आक्षेपार्ह व्हिडिओमुळे येणार अडचणीत
मडगांव,दि. १५ (प्रतिनिधी)-
दक्षिण गोव्यातील माजोर्डा गांवचा सुपुत्र आणि मस्कत-ओमान येथे वास्तव करणारा प्रसिद्ध पॉप गायक अवि ब्रागांझा याच्या आक्षेपार्ह व्हिडिओची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. अवि ब्रागांझा याच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा हिंदू धर्माबाबत हिंसेची भाषा वापरून हा व्हिडिओ तयार केल्यामुळे तीव्र संताप उमटला आहे.
मनीके मागे हीते…
प्रसिद्ध श्रीलंकन पॉप गायीका योहानी यांच्या मनीके मागे हीते या प्रचंड गाजलेल्या गीतावर कोकणी, हिंदी रॅप गाणे तयार केलेला अवि ब्रागांझा बराच चर्चेत आला होता. त्याच्या या कोकणी रॅप गाण्याने जगभरातील गोंयकारांना वेड लावले होते. या गाण्यामुळे तो बराच प्रसिद्धत आला होता. मात्र आपल्या या कलेची मर्यादा ओलांडून अवि ब्रागांझा यांनी अत्यंत अश्लाघ्य आणि हिंसक भाषेचा वापर करून नव्याने तयार केलेल्या गाण्यामुळे त्याच्या लोकप्रियतेला हादरा बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती प्रचंड आकस आणि द्वेष तसेच हिंदू धर्माबद्दलही हिंसक शब्दांचा वापर करून त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओमुळे राज्यात पुन्हा वातावरण गढुळ बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलिसांची कारवाई सुरू
गोवा पोलिसांनी सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे. अनेकांनी या व्हिडिओबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्याने पोलिसांना याबाबत कारवाई करणे भाग पडले आहे. अवि ब्रागांझा हा मुळ माजोर्डा येथील युवक असून तो विदेशात रॅप तथा पॉप गायनाचे कार्यक्रम करतो. खुद्द ख्रिस्ती समाजातूनच त्याच्या या व्हिडिओबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
वेलिंगकरांना दिलासा, चौकशीत सहकार्य
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
सेंट फ्रान्सिस झेविअरसंबंधी आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अडचणीत आलेले सुभाष वेलिंगकर यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. ते चौकशीत पूर्ण सहकार्य करीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याने आणि या वक्तव्याच्या मुळाशी न्यायालय जाऊ पाहत नसल्याने ही याचिका अखेर निकालात काढण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर आज या याचिकेवरील पुढील सुनावणी होती. या विषयाच्या मुळ मुद्दांशी खंडपीठाला जायचे नाही. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने लावून या प्रकरणी कारवाई करावी,असे खंडपीठाने सुचवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीत वेलिंगकर योग्य ते सहकार्य करत असल्याची भूमीका घेतली. त्यांची चौकशीसाठी गरज लागल्यास त्यांना नव्याने नोटीस जारी करून बोलावले जाईल आणि तूर्त त्यांना ताब्यात घेण्याची गरज नाही,असेही पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या भूमिकेनंतर अखेर खंडपीठाने ही याचिका निकालात काढली.