कुटुंबातील सर्वांना बांधून ५० लाखांची लूट
गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी)
म्हापसा शहरातील गणेशपुरी भागात काल रात्री एका डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकून सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना घडली. अंदाजे पाच जणांनी रात्री घरात घुसून कुटुंबातील सर्वांना दोरीने बांधून रोख रक्कम आणि सुवर्णालंकार पळवल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना सोमवारी रात्री घडली. गणेशपुरी येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या घरावर हा दरोडा पडला. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी जाताना त्यांचे वाहन घेऊनच पलायन केल्याचीही खबर प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे म्हापसा परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच पोलिसांच्या विश्वासार्हतेवर संशय निर्माण करणारी ही घटना आहे.
गणेशपुरी भागात प्रतिष्ठित लोकांची वसाहत आहेच, परंतु अलिकडच्या काळात या परिसरात स्थलांतरित कामगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या दरोड्याचा तपास सुरू केला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दोनापावला येथे एका उद्योजकाच्या घरावर असाच दरोडा पडला होता, परंतु त्याचा तपास अद्यापही अपूर्ण आहे. आता ही दुसरी मोठी दरोड्याची घटना घडल्यामुळे गृह खात्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.





