फोकस्ड राहूया… गोव्यासाठी!

एक फलक, एक घोषणा, एक वादग्रस्त प्रसंग आणि संपूर्ण सार्वजनिक चर्चा मूळ प्रश्नापासून दूर नेली जाऊ शकते. ही रणनीती ओळखणे आवश्यक आहे.

आझाद मैदानावर नीट पेपरलीक आंदोलनाच्या विजयोत्सवानिमित्त जमलेली युवाशक्ती, त्यानंतर हातात वादग्रस्त फलक घेऊन उभा राहिलेला एक अज्ञात युवक, त्याला पोलिसांनी ताब्यात घेणे, घोषणाबाजी, निषेध, आंदोलक आणि भाजयुमो कार्यकर्त्यांतील वाद आणि अखेरीस एकमेकांविरोधात दाखल झालेल्या पोलिस तक्रारी, या सगळ्या घटनांनी मूळ प्रश्नापेक्षा वेगळ्याच दिशेने चर्चा सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुदीप दळवी यांची घेतलेली मुलाखत आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया हा आणखी एक वेगळा अनुभव ठरला. अनेकांनी मुलाखतीचे कौतुक केले; पण त्याहून अधिक तीव्र प्रतिक्रिया नाराजीच्या होत्या. काहींच्या प्रतिक्रिया इतक्या टोकाच्या होत्या की प्रश्न विचारणे किंवा एखाद्याची बाजू ऐकून घेणे म्हणजे देशद्रोह्यांचे समर्थन करणे, असा सरळ निष्कर्ष काढला जात होता.

याच ठिकाणी एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांचे किंवा देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांचे समर्थन कुणीही करू शकत नाही. परंतु ज्यांच्यावर असे आरोप आहेत, त्यांच्याविरोधातील खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात, सुनावण्या होत नाहीत आणि दोषसिद्धी होत नाही, तर मग सत्य नेमके कुठे शोधायचे? केंद्र सरकारने अशा गंभीर प्रकरणांसाठी जलदगती न्यायप्रक्रिया राबवावी, पुरावे सादर करावेत आणि आरोप सिद्ध करून दोषींना शिक्षा व्हावी. आरोप सिद्ध झाले आणि संबंधित व्यक्ती दोषी ठरल्या, तर त्यांच्या समर्थनाचा प्रश्नच उरत नाही.

पण आज घडते काय? आरोप आणि दोषसिद्धी यांच्यामधील सीमारेषाच अनेकदा पुसली जाते. न्यायालयीन निष्कर्ष येण्यापूर्वीच राजकीय आणि सामाजिक स्तरावर कोणाला ‘देशद्रोही’ ठरवले जाते. परिणामी, मूळ प्रश्न मागे पडतो आणि भावनिक संघर्ष पुढे येतो.
नीट परीक्षा पेपरलीक प्रकरण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रकरण होते. पारदर्शक परीक्षा व्यवस्था, जबाबदारी निश्चित करणे आणि दोषींवर कारवाई हे आंदोलनाचे मुख्य मुद्दे होते. मग अशा आंदोलनात अचानक वेगळ्या विषयाचा फलक घेऊन एखादा युवक उभा राहतो आणि संपूर्ण राजकीय चर्चेची दिशा बदलते, तेव्हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

तो युवक नेमका कोण होता? त्याची पार्श्वभूमी काय? त्याने त्या विशिष्ट वेळी तो फलक का उचलला? तो आंदोलनाचा भाग होता की स्वतंत्रपणे आला होता? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अजून समोर आलेली नाहीत.

मात्र या एका घटनेमुळे भाजपला आंदोलनावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी आयतेच हत्यार मिळाले. पेपरलीक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरून सुरू झालेली चर्चा ‘देशद्रोह’, ‘देशप्रेम’, ‘राष्ट्रविरोधी शक्ती’ अशा परिचित राजकीय चौकटीत ढकलली गेली.

देशप्रेम आणि देशद्रोह हे अत्यंत संवेदनशील विषय आहेत. त्यांचा राजकीय वापर झाला की लोक लगेच भावनिकदृष्ट्या विभागले जातात. मग बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षण, जमीन, पर्यावरण, स्थानिक अस्मिता आणि भविष्यातील अस्तित्व यासारखे प्रश्न मागे पडतात.

