पुन्हा एकदा श्रमांच्या चोरीची गोष्ट!

दोनच दिवसांपूर्वी एल ॲण्ड टी चे मालक म्हणाले की ‘रविवारी बायकोकडे किती वेळ बघत बसणार? त्यापेक्षा ऑफीसमध्ये काम करा.’ त्यांच्या या विधानाची सोशल मिडीयावर टर उडवली जात आहे. पण हे टर उडवून फेटाळून लावण्यासारखे विधान नाही. गांभीर्याने विचार करण्याचे विधान आहे. साळसूदपणे श्रमांची चोरी वाढवण्याचा हा प्रकार आहे. मी मुद्दामच ‘चोरी करण्याचा प्रकार’ असे न म्हणता ‘चोरी वाढवण्याचा प्रकार’ म्हणतोय. कारण कामाचे तास दिवसाकाठी आठ असतानादेखील हे मालक श्रमांची चोरी करतच असतात. लहानपणापासून आपण हे पहात आलेलो असल्यामुळे आपल्याला ते नैसर्गिक वाटते. त्यात चोरी आहे, असे अजिबात वाटत नाही. मलादेखील त्यात काही वावगे वाटत नव्हते. पण माझ्या एका जेष्ठ स्नेह्यांशी झालेल्या चर्चेतून श्रमांच्या चोरीचे हे प्रकरण माझ्या लक्षात आले. हे स्नेही कामगार चळवळीत गेल्या सुमारे चाळीस वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांचे नाव सुकुमार दामले. गम्मत म्हणजे त्यांनी IIT मधून इंजिनिअरिंग केलेय. पण लठ्ठ पगाराची नोकरी सोडून सुमारे ४० वर्षापूर्वी ते कामगार चळवळीत आले. उच्च शिक्षण, गाढा अनुभव, प्रचंड विद्वत्ता असतानादेखील ते अतिशय साधे आहेत. त्यांच्याशी कोणीही सहज बोलावे. प्रश्न विचारावेत. ते सहजपणे समजावून देतात. त्यांच्यासोबतच्या चर्चेचा हा किस्सा एल ॲण्ड टी च्या मालकाच्या विधानामुळे पुन्हा आठवला.
काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने गप्पांच्या ओघात कामगार चळवळींबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. मला त्यावेळेस त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. पण दामलेसरांकडे त्यांची उत्तरे असतील याची मला खात्री होती. ते माझ्या मित्राचे संशय कसे दूर करतील, याबाबत मला उत्कंठा होती.
त्यामुळे त्या मित्राने प्रश्न विचारल्यावर दोन-तीन दिवसांतच मी मुद्दाम दामलेसरांना भेटायला त्यांच्या ऑफिसात गेलो. पण आमची चर्चा चालू असताना काही कामगार त्यांचे काही प्रश्न घेऊन आल्याने आमची चर्चा अर्धवट राहीली. म्हणून दोन दिवसांनी मी पुन्हा दामलेसरांना भेटायला गेलो. नेहमीप्रमाणे दिलखुलास हसून सरांनी माझे स्वागत केले. मी गेल्या गेल्या ते म्हणाले, “बरं झालं तू आज आलास. त्यादिवशी आपलं बोलणं अर्धवट राहीलं. कोणताही मुद्दा अर्धवट राहू नये. नाहीतर अभिमन्यूसारखे व्हायचे. चक्रव्यूहात शिरायचे कसे ते कळले, पण बाहेर कसे पडायचे ते कळले नाही.”
