होंड्यात पोलिस आऊटपोस्टसमोरच कार पेटवली
गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) –
सत्तरी तालुक्यातील होंडा येथे नरकासूराच्या रात्री जमावाच्या डोक्यावर जणू नरकासूरच बसला आणि श्री परशुराम गोमंतक सेनेचे संयुक्त सचिव तथा आरटीआय कार्यकर्ते रूपेश पोके यांची कार होंडा पोलिस आऊटपोस्टसमोर पेटवण्याची धक्कादायक घटना घडली.
होंडा येथील रूपेश पोके यांनी नरकासूराच्या ठिकाणी कर्णकर्कश आवाज आणि अश्लील घोषणा दिल्या जात असल्याची तक्रार केली होती. पोके हे आरटीआय कार्यकर्ते असून गावांतील बेकायदा कृत्यांविरोधात त्यांनी अनेक आरटीआय अर्ज तसेच तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून पोके आणि स्थानिकांमध्ये वैमनस्य निर्माण झाले आहे. दरवर्षी नरकासूराच्या रात्री हे लोक जाणीवपूर्वक त्यांना त्रास देतात, घराशेजारी कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवतात आणि अश्लील घोषणा देतात, असे पोके यांनी सांगितले. नरकासूराच्या रात्री पोके यांच्या तक्रारीवरून संतप्त बनलेल्या लोकांनी त्यांची कार पेटवून दिली.
तक्रार केल्यानंतर जमाव एकत्र आला
या प्रकाराबाबत पोके यांनी तक्रार केल्यानंतर होंडा आऊटपोस्टच्या पोलिसांनी नरकासूर आयोजकांना आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रात्री दहा वाजल्यानंतर आवाज बंद करण्याची सक्ती असल्यामुळे तक्रारदाराने थेट पोलिस निरीक्षकांमार्फत तक्रार केली. पोलिसांनी ही माहिती आयोजकांना दिली असता, आयोजकांनी संपूर्ण होंडा परिसरातील नरकासूर आयोजकांना फोन करून “पोके यांनी सर्व ठिकाणी नरकासूराचे संगीत बंद करायला लावले आहे” अशी हूल सोडली. त्यामुळे नरकासूरप्रेमी संतप्त झाले आणि सुमारे ३०० ते ४०० लोकांचा जमाव करून त्यांनी होंडा पोलिस आऊटपोस्टवर धडक दिली.
जमाव पाहून पोलिस बिथरले
जमाव एकत्र आल्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराला बोलावून घेतले. परिस्थिती हाताळणे शक्य नसल्याचे सांगून पोलिसांनी तक्रारदाराला माफी मागण्याची विनंती केली. अखेर नाईलाजास्तव तक्रारदाराने पोलिसांच्या संरक्षणात माफी मागितली. एकमेकांविरोधातील तक्रारी मागे घेण्याचे ठरले. तक्रारदाराने माफी मागितली म्हणजे आपला विजय झाला, अशा जल्लोषात एका व्यक्तीने थेट पोके यांच्या पार्क केलेल्या कारमध्ये फटाके लावून ती कार पेटवून दिली. विशेष म्हणजे ही कृती पोलिसांच्या डोळ्यांसमोर घडली, तरीही त्यांनी काहीच हालचाल केली नाही. कार पेटवणारी व्यक्ती कॅमेरामध्ये टिपली गेली असूनही “अज्ञातांनी कार पेटवली” अशी माहिती पोलिसांनी पसरवल्यामुळे त्यांच्या कृतीचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
हल्लेखोरांच्या मुसक्या आवळा
होंडा येथे घडलेला हा प्रकार निंदनीय आहे. या परिस्थितीला जबाबदार व्यक्तीविरोधात ताबडतोब कारवाई करण्याचे तसेच कार पेटवून हुल्लडबाजी केलेल्यांना तत्काळ अटक करा,असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दिले आहेत.





