चंगळवादाचे मानसशास्त्र

(जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक चितन ! )


‘चंगळवाद’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. एक ‘चंगळ’ आणि दुसरा ‘वाद’. यातील ‘चंगळ’ शब्दाचा अर्थ आहे सुखसाधनांची रेलचेल! आणि वाद शब्दाचा अर्थ आहे विचारधारा किंवा तत्वज्ञान. चंगळवाद म्हणजे सुखसुधनांच्या रेलचेल असलेलं जीवन असावं, असा दृष्टीकोन मानणं.
आपण समजा कोणालाही असा प्रश्न विचारला की ‘जीवनात सुखसाधनांची रेलचेल असावी की असू नये?’ तर काय उत्तर येईल? अर्थातच ‘असावी’ असं उत्तर येईल. त्याच माणसाला आपण समजा पुढचा प्रश्न विचारला की समाजात किंवा माणसाच्या जीवनात ‘सुखसाधनांची रेलचेल का असावी?’ तर तो म्हणेल, ‘हा कसला फालतू प्रश्न विचारताय. माणसाने सुखाने जगण्यासाठी!’
त्याचे हे उत्तर स्वाभाविक आहे, तर्कशुद्ध वाटते आहे. पण आपला अनुभव काय आहे? सुखासमाधानांच्या रेलचेलीमुळे मानवी जीवनात सुख वाढलेय का? पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा सामान्य लोकांच्या जीवनात आजच्याप्रमाणे सुखसाधने नव्हती, तेव्हा माणसांच्या जीवनात कमी सुख होते का? गेल्या पन्नास वर्षांत सुखसाधनांच्या वाढीसोबत सुख वाढत गेलेय असे वाटते का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही!’ असेच आहे. सुखसाधनांच्या रेलचेलीमुळे सुख वाढलेले तर नाहीच, उलट सुखाने जगणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेय. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मी जेव्हा माझ्या पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘मनोविकार’ हा विषय निवडला तेव्हा अनेक सामान्य मंडळींनी मला ऐकवले की ‘बरे केलेत. सायकीयॅट्री निवडलीत. आजच्या काळात सायकीयॅट्रीला स्कोप आहे!’ म्हणजे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ माणसांची संख्या वाढते आहे, हे पंचवीस वर्षांपूर्वी सामान्य लोकांनादेखील जाणवू लागले होते.
सुखसाधने जसजशी वाढत जात आहेत, तसतसा आनंद वाढत नाहीए, असे का होतेय? एक उदाहरण घेऊन याचे एक उत्तर समजून घेऊ. आपल्याला हा अनुभव असतो की आपल्याकडे चप्पल नसेल, आपल्याला अनवाणी शाळेत जावे लागत असेल तर आपल्याला दुःख असते. अशा वंचिततेमध्ये चप्पल मिळाले की आपल्याला आनंद होतो. आपली सांपत्तिक स्थिती बरी झाली आणि चपलासोबत बुट देखील मिळाले तर आणखी आनंद होतो. पण समजा या दोन जोडी पादत्राणांशिवाय आपल्या मावशीने चपलाचा आणखी एक जोड दिला तर पहिले चप्पल मिळाले तेव्हा जसा आनंद झाला होता, तितकाच आनंद तिसऱ्या पादत्राणाने मिळतो का? नाही. तो कमी मिळतो. समजा, यापुढे अशी चपले मिळतच राहीली तर प्रत्येक नव्या चपलासोबत आनंदाचे प्रमाण कमीकमी होत जाते. कदाचित पाचव्या जोडासोबत असा आनंद मिळणे शून्य होऊन जाईल. याला म्हणतात थिअरी ऑफ मार्जिनल युटीलिटी.
पण आजच्या समाजात असे घडतेय की यापेक्षा वेगळे घडतेय? नव्या सुखसाधनांनी आनंद वाढत नाहीए, पण नवनव्या वस्तूंचा हव्यासही कमी होत नाहीए. पूर्वीच्या काळी एकाच महिन्यात चपलांचा चौथा जोड मिळाला असता तर ‘आपण याचे काय करु? गळ्यात बांधून फिरायचे आहे का?’ असे तुच्छतादर्शक उत्तर आले असते. पण आज अशी मंडळी आढळतील की ज्यांच्याकडे एका माणसाच्या चपला ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटाची सोय करण्यात आलेली आहे. गरज नसताना नव्या वस्तू खरेदी करण्याचे, गरज नसताना घरे खरेदी करण्याचे, गरज नसताना उत्सव साजरे करण्याचे जणू व्यसन समाजाला लागलेय. यातून आनंद वाढलेला तर नाहीच, उलट मानसिक अस्वास्थ्य मात्र वाढलेय. सहकाराऐवजी संघर्ष, द्वेष, शत्रूत्व वाढलेय.