“हो सर, मी मुद्दामच त्यासाठी आलोय,” मी म्हणालो. माझा इंटरेस्ट पाहून त्यांना खूप समाधान वाटले.
“मित्रा, तुझा तो मित्र म्हणाला होता की भांडवलदार भांडवल गुंतवतो, म्हणून नफा घेण्याचा त्याला अधिकार आहे, असेच ना?” त्यांनी विचारले.
“होय सर!”
“आपण त्याच्या म्हणण्याची तपासणी करूया. मला सांग भांडवल म्हणजे काय रे?” त्यांनी विचारले.
“भांडवल म्हणजे पैसा,” मी म्हणालो.
“बरं, मग पैसा म्हणजे काय?”
“नोटा, नाणी,” मी.
“नोटा आणि नाणी म्हणजे काय?”
“ज्याच्या बदल्यात वस्तू मिळतात ते,” मी.
“कागदाच्या नोटा किंवा नाण्यांच्या बदल्यात वस्तू का मिळतात?”
“सर, मी कधी याचा विचारच केला नाही,” मी म्हणालो.
“ठिक आहे. आता विचार कर. पैसे दिले की पैशांच्या किमतीएवढ्या वस्तू मिळतात. आता मला सांग वस्तूची किंमत कशी ठरते?”
“ज्या त्या वस्तूची जशी किंमत असते, त्यावरून,” मी.
माझ्या उत्तरावर ते हसले आणि म्हणाले, “चॉकलेटची गोळी एक रुपयाला मिळते. मोबाईल हँडसेट पाच हजार रुपयांना मिळतो. बाईक सत्तर हजारांना मिळते. या किमती कशा ठरतात? समजा दुकानदाराने चॉकलेटच्या गोळीची किंमत पाच हजार रुपये सांगितली, तर तू घेशील का?” त्यांनी विचारले.
मला हसू आले. मी म्हणालो, “दुकानदाराला वेड लागले तरंच तो इतकी किंमत सांगेल.”
“पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीस की वस्तूची किम्मत कशी ठरते?”
“नाही सांगता येत सर,” मी म्हणालो.
“ठीक आहे. समजा तू नदीवर गेलास आणि नदीतील ओंजळभर पाणी घेतलेस आणि प्यायलास तर तुला पैसे द्यावे लागतील का?” त्यांनी विचारले.
“छे, नदीतील पाण्याचे कसले पैसे आणि ते देणार तरी कोणाला? नदी नैसर्गिक आहे. तिथे ओंजळभर पाणी प्यायलो काय किंवा आंघोळ केली काय किंवा कपडे धुतले काय, ते सगळे मोफत.”
“हं. पण समजा, तुला तुझ्या घरी पिण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी पाणी हवं. म्हणून दुसर्‍या कोणाला तू तुझ्या घरी पाणी आणून द्यायला सांगितलंस तर ते पाणी तुला फुकट मिळेल का?”
“छे. मला ते पाणी आणून देणार्‍याला मोबदला म्हणून काहीतरी द्यावे लागेल,” मी म्हणालो.
“का?” त्यांनी विचारले.
“त्याने पाणी आणण्याचे कष्ट केले म्हणून,” मी म्हणालो.
“म्हणजे तू पाण्याचा मोबदला देत नाहीस तर पाणी घरी घेऊन येण्याच्या कष्टासाठी त्याला मोबदला देशील, बरोबर ना?” त्यांनी विचारले.
“हो.”
“म्हणजे मुल्य कष्टाचे असते, नैसर्गिक वस्तूचे नाही!” ते म्हणाले.
