दोन कामगार जखमी, पोलिस तपास सुरू
गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील उगवे गावात काल पहाटे रेती व्यवसायातून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. या घटनेत रमेश पासवान आणि लालबहाद्दूर गोंड हे दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर गोवा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पेडणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. उगवे–पोरस्कडे भागात प्रामुख्याने रेती व्यवसाय चालतो. या व्यवसायामुळे उगवे गावातील शेतजमीन न्हयबाग नदीत कोसळत असल्याने ग्रामस्थांनी वेळोवेळी सरकारकडे आणि शेवटी न्यायालयात धाव घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
सध्या पोरस्कडे भागात रेती व्यवसायातून स्पर्धा वाढली आहे. रात्रीच्या वेळी एकमेकांच्या हद्दीत घुसून रेती उपसा केला जात असल्यामुळे वाद आणि मारामाऱ्या हे रोजचेच झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रेती व्यवसायिकांकडून पोलिसांना हप्ते दिले जातात आणि त्यामुळे पोलिस मोठी घटना घडल्याशिवाय या प्रकारांकडे दुर्लक्ष करतात.
न्यायालयालाही वाकुल्या
न्यायालयाकडून वेळोवेळी सरकारी प्रशासनाला रेती व्यवसायावरून सुनावणी देण्यात आली असली तरी सरकारला या व्यवसायावर नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. प्रत्यक्षात या व्यवसायाचे नियमितीकरण करणे अत्यावश्यक आहे. बांधकामांसाठी रेतीची वाढती मागणी असल्यामुळे चोरीने रेती उपसा सुरूच आहे. सरकारची निष्क्रियता या प्रकारांना कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.
रेती व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे सरकारने या लोकांना विश्वासात घेऊन यासंदर्भात धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. मात्र, सरकारी अधिकारी रेती व्यवसायिकांच्या हप्त्यांना भुलून त्यांच्यासाठी रान मोकळे करून देण्यातच धन्यता मानतात, अशी परखड प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
कामगारांची नोंद आवश्यक
रेती व्यवसायाच्या निमित्ताने हा संपूर्ण पट्टा बिगर गोमंतकीय कामगारांनी भरला आहे. या कामगारांची नोंद पोलिसांकडे आहे की नाही, हे स्पष्ट नाही. यापूर्वी एकमेकांवर हल्ले करून रातोरात गायब होण्याचे प्रकारही घडले आहेत. एवढे असूनही सरकारला जाग येत नाही. या कामगारांची नोंद रेती व्यवसायिकांसह स्थानिक पंचायत आणि पोलिसांकडे असणे अत्यावश्यक आहे, असे स्थानिकांनी सांगितले.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
गोव्यात अलीकडच्या काळात सुरू असलेल्या घटनांवरून पोलिसांचा धाक उरलेला नाही, असे स्पष्ट होते. कुणीही कायदा हातात घेण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. या परिस्थितीवर वेळीच उपाययोजना आखली नाही, तर भविष्यात गोव्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले. सर्वंच राजकीय विरोधी पक्षांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.