जेव्हा अन्नाचे किंवा सुखसाधनांचे दुर्भिक्ष्य होते तेव्हा मिळेल ते, मिळेल तेथील साठवणे आवश्यक होते. ते मिळवण्यासाठी इतरांशी संघर्ष करणे आवश्यक होते. तिथे अस्तित्वासाठी शत्रुत्व आणि भविष्यातही अन्न व सुखसाधने आपल्या वाट्यात रहावीत यासाठी सत्तेचा हव्यास, हे तार्किक वाटले असते.
पण आता सुखसाधनांची रेलचेल झाल्यावरही या भावना का शिल्लक राहील्या? नुसत्या राहिल्या नाहीत तर वाढल्या. केवळ मानसिक स्वास्थ्यच नाही, सामाजिक स्वास्थ्य देखील धोक्यात आलेय. वाढत्या उपभोगाचा परीणाम वाढत्या प्रमाणात नैसर्गिक स्त्रोत नष्ट करण्यात होत आहे. हे स्त्रोत मर्यादित तर आहेतच, शिवाय जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल असे पर्यावरणीय प्रश्न उभे राहिलेत. म्हणजे ही चंगळवादी शैली आत्मनाशी आहे.
गंमत म्हणजे आपल्याला आज जाणवणारा हा प्राॅब्लेम डाॅ. एरिक फ्रॉम या मानसोपचारतज्ज्ञला फार पूर्वीच जाणवू लागला होता. १९७६ मध्येच त्यांनी ‘टू हॅव ऑर टू बी?’ या पुस्तकाच्या सुरवातीलाच मानवजातीने औद्योगिक युगाच्या प्रारंभी पाहिलेले मानवमुक्तीचे महान स्वप्न भंग पावले आहे असे जाहीर केले होते.
असे का घडले? काय झाला प्राॅब्लेम? मानवीजात अशी अविवेकी आत्मघातकी का वागते आहे? या अविवेकी वागण्यामागे मनाचे कोणते नियम आहेत? डाॅ.फ्राॅमनी याचे स्पष्टीकरण त्याच्याही आधी तीस वर्षे म्हणजे १९४६ च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या ‘फियर ऑफ फ्रिडम’ या पुस्तकात केले आहे. ते म्हणतात, ‘मानवाला स्वातंत्र्यसोबत एकटेपणा मिळाला आहे.’ डाॅ. फ्राॅमच्या या म्हणण्याचा अर्थ काय? त्यासाठी आपल्याला लांबच्या भूतकाळात जायला हवे. जेव्हा माणूस हा ‘प्राणी-अवस्थे’तून ‘माणूस-अवस्थे’त आला, तेव्हाच्या काळात जायला हवे. आणि प्राण्याचा माणूस बनला म्हणजे नेमके काय झाले हे समजून घेतले पाहिजे. ‘मी एक स्वतंत्र प्राणी आहे. मी वेगळा आणि इतर माणसे वेगळी. मी वेगळा आणि निसर्ग वेगळा,’ याची जाणीव माणसाला होऊ लागणे म्हणजे माणूस बनणे. अशी जाणीव फक्त माणसालाच असते. ती गायीला नसते, मांजराला नसते, इतर कोणत्याच प्राण्याला नसते. या जाणीवेचे जैविक कारण आहे, माणसाला मिळालेला विचार करणारा मेंदू! या तार्किक मेंदूमुळे झाले काय की माणसाला जीवनातील अनिश्चितता कळू लागली. आपण आपल्या सोबत्यांच्या आधी मरू किंवा सोबती आपल्याआधी मरतील हे लक्षात येऊ लागले. गायीला हे कळत नाही, कुत्र्याला हे कळत नाही. म्हणजे माणसाला आपण स्वतंत्र आहोत या जाणीवेसोबत विभक्त आहोत, एकटे आहोत ही जाणीव देखील आली. अगदी सुरवातीच्या काळात माणसाला आपल्या स्वतंत्रपणाची किंवा विभक्तपणाची जेव्हा जाणीव झाली, तेव्हा तो जंगलातच होता. त्याला मानसिक पातळीवर निसर्गापासून विभक्तपणा जाणवू लागला असला तरीही तो निसर्गाच्या कुशीतच होता. त्यावेळी तो प्राण्यांचे मुखवटे