गोव्याच्या जमिनींचे भवितव्य काय होणार? मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जमीन व्यवहारांचा लाभ नेमका कुणाला मिळतो आहे? नियोजन कायद्यांतील बदलांमुळे गावांची रचना आणि ओळख कितपत बदलणार आहे? गोव्याची वहनक्षमता किती आहे? वाढत्या बांधकामांचा पाणी, वाहतूक, कचरा, पर्यावरण आणि स्थानिक समुदायांवर काय परिणाम होणार आहे?

हे प्रश्न केवळ राजकीय नाहीत. ते गोव्याच्या पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाशी निगडित आहेत.

म्हणूनच या टप्प्यावर गोव्यातील सामाजिक चळवळींनी आपला प्राधान्यक्रम स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे, फोकस्ड राहणे आवश्यक आहे.

आज अनेक स्तरांवर गोव्याच्या जमिनींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जमीन रूपांतरे, मोठे प्रकल्प, टेकड्यांवरील बांधकामे, नियोजनातील बदल आणि गावांवर वाढणारा लोकसंख्येचा ताण यामुळे भविष्यात गोव्याची सामाजिक आणि सांस्कृतिक रचना बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रश्नावर सातत्याने सार्वजनिक दबाव निर्माण करणे आवश्यक आहे.

कारण एकदा जमीन गेली की ती परत मिळवता येत नाही. एकदा गावांची रचना बदलली की मूळ स्वरूप पुन्हा निर्माण करणे कठीण होते. एकदा स्थानिक समुदाय आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या हद्दपार झाले की पुढच्या पिढ्यांसाठी फक्त आठवणी उरतात.

अशा परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक वादात उडी घेणे हे स्थानिक चळवळींसाठी शहाणपणाचे ठरणार नाही.

देशप्रेम म्हणजे सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण. देशप्रेम म्हणजे भ्रष्टाचाराला विरोध. देशप्रेम म्हणजे नागरिकांच्या हक्कांचे रक्षण. देशप्रेम म्हणजे देशाच्या नैसर्गिक संपत्तीची लूट थांबवणे. देशप्रेम म्हणजे भावी पिढ्यांसाठी जमीन, पाणी, जंगल आणि पर्यावरण सुरक्षित ठेवणे.

एका बाजूला देशप्रेमाचे पोवाडे गायचे आणि दुसऱ्या बाजूला सार्वजनिक संसाधने काहींच्या फायद्यासाठी वापरली जात असतील, तर त्यालाही प्रश्न विचारलेच पाहिजेत.

गोव्यात जमीन व्यवहारांमधून कोणाचे खिसे भरत आहेत, कोणाला फायदा होत आहे आणि त्यासाठी कायदे व धोरणे बदलली जात आहेत का, हे तपासणेही तितकेच देशहिताचे काम आहे.

या संपूर्ण अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होते.चळवळ कितीही योग्य असली तरी तिचा फोकस सहज बदलवता येतो.

एक फलक, एक घोषणा, एक वादग्रस्त प्रसंग आणि संपूर्ण सार्वजनिक चर्चा मूळ प्रश्नापासून दूर नेली जाऊ शकते. ही रणनीती ओळखणे आवश्यक आहे.

गोव्याच्या हितासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, संघटनांनी आणि जागरूक नागरिकांनी कोणत्या विषयावर ऊर्जा खर्च करायची, याचा विचार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केला पाहिजे.

प्रत्येक राष्ट्रीय वादात भूमिका घेण्यापेक्षा गोव्यासमोरील प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकणे अधिक आवश्यक आहे. या प्रश्नांवरून लक्ष हटले, तर त्याचा फायदा फक्त सत्तेला होईल.

  • Related Posts

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    मात्र खरी कसोटी आता समाजाचीच आहे. राजकीय आरक्षण हे समाजाला सत्तेच्या वाटचालीत सहभागी करून घेणारे वरदान ठरावे की वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि मतभेदांमुळे शाप ठरावे, हे समाजधुरिणांनी ठरवायचे आहे.…

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure