गणेश मर्तो नाईक यांचे मामलेदारांना निवेदन
गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)
मडकई येथील जागृत देवस्थान श्री देवी नवदुर्गा संस्थानची पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्वाची उत्सवमुर्ती मंदिर व्यवस्थापनाच्या लॉकअपमधून मुक्त करावी आणि पुढील महिन्यात होणाऱ्या जत्रोत्सवातील रथोत्सवात ती मुर्ती रथात विराजमान व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन मडकईचे ज्येष्ठ नागरिक गणेश मर्तो नाईक यांनी फोंडा मामलेदारांना सादर केले आहे.
मडकई येथील श्री देवी नवदुर्गा देवस्थानचा वाद न्यायप्रविष्ट आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्यानुसार देवस्थानचे सर्व उत्सव साजरे करण्याची मोकळीक देण्यात आली आहे आणि त्यानुसार मडकईवासीयांकडून हे उत्सव विनाखंड सुरू आहेत. श्री देवी नवदुर्गेच्या उत्सवांना एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. अनेक जुन्या परंपरा आणि रूढी यांच्याशी हे उत्सव निगडीत आहेत.
मडकईच्या जत्रोत्सवाची कीर्ती गोव्यासह शेजारील राज्यांमध्येही आहे. लाखो भाविक या जत्रोत्सवात देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सहभागी होतात. या दरम्यान होणारा रथोत्सव हे एक मोठे सांस्कृतिक संचित मानले जाते. रथोत्सवातील उत्सवमुर्तीचे विशेष महत्त्व आहे. दुर्दैवाने ही उत्सवमुर्ती देवस्थान व्यवस्थापनाकडून लॉकअपमध्ये बंद करण्यात आली आहे. जवळपास ९ वर्षांपासून या उत्सवमुर्तीअभावी रथोत्सवाचे महात्म्य खंडित झाले आहे.
जोपर्यंत ही उत्सवमुर्ती रथात विराजमान होत नाही, तोपर्यंत रथोत्सवाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. या उत्सवमुर्तीशी संबंधित एक आख्यायिका आहे आणि त्याच अनुषंगाने रथोत्सवाचे आयोजन केले जाते. ही पवित्र आणि जागृत उत्सवमुर्ती लॉकअपमध्ये बंदिस्त ठेवणे हा देवीचाच नव्हे तर परंपरा आणि श्रद्धेचा अपमान आहे. मामलेदारांनी त्वरीत हस्तक्षेप करून देवस्थान व्यवस्थापनाची समजूत काढावी आणि पुढील महिन्यात होणाऱ्या रथोत्सवासाठी ही उत्सवमुर्ती बाहेर काढण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन गणेश मर्तो नाईक यांनी केले आहे.
ग्रामसभेचेही एकमत
या विषयावर मडकई ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर केला आहे. पंचायत मंडळाच्या बैठकीत हा ठराव संमत करून तो मामलेदारांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती श्री. नाईक यांनी दिली. देवस्थानचा वाद न्यायप्रविष्ट असला तरी देवस्थानचे उत्सव, परंपरा, रिती-रूढी यांना बाधा येता कामा नये. या सर्व गोष्टी परंपरेनुसारच होणे आवश्यक आहे.
श्रींच्या उत्सवमुर्तीचे विशेष महत्त्व आहे. ही उत्सवमुर्ती रथात विराजमान होऊन रथोत्सव साजरा झाला, तरच खऱ्या अर्थाने श्रींचे आशीर्वाद समस्त भक्तमंडळी आणि मडकई परिसराला प्राप्त होतील, असेही श्री. नाईक यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.





