८६ देशांतील १५४ चित्रपटांचे प्रदर्शन
—————————————————
गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) : गोव्यात होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) राज्य सरकार सज्ज झाले असून, यंदाचा महोत्सव ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेवर आधारित असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या महोत्सवात ८६ देशांतील १५४ आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून, राज्य सरकार यंदाच्या आयोजनावर सुमारे ३० कोटी रुपये खर्च करणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. यंदाच्या महोत्सवात गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी शिगमोत्सव आणि कार्निव्हलच्या चित्ररथ मिरवणुकांचे विशेष आकर्षण असेल.
महोत्सवातील विविध कार्यक्रम पणजी, पर्वरी, मडगाव आणि फोंडा येथे आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे चित्रपट महोत्सवाचा विस्तार राजधानीपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील इतर भागांपर्यंत पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
दरम्यान, गोव्यात चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे राज्यात चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच रोजगार आणि पर्यटनाच्या नवीन संधी निर्माण होतील, असा सरकारचा विश्वास आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून गोव्याला जागतिक चित्रपटसृष्टीच्या नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.






