
मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा
गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)
कारापूर-साखळी येथील लोढा कंपनीच्या वन गोवा पंचतारांकित प्रकल्पासाठी विक्री झालेल्या जमिनीच्या मालकीवरून केरी-सत्तरी येथील राणे कुटुंबात भाऊबंदकी सुरू आहे. या प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याविरोधात एसआयटीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी या तक्रारीच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंजुरीची प्रतीक्षा करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
बेकायदा जमीन व्यवहाराचा आरोप
कारापूर-साखळी येथील जमिनीमध्ये केरी-सत्तरी राणे कुटुंबाचा ५०% हिस्सा आहे. मात्र, त्यांना अंधारात ठेवून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ही जमीन एरिक्टर इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीला विकली, असा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार श्रीमती हिराबाई इंदूराव राणे यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, १९९७ साली कंपनी अस्तित्वात नसताना ही जमीन कारापूर इस्टेटस प्रा. लि.च्या नावे कशी काय होऊ शकते? तलाठ्याच्या मदतीने बेकायदा म्यूटेशन करण्यात आल्याचा ठपका तक्रारदारांनी ठेवला आहे.
एसआयटीच्या भूमिकेबाबत संभ्रम
ही तक्रार ५ जून रोजी दाखल झाली असून, वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर मौन धारण करून आहेत. विश्वजीत राणे हे मंत्री असल्याने त्यांच्या विरोधात चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची गरज आहे, आणि लवकरच या तक्रारीसोबत प्रस्ताव पाठवला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणामुळे सरकार व भाजपसाठी मोठी मानहानी ठरण्याची शक्यता आहे.