समग्र शिक्षा: कला शिक्षकांचा संघर्ष

नेमणूक झाली, पण पगारच नाही!

गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)

गोवा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील विविध शाळांमध्ये सुमारे शंभराहून अधिक कला शिक्षकांची नेमणूक शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे. मात्र, या शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या तरी अद्याप त्यांना पगारच देण्यात आलेला नाही. या महिन्याच्या अखेरीस त्यांचे वार्षिक कंत्राट संपणार असून, वर्षभर पगाराविना हे शिक्षक काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गोवा शिक्षण खात्याच्या वतीने गोवा समग्र शिक्षा अभियान हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. कला, कौशल्य आदी शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा, या हेतूने वेगवेगळे उपक्रम या अभियानामार्फत राबवले जात आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला असून, त्याची कार्यवाही गोवा समग्र शिक्षण अभियानामार्फत केली जात आहे. विविध सरकारी व अनुदानित शाळांमध्ये चित्रकला, संगीत, नृत्य आणि नाट्यकला हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी गोवा समग्र शिक्षा अभियानातर्फे सुमारे दीडशेहून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला असला तरी त्यांच्या पगाराची सोयच करण्यात आली नसल्याने हे शिक्षक गेले वर्षभर बिनपगारी सेवा बजावत आहेत.
नियुक्ती प्रस्ताव पाठवून वर्ष उलटले, तरी नियुक्ती नाही!
शिक्षण खात्याच्या कारभाराचे वाभाडेच गोवा समग्र शिक्षा अभियानाच्या कारभारावरून स्पष्ट झाले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये गोवा समग्र शिक्षा अभियानांतर्गत कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी विविध उमेदवारांना नियुक्ती प्रस्ताव पाठविण्यात आले. ह्यापैकी सुमारे शंभर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी अनेकांना नियुक्ती प्रस्ताव पाठवूनही नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत.
नियुक्त झालेल्या उमेदवारांचा गेले वर्षभर पगाराच्या नावाने टोलवाटोलवी सुरू आहे. वर्ष उलटले तरी पगारच मिळालेला नसल्याने हे शिक्षक अत्यंत नाराज आहेत. “ही थट्टा नेमकी काय चालली आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कंत्राट नुतनीकरणात डावलण्याच्या भीतीने हा अन्याय मुकाट्याने सहन केला जात आहे. महिना २० हजार रुपये पगारावर या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, सरकारच्या वित्त खात्याकडे संपर्क साधला असता या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत वित्त खात्याकडून पगाराच्या तरतुदीच करण्यात आलेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे खाती, मग हा गोंधळ का?
शिक्षण आणि वित्त ही दोन्ही खाती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अखत्यारीत आहेत. मग त्यांच्या खात्यांकडून कला शिक्षकांची ही उघड थट्टा का सुरू आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
गोवा समग्र शिक्षा अभियानांतर्गत नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या पगाराची सोय का करण्यात आली नाही? ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त योजना असून, ६० टक्के निधी केंद्र सरकार आणि ४० टक्के निधी राज्य सरकार पुरवते. मात्र, मुख्यमंत्र्यांकडील दोन्ही खात्यांच्या हलगर्जीपणामुळे या उमेदवारांची फरफट सुरू असल्याने हा विषय चर्चेत आहे.

  • Related Posts

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    प्रखर आंदोलनाचा संघटनेचा इशारागांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) कदंब परिवहन महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. दिवसेंदिवस महामंडळ आपली जबाबदारी झटकून कर्मचाऱ्यांना खाजगी कंत्राटदार कंपन्यांच्या दाव्याला बांधत आहे. हा प्रकार अजिबात…

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    Panaji, March 21, 2026: St Andre MLA Viresh Borkar has submitted a Notice of Motion for Breach of Privilege under Rule 76 of the Goa Legislative Assembly, raising serious concerns…

    You Missed

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    21/03/2026 e-paper

    21/03/2026 e-paper

    किती म्हणून सहन करणार ?

    किती म्हणून सहन करणार ?