त्यांचे म्हणणे मला थोडे थोडे पटले. मी त्यांना तसे म्हंटले देखील.
त्यावर ते म्हणाले, “आपण दुसरे उदाहरण घेऊ. तू अंगात घातलेला शर्ट विचारात घेऊ. कशापासून बनलाय तुझा शर्ट?”
“कापडापासून,” मी म्हणालो.
“शर्ट बनवायला कापडाशिवाय आणखी कोणकोणत्या गोष्टी लागतात?” त्यांनी विचारले.
“शिलाई मशीन, दोरा, बटणे आणि काॅलर,” मी म्हणालो.
“आपण कापड आणि या गोष्टी घेतल्या आणि एका जागी ठेवल्या तर शर्ट तयार होईल का?”
“शिंपी देखील हवा!” मी म्हणालो.
“हं. म्हणजे केवळ वस्तू असून पुरेसे नाही. कष्टदेखील हवेत. बरे, या वस्तूदेखील दोन प्रकारच्या असल्याचे लक्षात आले का तुझ्या? एक प्रकार म्हणजे कच्चा माल. शर्टाच्या बाबतीत कापड, दोरा, बटणे, काॅलर हा कच्चा माल आणि दुसरा प्रकार म्हणजे अवजारे. शर्टाच्या बाबतीत शिलाई मशिन हे अवजार. आता मला सांग कापड कसे बनले?”
“कापड कापसापासून.”
“फक्त कापसापासून? कापूस टोपलीत ठेवून दिला तर कापड तयार होईल का?”
“नाही. कापसापासून दोरा बनवावा लागेल. दोऱ्यापासून कापड.”
“मग दोरा टोपलीत ठेवून दिला तर कापड तयार होईल का?” त्यांनी विचारले.
“सर, तुम्ही असे फालतू प्रश्न का विचारताय? एखादी वस्तू नुसती टोपलीत ठेवून दिली तर तिच्यापासून दुसरी वस्तू कशी काय बनेल? हे तर मतिमंद देखील सांगेल,” मी म्हणालो.
“मित्रा, वैतागू नकोस. हे वाटते तेवढे सहज लक्षात येत नाही. म्हणून मी असे प्रश्न विचारतोय. थोडं सहन कर,” ते म्हणाले.
मी होकारार्थी मान डोलावली.
“दोऱ्यापासून कापड बनवण्यासाठी ‘माग’ हवा. आणि तो ‘माग’ चालवण्यासाठी विणकर हवा. म्हणजे दोरा + माग + विणकराचे कष्ट.
आता सांग, दोरा कसा बनतो?” त्यांनी विचारले.
“कापूस + चरखा + चरखा चालवणार्‍या माणसाचे कष्ट.” मी म्हणालो.
ते हसले आणि म्हणाले, “आता सांग कापूस कसा बनतो?”
“कापसाचे बीज + जमीन, पाणी, खते वगैरे + शेतकर्‍याचे श्रम,” मी म्हणालो.
“जमीन कशी बनली?” त्यांनी विचारले.
“ती नैसर्गिक असते. ती कोणी बनवली नाही,” मी म्हणालो.
त्यावर ते म्हणाले, “तू कोणतीही वस्तू घे आणि ती कशापासून बनली, ते शोधत शोधत मागे जा. शेवटी तुझ्या लक्षात येईल की ‘नैसर्गिक पदार्थ आणि कष्ट’ या दोनच गोष्टींपासून ती बनली आहे. मघाशी आपण शर्टापासून मागे गेलो. तू त्यातील शिलाईमशीनचे उदाहरण घेऊन मागे जा. शेवटी तू खाणीतल्या लोखंडापर्यंत पोचशील. म्हणजे ‘नैसर्गिक पदार्थ आणि कष्ट’ हेच घटक तुला मिळतील. जगात ज्या ज्या म्हणून वस्तू आहेत, त्या त्या सर्व ‘नैसर्गिक पदार्थ आणि कष्ट’ या दोन बाबींपासून बनलेल्या आहेत. यातील नैसर्गिक पदार्थ हे नैसर्गिक आहेत. कष्ट करून त्या पदार्थापासून वस्तू बनतात. त्यामुळे वस्तूची किम्मत म्हणजे त्यातील कष्टांची किम्मत.
