पर्वरीत वाहतूक नियोजनाचा बट्याबोळ…

मंत्री रोहन खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझांची दमछाक


गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी)

पर्वरी उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे, हे खरे; परंतु या कामासाठी आवश्यक वाहतूक नियोजन सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक खात्याने केले नसल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. वाहतूक कोंडीच्या विषयावर पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आज पाहणी करून पर्यायी व्यवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अधिकाऱ्यांकडे काहीच ठोस आराखडा नसल्याचे उघड झाले.
पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही अडथळ्याविना वाहतूक थेट पणजीपर्यंत सुरळीत होऊ शकेल. मात्र, उड्डाणपुलाचे काम हाती घेताना घाई करण्यात आली. प्रारंभी वाहतूक कोंडीमुळे रोहन खंवटे यांनाच काम बंद करावे लागले होते. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे सांगितले होते. परंतु नागरिकांना बरेच त्रास सहन करून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. एकीकडे धुळीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि चिखल यातून मार्ग काढत लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनांचीही मोठ्या प्रमाणात झीज होत आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्थेची मोठी आश्वासने दिली गेली होती, ती मात्र धुळीस मिळाली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या वाहतूक कोंडीची दखल घेतली होती. तिथेही न्यायालयाला खोटी माहिती देऊन फसवण्यात आले, अशी नाराजी स्थानिक नागरिकांनी आणि रोज प्रवास करणाऱ्यांनी व्यक्त केली.
कल्पनांचे इमले आणि वास्तवाचा गोंधळ
पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली असता, सरकारी अधिकारी केवळ पर्यायी व्यवस्थेच्या नावाने कल्पनांचे इमले उभारण्याचा आभास निर्माण करत असून वास्तव परिस्थितीबाबत सगळाच गोंधळ असल्याचे त्यांना जाणवले. वास्तविक लोकांना रामभरोसे सोडून हे काम केले जात असल्याचेही अनेकांना जाणवले.
यावेळी वाहतूक विभागाचे अधीक्षक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. इतके दिवस लोक त्रास सहन करत असताना कुणीही घटनास्थळी फिरकले नव्हते. आज मंत्री आणि उपसभापतीसोबत फिरावे लागल्याने अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झाली. हे अधिकारी धुळीने त्रस्त झालेच, शिवाय हातातील पाणी घोटत असताना उपस्थित लोकांनीही कार्यालयात बसून लोकांचे हाल मुकाट्याने पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना जोपर्यंत रस्त्यावर आणून खरी परिस्थिती दाखवली जात नाही, तोपर्यंत त्यांना सामान्य लोकांचे काहीच पडलेले नसते, अशा प्रतिक्रिया उमटल्या.
स्पॅन बसवण्याचे काम जोरात
सध्या उड्डाणपुलाच्या स्पॅन बसवण्याचे काम जोरात सुरू आहे. हे काम धोकादायक आणि जिकीरीचे असल्यामुळे, तसेच उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला बरीच कसरत करावी लागत आहे. सरकारी यंत्रणांनी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याची गरज असताना, उड्डाणपुलाच्या बाजूनेच वाहतूक सोडली जात असल्याने जराही हयगय झाली तर एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. हे ओळखूनच आता उपाययोजनांसाठी ही धावपळ सुरू झाली आहे.

  • Related Posts

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा हल्लाबोल गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा अभ्यास अपुरा आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बिल्डरला मदत करण्यासाठी महामार्गात बदल गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)बांबोळी येथील राष्ट्रीय महामार्ग-६६ वर आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. या महामार्गाच्या मूळ आराखड्यात गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याने एका बिल्डरला मदत करण्याच्या…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    error: Content is protected !!