पैंगिणकर म्हणतात, ‘खुर्चीला खुर्ची लावून बसू म्हटले होते; पण आज खुर्चीला खुर्ची नाही, तर गोव्याच्या सर्वोच्च खुर्चीवर आमचा माणूस विराजमान झाला!’

— डॉ. रुपेश पाटकर

  • Related Posts

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    पणशीकर घराण्याचा सांस्कृतिक वारसा नव्या सुरांत गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील दिग्गज नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या घराण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आता नव्या पिढीकडून वेगळ्या सुरांत पुढे जात आहे. प्रभाकर…

    पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

    पश्चिम बंगाल सभापतींच्या गोवा भेटीचे रहस्य उघडगावंकारी, दि. २५ (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल विधानसभेचे सभापती रथिंद्र बोस यांच्या आर. बोस हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीतर्फे पाळोळे-काणकोण येथील सर्व्हे क्रमांक १४८/६ मधील…

    You Missed

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    02/10/2026 e-paper

    02/10/2026 e-paper

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    कंत्राटी कर्मचारी नियमितीकरण अधिसूचनेत स्पष्टता नाही

    कंत्राटी कर्मचारी नियमितीकरण अधिसूचनेत स्पष्टता नाही

    काँग्रेसची यात्रा आज साखळीत फिरणार

    काँग्रेसची यात्रा आज साखळीत फिरणार