नैसर्गिक पदार्थ + कष्ट = वस्तू
मोफत + मूल्य = वस्तूचे मूल्य.”
“सर, आले लक्षात. वस्तूची किम्मत म्हणजे त्यातील कष्ट.”
” एखादी वस्तू जास्त किंवा कमी किमतीची का असते?” त्यांनी विचारले.
“जी वस्तू बनवण्यासाठी जास्त कष्ट लागतात, ती जास्त किमतीची वस्तू आणि जी वस्तू बनवण्यासाठी कमी कष्ट लागतात ती कमी किमतीची वस्तू,” मी म्हणालो.
“मग पैसे म्हणजे काय?” त्यांनी विचारले.
“पैसे म्हणजे किम्मत म्हणजे कष्ट!” मी म्हणालो.
“मग भांडवल म्हणजे काय?” त्यांनी विचारले.
“कष्ट!” मी म्हणालो.
“कष्ट कोण करते?” त्यांनी विचारले.
“कामगार,” मी म्हणालो.
“कारखान्यात कामगार कष्ट करतो, शेतात शेतकरी कष्ट करतो. मग आता सांग भांडवल कोणी निर्माण केले?” त्यांनी विचारले.
“कष्ट करणार्‍यांनी!” मी म्हणालो.
“मग ते भांडवलदाराच्या ताब्यात कसे? जर भांडवलदारने भांडवल तयार केले नाही, तर त्यावर नफा मिळवण्याचा भांडवलदाराला अधिकार आहे का?” त्यांचा प्रश्न.
“सर, तुम्ही आणखी एक भ्रम नाहीसा केलात. पण भांडवलदाराकडे भांडवल आले कसे?” मी विचारले.
“तू एखाद्या भांडवलदाराला हा प्रश्न विचारलास तर तो तुला सांगेल की त्याच्या वडिलांकडून वारशाने त्याला मिळाले. तू त्याला विचारलेस की त्याच्या वडिलांकडे भांडवल कसे आले तर, तो सांगेल आज्याकडून, पणज्याकडून वगैरे वगैरे. तुला दुसरे उत्तर असे मिळेल की आपण कष्ट केले, काटकसर केली, बचत केली आणि भांडवल जमवले,” ते म्हणाला.
“हं. अशीच उत्तरे मिळतील,” मी दुजोरा दिला.
“आता आपण पाहिले उत्तर तपासू. आपण जर वडिलोपार्जित भांडवल तपासत गेलो तर आपल्या लक्षात येईल की त्याचे पूर्वज जमीनदार होते. जमिनदारांकडे संपत्ती कशी गोळा होई? कुळांचे कष्ट लुटून. याचा अर्थ भांडवल म्हणजे लुटलेलेच कष्ट.”
“आणि जो म्हणतो की मी कष्ट केले, काटकसर केली, बचत केली आणि भांडवल जमवले, त्याचे काय?” मी विचारले.
“समजा, आपण असे म्हणु की एखादा कारागीर आहे. त्याने स्वतः कष्ट केले, वस्तू तयार केल्या आणि विकल्या. त्यातून जे पैसे आले, त्यातील थोडे पैसे त्याने न वापरता साठवून ठेवले. त्याने जे पैसे साठवले ते त्याचे कष्ट. त्या पैशांनी त्याने आपले काम वाढवले. त्याने चार मजूर कारागीर कामाला ठेवले. त्याने वस्तू बनवून घेतल्या आणि विकल्या. आपल्याला कसा हिशोब मिळेल?” त्यांनी विचारले.

