
सतावणूक, लैंगिक छळ प्रकरणांत वाढ
गांवकारी, दि. २२ (विशेष प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या गोमंतकीय महिलांना असुरक्षिततेच्या भावनेने वेढले आहे. कुटुंबांपासून नोकरीसाठी दुरावलेले काही पुरुष कर्मचारी इथल्या महिला कर्मचाऱ्यांची छळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नोकरीच्या आशेपोटी तसेच बदनामीच्या भीतीने हा अन्याय काही अविवाहित मुली आणि विवाहित महिला सहन करत आहेत. मोपा विमानतळावर विशाखा समितीची कार्यवाही केली आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मोपा विमानतळावर विविध खाजगी कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांकडून विशाखा समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या समित्यांवर स्थानिक महिला प्रतिनिधींची गरज आहे. अन्यथा, येथील स्थानिक महिला आपल्यावरील अन्यायाबाबत विश्वासाने व्यक्त होऊ शकणार नाहीत, असेही येथील वातावरण आहे.
याठिकाणी हा सगळा प्रकार डोळ्यांदेखत पाहून कंटाळून नोकरी सोडलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर आपली व्यथा कथन केली. विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे वागणाऱ्या महिलांना चांगले वागवतात. तसेच, त्यांनी सोयीप्रमाणे शिफ्ट आणि इतर सवलती देतात. इतरांची जाणूनबुजून सतावणूक केली जाते. शेवटी परिस्थितीमुळे त्यांची मर्जी राखणे महिलांना भाग पडते आणि तिथूनच या महिलांची सतावणूक तसेच लैंगिक छळाला सुरुवात होते, अशी धक्कादायक माहिती या महिलेने दिली आहे.
सावज हेरून जाळे टाकतात
महिलांची कौटुंबिक तसेच आर्थिक परिस्थिती हेरून काही पुरुष मंडळी महिलांना जाळ्यात अडकवतात. अनेकजणी आर्थिक आमिषांना बळी पडतात, तर या आमिषांना बळी न पडता आपल्या शिस्तीने वागणाऱ्या महिलांची जाणीवपूर्वक सतावणूक केली जाते. याबाबत तक्रारीला वावच नसल्याने एकतर हे सहन करायचे किंवा नोकरी सोडायची, असे दोनच पर्याय उपलब्ध राहतात. मग, मुग गिळून हे सहन करण्याची वेळ अनेक महिला आणि युवतींवर येते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
वाहतुकीच्या सोयीअभावी गैरसोय
मोपा विमानतळावर तीन शिफ्टमध्ये काम चालते. कामावर ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. आपले वैयक्तिक वाहन किंवा इतर कर्मचाऱ्यांची लिफ्ट घेऊनच ये-जा करावी लागते. अशावेळी अनेक महिलांच्या या गैरसोयीचा लाभ पुरुषांकडून घेतला जातो, अशी धक्कादायक माहितीही यावेळी मिळाली. कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय नसल्यामुळे रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना असुरक्षिततेच्या दबावाखाली काम करावे लागते. महिलांशी असभ्य वागणे, अश्लील गोष्टी सांगणे आदी प्रकार नेहमीचेच ठरले आहेत.
मोपा विमानतळावर नोकरीसाठी जाणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी विचारपूस करून त्यांना धीर देण्याची गरज आहे. कौटुंबिक परिस्थितीमुळे नोकरी करणे भाग आहे आणि त्यामुळे नोकरीच्या भीतीने या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. विचारपूस केल्यानंतर गैरप्रकार घडत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी आणि पीडित पंचक्रोशीतील गावांनी हे प्रकार हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करावेत.
– श्री. उदय महाले
मोपा विमानतळावरील विविध कंपन्यांच्या विशाखा समित्यांवर गावांतील महिला सरपंच किंवा पंचसदस्यांची नियुक्ती करावी. स्थानिक महिलांना या समितीसमोर आपली कैफियत मांडणे सोपे होईल.
– श्री. भास्कर नारुलकर
महिलांसाठी खास समुपदेशनाची सोय करावी. मोपा विमानतळावरील बहुतांश महिला कर्मचारी या परिस्थितीमुळे नोकरीवर आहेत. कामावर झालेला अन्याय किंवा छळवणूक सहन करणे त्यांना भाग पडत आहे. अशावेळी त्यांचे किमान तीन महिन्यांनी जरी समुपदेशन झाले, तर त्यातून त्यांना दिलासा मिळू शकतो.
– एड. जितेंद्र गांवकर