मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांकडून अटकाव
गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी):
राज्यातील रस्त्यांची दुर्दशा आणि वाढते अपघात याविरोधात “आमकां नाका, बीजेपीचे बुराक” या घोषणेखाली सुरू केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून आज तब्बल एक लाख नागरिकांच्या सह्यांचे अर्ज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आम आदमी पार्टीने मंत्रालयात धडक दिली. मात्र, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अटकाव केला.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पणजी येथील ‘आप’च्या कार्यालयात या धडक मोर्चाला हिरवा कंदील दाखवला. राज्यभरातून एक लाख नागरिकांच्या सह्यांसह विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या दुर्दशेची माहिती देणारे हे अर्ज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी पणजी ते पर्वरी मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला.
‘आप’चे राज्य संयोजक अॅड. अमित पालेकर, आमदार वेन्झी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, प्रभारी आतिशी, श्रीकृष्ण परब, राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नायक आदी उपस्थित होते.
अॅड. अमित पालेकर यांनी भाजपच्या कार्यकाळात रस्त्यांची चाळण झाली असून लोकांचा जीव मेटाकुटीला आल्याची टीका केली. राज्यातील रस्ते हेच भाजपच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
धोकादायक रस्त्यांना जबाबदार कोण?
सामान्य नागरिकांना रोज नोकरी, व्यवसायासाठी प्रवास करावा लागतो. दुचाकीधारकांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. खड्ड्यांमुळे लोकांची कंबर मोडली आहे. फक्त कमिशनबाजी सुरू असल्यामुळेच रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. रस्ते बांधणीच्या प्रतिज्ञापत्रात रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असते. मात्र, एकदा काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार तोंडच दाखवत नाहीत. त्यामुळे या कंत्राटदारांकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याची गरज आहे, असे अॅड. पालेकर म्हणाले.
मुख्यमंत्री भेटले
पर्वरी मंत्रालयाबाहेर बसलेल्या ‘आप’च्या आंदोलनकर्त्यांना अखेर मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. राज्यातील रस्त्यांचे दुरुस्ती काम लवकरच हाती घेण्यात येणार असून, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होईल, असे त्यांनी सांगितले.





