खंडपीठाच्या निर्देशानंतर अधिकाऱ्यांची धांदल
गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)
सांकवाळ येथील नियोजित मेसर्स परमेश कन्स्ट्रक्शन्स प्रा. लिमिटेड अर्थात भूतानी इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीच्या प्रकल्पासाठी डोंगरकापणी आणि मातीचा भराव टाकण्यासंदर्भात मुरगांव नियोजन विकास प्राधिकरण आणि नगर नियोजन खाते (टीसीपी) यांनी कधी पाहणी केली होती, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.
आज नगर नियोजन खात्याचे अधिकारी सांकवाळ येथील प्रकल्पस्थळी अचानक भेट देऊन परिस्थितीची पाहणी करताना दिसले. छुप्या पद्धतीने आलेल्या या अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळावर जाऊन पाहणी केली. विशेष म्हणजे, डोंगरकापणी अथवा मातीचा भराव टाकण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी ही पाहणी अपेक्षित असते. पाहणी करूनच परवानगी दिली जाते. मात्र, खंडपीठाने पाहणीसंबंधी सविस्तर अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
खंडपीठाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न?
भूतानी प्रकल्पाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सध्या खंडपीठात सुनावणी सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी डोंगरकापणी व मातीच्या भरावासाठी दिलेल्या परवानगीला आव्हान दिले आहे. या याचिका एकत्रितपणे सुनावणीसाठी घेण्यात आल्या आहेत.
सुनावणीदरम्यान, खंडपीठाने मुरगांव नियोजन विकास प्राधिकरण आणि नगर नियोजन खात्याला विचारले की, परवानगी देण्यापूर्वी पाहणी कधी केली होती? यावर दोन्ही खात्यांचे अधिकारी अनुत्तरित राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे खंडपीठाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, पाहणी केल्याचे दाखवण्यासाठी सरकारी यंत्रणा आता खटाटोप करत असल्याचा संशय सांकवाळवासीयांनी व्यक्त केला आहे. सरकार आपल्या चुका लपवण्यासाठी खंडपीठाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार असले, तरी खंडपीठ त्यांचा डाव उधळून लावेल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.