धारण करुन, प्राणी-झाडे ही कुललक्षणे मानून जुजबी कर्मकांडे करून एकटेपणावर मात करी. या एकटेपणावर मात करण्याचे वेगवेगळे मार्ग मानवी समाजाने आतापर्यंत वापरले आहेत. अर्थात हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की निसर्गापासून विभक्ती होण्याची प्रक्रीया जरी लाख वर्षांपूर्वी सुरू झालेली असली तरी ती औद्योगिक युगाच्या आरंभापर्यंत पूर्णत्वास गेलेली नव्हती. मध्ययुगात माणूस हा अमूक एका जातीचा, अमूक एका वस्तीचा, अमूक एका गावाचा असे. पण औद्योगिक युगाने हे बंध देखील तोडून टाकले. माणूस पूर्णपणे एकटा केला. या एकटेपणावर मात कशी करायची हा औद्योगिक युगातील माणसासमोरचा प्रश्न आहे. त्यावर मात करण्यासाठी माणसाने कनफाॅरमिटीचा मार्ग पत्करला. कनफाॅरमिटी म्हणजे काय? कळपाचा भाग बनण्याचा प्रयत्न करणे. एखाद्या क्लबचा मेंबर होणे किंवा एखाद्या पक्षाचे मेंबर होणे. मग साहजिकच गटाची अभिवादनाची पद्धत, गटाची कपड्यांची किंवा वेशभूषेची पद्धत, गटाचे गप्पांचे विषय, गटाचे मनोरंजनाचे विषय, गटाचे श्रद्धेचे विषय, गटाचे श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे निकष स्विकारण्याकडे व्यक्तीचा कल असतो. तो गटाच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. हे नेणीवेच्या पातळीवर घडत असते, पण व्यक्तीला वाटते की आपण स्वतंत्रपणे हे निवडत आहोत. आधुनिक काळात एकटेपणाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा हा प्रयत्न असतो. पण हा प्रयत्न त्याला या विभक्तपणातून पूर्णपणे मुक्त करु शकत नाही.
आजच्या औद्योगिक समाज व्यवस्थेचा माणसाच्या स्वभावावर होणारा परिणाम आणि मध्ययुगीन शेती समज व्यवस्थेचा माणसाच्या स्वभावावर होणारा परिणाम यात गंमतीशीर फरक आहे. आजच्या औद्योगिक व्यवस्थेतील माणूस केव्हा एकदा काम संपते, केव्हा एकदा रिटायर्ड होतो हे पहात असतो. दुसरीकडे ज्यांचे आयुष्य शेतीत गेले, त्या माणसांना म्हातरपणी ‘काही करु नका’ म्हणून सांगितले तरी ती काही ना काही काम करत राहतात. त्यांना काम हे ओझे वाटत नाही. त्यांच्यासाठी काम हा विरंगुळा असतो. शेती व्यवस्थेत आणि औद्योगिक व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांमध्ये असा फरक का पडतो? औद्योगिक व्यवस्थेत काम करणाऱ्या माणसासाठी काम आधीच ठरलेले असते. तो कामगार असो किंवा नोकरशहा, तो एका यंत्रणेचा भाग असतो. त्याला तेच-ते काम पुन्हा पुन्हा करायचे असते. पण शेतात काम करणाऱ्याला निर्णय घ्यायचे असतात, त्याच्या सृजनशीलतेला वाव मिळत असतो. पण यंत्रावर काम करणारा कामगार किंवा मोठ्या प्रशासनाचा भाग असलेला नोकरशहा हा त्याच्या कामाच्यावेळी गुलाम असतो. तिथे त्याला शिस्तीत काम करावे लागते. त्याला पर्याय नसतो. पण ती शिस्त बाहेरून लादलेली असते. त्यामुळे त्याच्या मनात त्या शिस्तीविरोधात साठलेली घृणा तो सुट्टीच्या दिवशी काढतो. यावेळेत तो सर्व उपभोगू इच्छितो. त्या वस्तू आपल्या अधिकारात घेणे हे कामाच्या दिवसात भोगाव्या लागलेल्या गुलामीचे उट्टे काढण्याचा प्रयत्न असतो. अधिकाधिक आपल्या कब्जात घेऊन सक्तीच्या गुलामीवर मात करण्याचा त्याचे मन प्रयत्न करत राहते.
