महसूलमंत्र्यांच्या पुत्राला विशेषाधिकार कसा?
गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)
ताळगांव पंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक १८६/३ या जमिनीत महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे पुत्र आणि पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात यांनी सुरू केलेल्या बांधकामास अद्याप सनद प्राप्त झालेली नाही. सनद न मिळवता बांधकाम सुरू ठेवणे हे महसूलमंत्र्यांच्या सुपुत्रानेच केल्यामुळे, हा विशेषाधिकार आहे का, असा सवाल ताळगांव कोमुनिदादचे गांवकार विटो गोम्स यांनी उपस्थित केला आहे.
ताळगांवमधील भातशेतीच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर एक बंगला बांधला जात असल्याचे प्रकरण काही काळापासून चर्चेत आहे. हे बांधकाम स्वतःचे असून आपण घर बांधत आहोत, असे स्पष्टीकरण महापौर रोहीत मोन्सेरात यांनी दिले होते. या प्रकरणी गांवकार विटो गोम्स यांनी तक्रार दाखल केल्यानंतर, रोहीत मोन्सेरात यांनी १६ जुलै २०२५ रोजी सनदसाठी अर्ज सादर केला. या अर्जाची छाननी ११ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने सनद देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे, सनद मिळण्याआधीच ताळगांव पंचायतीकडून बांधकाम परवाना कसा दिला गेला? तसेच पीडीएची परवानगी मिळवली आहे का? असे प्रश्न विटो गोम्स यांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज करूनही पंचायत आणि पीडीएकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले.
बेकायदा बांधकामाचा आदर्श महसूलमंत्रीच घालून देत आहेत आणि गोंयकारांना कायदेशीर बांधकामाचे सल्ले देत आहेत, हे म्हणजे प्रशासकीय बेजबाबदारपणाचा कळस असल्याची टीका विटो गोम्स यांनी केली.
शेतजमीनीचे सेटलमेंटमध्ये रूपांतर
ताळगांव पंचायत क्षेत्रातील कोमुनिदादच्या मालकीची ही भातशेतीची जमीन आहे. या जमिनीत लुसिन्हा व्हिएगश नावाच्या महिलेची झोपडी होती, तर उर्वरित जागा कोमुनिदादकडून कार्लूस व्हिएगश यांच्याकडे होती. ही जमीन १९८९ साली बाबुश मोन्सेरात आणि जेनिफर मोन्सेरात यांनी कार्लूस व्हिएगश आणि एना फर्नांडिस यांच्याकडून विकत घेतली. नंतर १९९९ साली हीच जमीन रोहीत मोन्सेरात यांनी खरेदी केली.
विशेष बाब म्हणजे सभोवताली सर्वत्र भातशेती असताना, हीच जमीन ग्रेटर पणजीने तयार केलेल्या बाह्य विकास आराखड्यात ‘सेटलमेंट’ म्हणून दर्शवण्यात आली आहे. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्या काळात २०१९ मध्ये ग्रेटर पणजीचे अध्यक्ष बाबुश मोन्सेरात होते आणि त्यांनी आपल्या पुत्राच्या शेतजमिनीचे सेटलमेंट करून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.
जरी ही जमीन सेटलमेंटमध्ये दाखवली गेली असली, तरी सनद मिळण्याआधीच शेतात भराव टाकून आणि शेजारील शेतजमिनीत अतिक्रमण करून बांधकाम सुरू करण्यात आले आहे. महसूलमंत्र्यांच्या पुत्राकडून हे बांधकाम सुरू असल्यामुळे पंचायत आणि महसूल अधिकारी केवळ पाहत राहिले आहेत, असा आरोप विटो गोम्स यांनी केला आहे.