“{कच्चा माल आणि अवजारांवर झालेला खर्च} + {कामगारांच्या मजुरीवरचा खर्च} = {त्या कारागीराने गुंतवलेले भांडवल}

त्या कारागिरीने बचत केलेले पैसेच त्याने भांडवल म्हणून गुंतवले. म्हणून हे भांडवल म्हणजे त्याचे स्वतःचे कष्ट. म्हणुन
{त्याच्या वस्तू विकून मिळालेले पैसे} – {त्याने गुंतवलेले भांडवल} = {नफा}
हा नफा त्या कारागिराच्या कष्टातून निर्माण झाला म्हणून त्या कारागिराचा. बरोबर ना?” मी विचारले.
“नाही!” सर म्हणाले.
“कसे काय?” मी विचारले.
“त्यासाठी दोन गोष्टी तू समजून घेतल्या पाहिजेत. एक मूल्याचा सिद्धांत आणि दुसरा जुने व नवे श्रम” सर म्हणाले.
“आपण एक मातीचे मडके घेतले आणि सोनाराकडे गेलो आणि त्याला म्हणालो की हे मडके घे आणि सोन्याची अंगठी दे,तर तो देईल का?” सरांनी विचारले.
“नाही,” मी म्हणालो.
“का नाही?” त्यांनी विचारले.
“कारण मडक्याची किम्मत खूप कमी आहे. ती सोन्याच्या अंगठीएवढी नाही,” मी.
“बरोबर. म्हणजे विनिमय किंवा देवाणघेवाण समान किमतीच्या वस्तूंमध्येच होते. हाच मुल्याचा सिद्धांत आहे,” ते म्हणाले.
“हं. आणि जुने-नवे श्रम म्हणजे काय?” मी विचारले.
“आपण शर्टाचे उदाहरण घेऊ. शर्टासाठी कापड, कैची, शिलाई मशीन वगैरे वस्तू लागतील. या वस्तू देखील श्रमांनी बनलेल्या आहेत की नाही?”
“हो.”
“यात असलेल्या श्रमांना ‘जूने श्रम’ म्हणतात. या वस्तूंवर शिलाईचे श्रम करू लागले की त्या श्रमांना ‘नवे श्रम’ म्हणतात. जेव्हा हे शिलाईचे श्रम पूर्ण होतील तेव्हा तेदेखील जुन्या श्रमात सामील होतील. शर्टाची किम्मत म्हणजे जुने श्रम अधिक नवे श्रम यांची बेरीज होय.”
“होय. बरोबर.”
“शर्ट बनवण्यासाठी जेव्हा कापड आणले जाईल तेव्हा कापड विकणार्‍याला त्याची किम्मत अदा केली जाईल. त्यात जे एकूण कष्ट घातलेले असतील, तितकी किम्मत दिली जाईल. कमी किम्मत दिली तर तो कापड विकेल का?”
“नाही.”
“म्हणजे प्रत्येक वस्तू विकताना किंवा विकत घेताना मूल्याच्या सिद्धांतानुसार देवाणघेवाणीच्या दोन्ही बाजू समान किमतीच्या किंवा समान मुल्याच्या असतील. हो ना?”
“हो.”
“आता आपण त्या बचत करून भांडवल जमवलेल्या कारागिराचा विचार करू. त्याने भांडवल गुंतवले म्हणजे ‘जुने श्रम’ गुंतवले. त्याने चार मजूर कारागिरांकडून वस्तू बनवून घेतल्या आणि विकल्या. वस्तू विकल्यावर त्याला जे पैसे मिळतील, त्यातून त्याने गुंतवलेले पैसे त्याला परत मिळतील. म्हणजे त्याचे जुने श्रम परत मिळतील. ते त्याचेच श्रम आहेत, त्यामुळे ते परत घेण्याचा त्याला अधिकार आहे. पण त्याला जे जादा पैसे मिळाले, जो नफा मिळाला तो घेण्याचा त्याला अधिकार आहे का?” त्यांनी विचारले.
मी फक्त प्रश्नार्थक भुवया उंचावल्या.
“नफा कशातून तयार झाला? जेव्हा तो नव्याने भांडवलदार झालेला कारागीर बाजारात वस्तू विकायला गेला, तेव्हा त्याच्या वस्तूला जे पैसे मिळतील ते त्या वस्तूच्या किमतीएवढे असतील की जास्त असतील?” सरांनी विचारले.
“मूल्याच्या सिद्धांतानुसार वस्तूंच्या किमतीएवढेच,” मी म्हणालो.
“आणि वस्तूत घातलेले एकूण श्रम म्हणजे तिची किंमत,” ते म्हणाले.
“हो.”
“आता या वस्तूत घातलेले श्रम तपासू.
कच्चा माल (जुने श्रम)
+
अवजारे (जुने श्रम)
+