इथे कोणीही असा प्रश्न करेल की पूर्वीच्या काळात चंगळवादी लोक नव्हते का? होते ना. बहुतेक राजेरजवाडे, जमीनदार, वतनदार ऐयाशी जीवन जगत होते. पण एकंदरीत समाजाचा विचार करता त्यांची संख्या मूठभरच होती. चंगळवाद ही बहुसंख्य लोकांची विचारधारा नव्हती. डाॅ.फ्रॉम म्हणतात की ‘सतराव्या शतकापर्यंत ॲरिस्टोपस हा एकमेव अपवाद वगळता इतर कोणत्याही तत्त्ववेत्याने ‘वासनांची पूर्ती’ हे जीवनाचे ध्येय मानले नाही. भारत असो,चीन असो, पूर्वेकडील कोणाही आचार्याने ‘चंगळ’ हे जीवनाचे ध्येय मानले नाही.
औद्योगिक व्यवस्थेत जन्माला आलेल्या तत्त्ववेत्यांनी मात्र बहुसंख्येने चंगळवादाला तत्त्वज्ञान म्हणून उचलून धरले. डाॅ.फ्रॉम म्हणतात की औद्योगिक समाजाने ‘मालकीची जीवन शैली’ आणली. त्याला ते ‘हॅविंग मोड ऑफ एक्झिस्टंस’ म्हणतात. ही मालकीची प्रवृती अगदी शिकण्यासारख्या गोष्टीत देखील दिसते. मालकीची प्रवृत्ती असलेला माणूस वर्गात जाईल, व्याख्याने ऐकेल, नोट्स घेईल. शिकवलेले पाठ करेल. समजून घेईल. आणि हवे तेव्हा त्याला समजलेले सादरही करेल. पण ते त्याच्या विचाराचा भाग बनणार नाही. याच्या उलट प्रवृत्ती म्हणजे ‘बिईंग मोड ऑफ एक्झिस्टंस.’ याला नेमका मराठी पर्यायी शब्द मला सापडला नाही. हा मोड असलेला विद्यार्थी वर्गात जाईल. पण त्याआधी तो त्या विषयाशी संबंधित प्रश्न मनात आणेल. व्याख्यान ऐकताना आपल्या मनातील कोणत्या प्रश्नाचे उत्तर हे व्याख्यान देतेय हे त्याचे मन शोधेल. जो नवा विचार त्याला कळेल व पटेल, तो त्याच्या विचारसरणीचा भाग बनेल. आणि ते त्याच्या आचरणात बदल घडवून आणेल. ज्ञानेश्वरी अनेकजण वाचतात. अभ्यासही करतात. परीक्षाही देतात. त्यात उत्तम गुणही मिळवतात. पीएचडी देखील मिळवतात. पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू करण्यापुरवी जी त्यांची विचार करण्याची पद्धत असते, तीच पद्धत पीएचडी केल्यानंतर रहात असेल तर ते मालकी शैलीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होते. पण विनोबांसारखा एखादा जर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर विचार करण्याच्या पद्धतीत बदल करत असेल, ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तीयोग निश्चित, जाण माझा’ हे जीवनात आणत असेल तर तो ‘बीईंग मोड ऑफ एक्झिस्टंस’ होय.
डाॅ.फ्रॉम म्हणतात, आजचा माणूस एकटेपणावर मात करण्यासाठी दुसर्‍याला जोडण्याचा प्रयत्न करतो खरा, पण त्याचे हे जोडले जाणे एकतर सॅडिस्टीक (परपिडन) असते किंवा मेसोचिस्टिक (आत्मपिडन) असते. हे मार्ग वापरणाऱ्या बहुतेकात तुम्हाला उघड लक्षणे दाखवणारी पॅथाॅलाॅजी किंवा विकृती आढळणार नाही. कारण यातील बहुतेक मंडळी समाजिक परिस्थितीला जुळवून घेतात. जे जुळवून घेऊ शकत नाहीत, त्यांच्यात तुम्हाला स्पष्ट मानसिक चिन्हे दिसतील. पण प्रश्न असा आहे की जिथे व्यवस्थाच विकृत आहे, तिथे विकृत व्यवस्थेला जुळवून घेणाऱ्यांना निरोगी मानायचे का? डाॅ.फ्रॉम सांगतात, की या दोन प्रकारच्या माणसांपलिकडे (मूठभर का होईना) अशी मंडळी आहेत, ज्यांच्यात ना मानसिक विकृतीची लक्षणे आहेत, ना ते विकृत व्यवस्थेला जुळवून घेत आहेत. ती मंडळी स्वतःला स्वतःशी, इतरांशी आणि निसर्गाशी परिपक्व प्रेमाने जोडत आहेत. हे प्रेमाने जोडणे म्हणजे काय हे डाॅ.