
बांबोळीतील वादग्रस्त प्रकल्पाला पर्यावरण दाखल्याची शिफारस
गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी)
बांबोळी येथील वादग्रस्त “वर्ल्डवाइड रिसोर्ट्स अँड एंटरटेनमेंट लिमिटेड” कंपनीकडून सुरू असलेल्या कथित हॉटेल प्रकल्पाच्या बांधकामात प्रचंड प्रमाणात पर्यावरणाची हानी आणि जैवसंपदेचे नुकसान झाल्याची नोंद असूनही पर्यावरण खात्याअंतर्गत राज्य तज्ज्ञ मूल्यांकन समिती (एसईएसी) ने या प्रकल्पासाठी पर्यावरण दाखला (ईसी) देण्याची शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी या प्रकाराचा पोलखोल केला आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या या तज्ज्ञ समितीच्या सदस्यांनीच पर्यावरण संरक्षणाला हरताळ फासण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप शेर्लेकर यांनी केला. यापूर्वी नगर नियोजन खात्याने या प्रकल्पासाठी वाढीव एफएआर आणि उंची वाढवून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तज्ज्ञ समितीकडून पर्यावरणाची हानी दुर्लक्षित करून या प्रकल्पासाठी पर्यावरण दाखल्याची शिफारस केल्यामुळे सरकारी यंत्रणा राज्याच्या पर्यावरणाच्या जीवावर कशी उठली आहे, हे अधोरेखित होते, असा आरोप शेर्लेकर यांनी केला.
समितीची पाहणी आणि बैठकांतील नोंदी
राज्य तज्ज्ञ मूल्यांकन समितीने या प्रकल्पाची अनेक वेळा पाहणी केली होती. या पाहणीत पर्यावरण दाखल्याअभावीच या प्रकल्पाचे काम सुरू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, इथे डोंगर कापणी, नैसर्गिक जलस्त्रोतांची हानी तसेच मोठ्या प्रमाणात भूखोदाई केल्याची नोंदही या पाहणी अहवालात करण्यात आली आहे. डोंगर कापणीसंबंधी नगर नियोजन खाते तसेच नैसर्गिक स्त्रोतांबाबत जलस्त्रोत खात्याला अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अभ्यासात काय आढळून आले, याची नोंद कुठेच नाही, असेही स्वप्नेश शेर्लेकर यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञ मूल्यांकन समितीने प्रकल्पधारकांना काम बंदचे निर्देश दिले होते, त्याचीही कदर करण्यात आली नाही, असेही शेर्लेकर यांनी उघड केले. एवढे करून तज्ज्ञ मूल्यांकन समितीने या प्रकल्पासाठी पर्यावरण दाखला देण्याची शिफारस केल्याची माहिती शेर्लेकर यांनी दिली.
हे तज्ज्ञ कोण?
राज्य तज्ज्ञ मूल्यांकन समितीने पर्यावरण दाखल्यासाठी केलेल्या शिफारशीवेळी हजर असलेल्या सदस्यांत संजीव जोगळेकर (सदस्य सचिव), समितीचे चेअरमन अभियंते पास्कॉल बार्बोझा नोरोन्हा, डॉ. सुभाष हनुमनाप्पा भोसले, प्रशांत रांगणेकर आणि डॉ. जुझे रोमीयो फालेरो यांचा समावेश आहे.
आमदार विरेश बोरकर यांची हरकत
सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी यांनी बांबोळीतील हॉटेल तथा ग्रँड हयात या दोन्ही प्रकल्पांना पर्यावरण परवाना देण्यासंबंधी आपली हरकत आज राज्य पर्यावरण परिणाम मुल्यांकन समितीकडे नोंद केली. त्यांनी आपली लेखी हरकत खात्याकडे सुपुर्द केली आहे.