
(सध्या क्रिकेटचे सामने गावोगावी भरवले जात आहेत. हे केवळ खेळणे नसते. हे सेलिब्रेशन असते. त्यासाठी हजारो रुपयांची देणगी देणारे प्रायोजक असतात. हे सामने बघितले की मला इसपाने सांगितलेली ‘सूर्याचे लग्न’ ही गोष्ट आठवते. समाजात भयंकर बेकारी वाढलेली असताना आणि महागाई शिखरावर असताना जेव्हा जेव्हा जनता सेलिब्रेशन करताना दिसते, तेव्हा तेव्हा मला ही गोष्ट प्रकर्षाने आठवत राहते.)
एकदा एक गाय एका तलावावर पाणी प्यायला गेली. तिला त्या तळ्यातले मासे नाचताना आढळून आले. तिने विचारले, “का नाचताय?” “आनंदोत्सव आहे. ते पहा प्राणी नाचताहेत,” मासे म्हणाले. “पण प्राणी का नाचत आहेत?” “माहित नाही, कोणाचे लग्न आहे म्हणे!” मासे म्हणाले. मग गाय प्राण्यांकडे गेली. प्राणी म्हणाले, “कोणाचे लग्न आहे ते माहित नाही. इथे जेवणावळ चालू आहे. तू देखील ये आणि मजा कर!” “हो पण कोणाचे लग्न?” गाईचा प्रश्न. “आपल्याला काय करायचे आहे, नसत्या चौकशा कशाला करतेस. माणसेदेखील नाचताहेत बघ. आपल्यापेक्षा जास्त अक्कल माणसांना असते. तेव्हा फालतू प्रश्न विचारू नको. पक्वान्नावर ताव मार. मजा कर.” पण या उत्तराने गाईचे समाधान झाले नाही. ती माणसांकडे गेली. माणसांना देखील कोणाचे लग्न ते माहित नव्हते. ते म्हणाले, “देव नाचतात म्हणून आम्ही नाचतोय. देवच ते म्हणजे काहीतरी उत्तमच घडत असणार.” मग गाय देवांकडे गेली. देव म्हणाले, “अग, सूर्याचे लग्न आहे!” सूर्याचे लग्न आहे, हे ऐकताच गाय लगबगीने तळ्याजवळ आली आणि म्हणाली, “मूर्खांनो, नाचताय काय? तुमचा अंत जवळ आलाय. सूर्याचे लग्न आहे.” “मग?” “म्हणजे यापुढे आकाशात दोन सूर्य होणार. यथावकाश त्यांना पिल्लू झाले की तीन सूर्य होणार. आज एक सूर्य आहे तर किती आग होते. तुमच्या तळ्याचे पाणी पावसापर्यंत जेमतेम पुरते. पण आता ते पूर्ण आटणार! पृथ्वी निर्जीव होऊन जाणार!” मासे मोठे तर्कनिष्ठ होते, ते मोठ्याने हसत म्हणाले, “काहीतरीच काय बोलतेस. प्राणी, माणूस, देव यांना काही कळतच नाही जणू, तूच मोठी शहाणी!” आणि त्यांनी गायीला हाकलून दिले!
– डॉ. रुपेश पाटकर