फ्राॅमनी १९५६ साली प्रकाशित केलेल्या ‘आर्ट ऑफ लव्हिंग’ या पुस्तकात मांडले आहे. प्रेम म्हणजे काय, असा सामान्य माणसाला प्रश्न केला तर काय उत्तर येईल? ओढ किंवा आवड भावनेच्या वेगवेगळ्या अविष्कारात उत्तर दिले जाईल. फ्राॅम साहेब विचारतात, समजा एखाद्याने आपले गुलाबावर प्रेम आहे असे म्हटले तर तुम्ही त्याचे खरोखरच गुलाबावर प्रेम आहे, हे कसे ओळखाल? तो रोज आपली फुलदाणी गुलाबाच्या फुलांनी सजवतोय यावरून ठरवाल की त्याच्या गुलाबाच्या झाडाची तो अशा प्रकारे मशागत करतोय की ते झाड त्याच्या पूर्ण क्षमतेने फुलावे, यावरून ठरवाल? इथे हा विचार देखील मनात येऊ शकतो की गुलाबाचे झाड पूर्णपणे फुलावे जेणेकरून मला खूप फुले मिळतील. असा जर विचार असेल तर तो प्रेमाचा विचार नाही. ‘मला अमक्याचा काय उपयोग होणार’ हे गृहीत धरून केलेली कृती ही प्रेम नव्हे, तो सोफिस्टिकेटेड व्यवहार झाला. आई मुलाला वाढवते तेव्हा तिच्या प्रेमाची पूर्णता यात असते की एक दिवस त्या मुलाने आईशिवाय स्वतंत्रपणे जीवन जगावे. जन्मता जे मूल आईचाच भाग असते, ते पूर्णपणे आईवरच अवलंबून असते, ते अवलंबत्व संपावे ही आईच्या प्रेमाची पूर्णता असते. म्हातारपणी मुलाने आपल्याला सांभाळावे हे आईच्या प्रेमाचे ध्येय नसते. तसे जर ध्येय असेल तर मुल ही आईची इंशुरन्स पाॅलिसी ठरेल.
जसे गुलाबाच्या झाडामध्ये आयुष्यभरात अमूक टवटवीत फुले फुलण्याची क्षमता असते तशीच प्रत्येक माणसामध्ये बुद्धत्व प्राप्त करण्याची क्षमता असते. बुद्धत्व प्राप्त करणे हे जीवनाचे सर्वश्रेष्ठ सार्थक होय. कोणत्याही माणसाला बुद्धत्व प्राप्तीच्या दिशेने जाण्यास मदत करणे हे त्याच्यावर प्रेम करणे होय. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे देखील स्वतःला बुद्धत्वाच्या दिशेने नेणे. असे स्वतःवर केलेले प्रेम दुसर्‍यावर केल्या जाणाऱ्या प्रेमाच्या विरुद्ध जाणार नाही.
डाॅ.फाॅर्म म्हणतात की बहुसंख्य लोक व्यवस्था बदलल्याशिवाय बदलणार नाहीत. पण वैयक्तिक पातळीवर ज्याला बदलाची गरज समजते, त्याने बदलायला सुरू करायला पाहिजे. त्याने ‘बीईंग मोड ऑफ एक्झिस्टंस’ ची वाट धरायला पाहिजे. ते कसे करायचे यासाठी डाॅ.फ्राॅमनी ‘आर्ट ऑफ बीईंग’ नावाचे गाईड लिहीलेय. शक्य झाल्यास ते वाचावे. पण नसेल शक्य तरी अडत नाही. ज्ञानोबांपासून विनोबांपर्यंतची चरित्रे ही आर्ट ऑफ बीईंगची रेडिमेड गाईडे आहेत!
….
डाॅ.रुपेश पाटकर

  • Related Posts

    सावधान !

    मला आज जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे, तो अतिशय गंभीर आहे. एक सायकीयॅट्रीस्ट म्हणून तो मला गंभीर वाटतोच, पण एका मुलीचा बाप म्हणून देखील गंभीर वाटतो. त्यासाठी मी तुमच्या पुढ्यात…

    तुयेचे इस्पितळ मार्गी लावा

    शिष्टमंडळाची आरोग्य संचालकांना भेट गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) – पेडणेपेडणे तालुक्यातील तुये येथे गोवा मेडिकल कॉलेज संलग्न इस्पितळाच्या नावाने उभारलेली भव्य इमारत गेली सात वर्षे धुळ खात पडली आहे. आता…

    You Missed

    ते तिघे कोण ?

    ते तिघे कोण ?

    पुजाच्या गौप्यस्फोटाने ‘मंत्री’ हादरले

    पुजाच्या गौप्यस्फोटाने ‘मंत्री’ हादरले

    10/11/2025 e-paper

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    error: Content is protected !!