मजूर कारागीरांचे कष्ट (नवे श्रम)

=

नवी वस्तू
जुन्या श्रमांची किम्मत देऊन कच्चा माल आणि अवजारे विकत घेतली. आता त्या जुन्या श्रमांची किम्मत वाढेल का? नाही. मग उरतात ते नवे श्रम. नव्या वस्तूची वाढलेली किम्मत कशामुळे? नव्या श्रमांमुळे. म्हणजे मजूर कारागिरांच्या श्रमांमुळे.
मालक कारागीर मजूर कारागीरांच्या कष्टाचे संपूर्ण मूल्य देतो का? नाही. तो फक्त त्याचा ठराविक भाग देतो. त्या भागाला मजुरी म्हटले जाते. मग मालक कारागीराला जो नफा मिळाला तो कुठून झाला? त्याने मजूर कारागिरांच्या कष्टांचे संपूर्ण मूल्य न दिल्यामुळे झाला. बरोबर ना?”
“हो.”
“पण प्रश्न इथेच थांबत नाही.”
“म्हणजे?”
“मालक कारागीर मजूर कारागिरांकडून चोरलेले श्रम घालून भांडवल वाढवतो. जसजसे तो वस्तू निर्माण करून घेतो, तसतसे त्याचे भांडवल वाढत जाते. जसजसे भांडवल वाढते, तसतशी त्याची कामगारांना वेठीस धरण्याची ताकद वाढते,” सर म्हणाले.
दामलेसर आणखी काही सांगणार होते, पण त्यांच्याकडे कामगार भेटायला आले म्हणून आम्हाला चर्चा आटोपती घ्यावी लागली. पण एक मात्र कळले की भांडवल म्हणजे कष्टकऱ्यांचे श्रम. ते या ना त्या प्रकारे चोरून भांडवलदाराने साठवलेले असतात. एक तर त्याच्या पूर्वज जमीनदाराने कुळांचे श्रम लुटून साठवलेले असतात किंवा कामगारांचे श्रम लुटून.
एखादा कारागीर काटकसर किंवा बचत करून छोटेसे भांडवल साठवू शकतो. पण त्या भांडवलाला देखील श्रमचोरीशिवाय नफा मिळवणे शक्य नसते. त्यामुळे सर्वच्या सर्व मोठी भांडवले ही श्रमांच्या लुटीनेच तयार झालेली असतात.

ताजा कलम: जर मालक त्याच मजुरीत कामाचे जास्त तास करू पाहत असेल तर त्याचा काय अर्थ होतो?
त्याचा अर्थ होतो की तो श्रमांची लूट वाढवू इच्छितो! कारण जितके कामगारांचे श्रम तो मोफत लुटेल, तितका त्याला अधिक नफा होईल.
पण कोणीही शहाणा माणूस आपण करत असलेली चोरी कबूल करेल का?
नाही करणार. उलट तो अधिक शेंड्या लावेल.
जसे देश महासत्ता बनण्यासाठी आठवड्याला सत्तर तास काम करा, असे कोणी मूर्ती नावाचा भांडवलदार म्हणेल. तर कधी नव्वद तास काम करण्याचा उपदेश सुब्रमण्यम नावाचा कोणी दुसरा भांडवलदार करेल.
भांडवलदाराला जादा श्रम लूटू दिले तर सत्ता कोणाची वाढेल? मालकाची की कामगारांची? अर्थातच मालकांची. आणि मालकाची सत्ता वाढणे म्हणजे देश महासत्ता होणे नव्हे. जसे जमीनदाराची श्रीमंती वाढणे, सत्ता वाढणे म्हणजे गावाची श्रीमंती आणि सत्ता वाढणे नव्हे!
……
डॉ. रुपेश पाटकर

  • Related Posts

    मगोच्या राजवटीत नक्की कोणाची हानी ?

    ओपिनियन पोल हा उच्चवर्णीयांचे हक्क आणि संसाधनांवर असलेल्या त्यांच्या मालकीबाबत ‘स्टेटस क्वो’ कायम करण्यासाठीचा लढा होता. बांदोडकरांचे बहुजनकेंद्री राजकारण त्यासाठी अडथळा ठरत होते त्यामुळे त्याची घोडदौड रोखण्याचे सगळे प्रयत्न विरोधकांनी…

    उघडले आमठाणेचे दार…

    बार्देशच्या नळांना पाण्याचा मार्ग मोकळा डिचोली, दि. २९ (प्रतिनिधी) तिलारीच्या साटेली – भेडशी येथील कालव्याला भगदाड पडल्यानंतर गेले सात दिवस बार्देश तालुक्यात तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमठाणे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सामाजिक कार्यकर्त्यांची सितेची परीक्षा

    सामाजिक कार्यकर्त्यांची सितेची परीक्षा

    टीसीपीच्या नाकात जनहीत याचिकांचे वेसण

    टीसीपीच्या नाकात जनहीत याचिकांचे वेसण

    14/02/2025 e-paper

    14/02/2025 e-paper

    13/02/2025 e-paper

    13/02/2025 e-paper

    कोमुनिदाद जमिनीतील अतिक्रमणांचे काय ?

    कोमुनिदाद जमिनीतील अतिक्रमणांचे काय ?

    आमदार जीत आरोलकरांचे अभिनंदन!

    आमदार जीत आरोलकरांचे अभिनंदन!
    error: Content is protected !!