सरकारने हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
गोवा वाहतूक नियमांतील ‘रेंट अॅग्रीमेंट’चा वापर करून परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात राज्यात मालवाहतूक वाहनांची नोंदणी केली जात आहे. मूळ राज्यातील कंत्राटदार व इतर व्यावसायिकांच्या सहाय्याने स्थानिक वाहतूकदारांचा व्यवसाय हिरावून घेतला जात आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर स्थानिक वाहतूकदारांना व्यवसाय बंद करून गाशा गुंडाळावा लागेल. सरकारने त्वरित हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पेडणे-बार्देश ट्रक मालक संघटनेने दिला आहे.
राज्यात परप्रांतीयांनी मालवाहतूक व्यवसायात मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू केली आहे. विशेषतः पेडणे आणि बार्देश तालुक्यातील स्थानिक मालवाहतूकदारांचा व्यवसाय बळकावला जात आहे. कर्नाटकातील मालवाहतूकदारांनी गोव्यात स्थायिक झालेल्या कर्नाटक राज्यातील नागरिकांचा आधार घेत, काही राजकीय नेत्यांशी संबंध निर्माण केले आहेत. या नेत्यांच्या आश्रयाने हे वाहतूकदार दादागिरी करत असून, काहीही झाले तरी त्यांचेच नाव घेऊन स्थानिकांना धमकावण्याचा प्रकार सुरू आहे.
विविध कारणांमुळे वाहतूकदार आर्थिक अडचणीत असताना, स्थानिकांच्या पोटावर लाथ मारली जात असल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्री. मिलिंद शेटये यांनी सांगितले. आर.टी.ओ. व एजंटांच्या मदतीने भाडेकरू असल्याचे करार करून वाहने थेट गोव्यात नोंदवली जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मतदारांच्या नावाने धमकी
पेडणे येथे एका परप्रांतीय ट्रक चालकाला मारहाण झाल्याचे कारण देत परप्रांतीय वाहतूकदारांनी थेट कर्नाटकात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्थानिकांवर दादागिरीचा आरोप केला आहे. याच परप्रांतीयांनी बार्देश ट्रक मालक संघटना स्थापन करून स्थानिकांना धमकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यातील ४० मतदारसंघांत कर्नाटकचे मतदार असल्याने आम्हाला परप्रांतीय ठरवू नये, असे म्हणत त्यांनी इशारा दिला. आम्ही अनेक वर्षांपासून गोव्यात व्यवसाय करत असून, त्यामुळे परकीय समजणे अयोग्य आहे, असा दावा करून त्यांनी राजकीय नेत्यांचा पाठींबा असल्याचेही सूचित केले आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट
पेडणे-बार्देश ट्रक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हा विषय सविस्तरपणे मांडला. मांद्रेचे आमदार श्री. जीत आरोलकर यांनी ही भेट मिळवून देण्यात मदत केली. रेती, चिरे, खडी या व्यवसायांमध्ये परप्रांतीयांनी घुसखोरी केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर स्थानिकांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल आणि पूर्ण मालवाहतूक व्यवसाय परप्रांतीयांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. या विषयावर काहीतरी तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्याचे शेटये यांनी सांगितले.





