
हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
गांवकारी, दि.२१ (प्रतिनिधी)
मान्सूनच्या आगमनाला पंधरवडा बाकी असतानाच, मंगळवारपासून संपूर्ण गोव्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाची बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आलेल्या या पावसाने आपत्ती व्यवस्थापन पूर्णतः कोलमडल्याचे स्पष्ट झाले. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे.
मान्सून हाकेवर असताना मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ करण्यात आला. अनेक ठिकाणी रस्त्यालगत खोदकाम, रस्त्यांचे हॉटमिक्सिंग तसेच शाळांच्या दुरुस्तीची कामे सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. विविध शहरांतील गटारे न उपसल्याने पावसाचे पाणी साचून अनेकांच्या घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. नगरपालिकांच्या अपयशाचा पोलखोलच या पावसाने केला आहे. म्हापसा, पणजी, मडगाव आदी शहरांत बाजारपेठा पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने यापूर्वीच सतर्कतेचा इशारा दिला होता, परंतु सरकारने तो दुर्लक्षित केल्यामुळे अवकाळी पावसाच्या आगमनानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
ओडशेल- ताळगाव येथे मातीचे ओहोळ
ओडशेल ताळगाव येथे डोंगर कापणी करून एक भव्य प्रकल्प उभारला जात आहे. ओडशेलचे भाटकार सादीक शेख यांचा हा प्रकल्प असल्याची माहिती आपचे फ्रान्सिस कुएलो यांनी दिली. या प्रकल्पामुळे डोंगर पठारावर खोदकाम करून तिथे साठवलेली माती या पावसामुळे संपूर्णपणे खाली लोकवस्तीत वाहून आली, ज्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे.
या ठिकाणी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनीही पाहणी केली. आपचे सेसिल रॉड्रिगीस आणि आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्यात बाचाबाची झाली, इतकेच नव्हे, तर एकमेकांना ढकलण्याचा प्रकारही घडला. पंचसदस्य सिडनी बर्रोटो यांनी ही स्थिती दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला.
हवामान खात्याचा रेड अलर्ट
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. काल सकाळी सुरू झालेला पाऊस आजही सकाळपासून सुरूच असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मान्सूनपूर्व कामे अडकून पडल्यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ठिकठिकाणी पडझड
पणजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक भले मोठे झाड कोसळल्यामुळे किमान पाच ते सहा दुचाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. म्हालवाडा पैंगिण येथे एका घरावर फणसाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
कासारवर्णे-पेडणे येथे वड कोसळून तिथे पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान झाले. या पावसाचा विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दाबोळी येथे उतरणारे मुंबई-गोवा विमान बेळगावला तर पुणे-गोवा विमान हैदराबादला वळवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.